अधिक महिन्यात इस्कॉन आयोजित भागवत कथा भाविकांची भक्तीभाव वृद्धींगत करणारे – आमदार संग्रामभैय्या जगताप

श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्यात उपस्थित भाविक

नगर – इस्कॉनने अधिक महिन्याचे औचित्य साधून भागवत कथेचे केलेले आयोजन भाविकांची भक्तीभाव वृद्धींगत करणारे ठरले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी केले. येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये इस्कॉनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याच्या सांगतेप्रसंगी ते बोलत होते.

ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास म्हणाले की, श्रीमद् भागवत कथेची सांगता होतांना साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्या जवळ आलेले असतात. भगवान श्रीकृष्णाची कथा आणि श्रीकृष्णाचे नाम श्रीकृष्णापर्यंत पोचवणारे सगळ्यात मोठे साधन आहे. श्रीकृष्णाचे प्रगट धाम असलेल्या वृंदावनात नित्य निरंतर श्रीकृष्ण लिला आजही चालूच आहेत. कृष्ण भावनेने आपल्या घरातही वृंदावन निर्माण होते. रावण आणि कंसासारख्या अहंकारी व्यक्तीला भगवंताचे दर्शन होत नाही. जन्म-मृत्यू आपल्या हातात नाही तरीही मीपणा जात नाही.

आपल्याला प्रत्येक क्षणी आठवण राहिली पाहिजे की, आपला श्वास चालू आहे. आपले हात-पाय हलत आहेत. आपण बोल शकत आहोत. आपल्याला ऐकू येत आहे, ही सर्व भगवान श्रीकृष्णाचीच कृपा आहे. आज घरात होम थिएटरचा टिव्ही सेट, शाही सोफा सेट अशा अत्याधुनिक सुखवस्तूची उत्तमोत्तम साधने उपलब्ध असूनही जीवनात नैराश्य आहे. ताजमहालसारखा देखणा बंगला उभारला पण घमेंड आणि मीपणा असेल तर त्या बंगल्यात भगवान श्रीकृष्ण येणारच नाहीत. आपण बासरी सारखे जेव्हा खुले राहू तेव्हा श्रीकृष्ण त्यात सूर भरतील.

श्रीकृष्णाचे गवळी सवंगडी स्वतःला श्रीकृष्णाच्या स्वाधीन कसे करायचे ? हे आपल्याला दाखवून देतात. शरणागत भावाने श्रीकृष्णावर विश्वास ठेवला की, श्रीकृष्णाला अशा भक्तांसाठी धावत यावेच लागते. भगवंत भावाचा भुकेला आहे. आपण भगवंताकडे एक पाऊल टाकले तर भगवंत शंभर पाऊले पुढे येतात. अघासूर या राक्षसाला सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंताच्या शरिरात विलीन होण्याचे भाग्य लाभले. आपण नामस्मरणाच्या बळावर भगवंतापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करून या जन्माचे सार्थक करून घ्यावे, असे आवाहन श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले.

यश गोडसे याने श्रीकृष्ण रुपात आणि गायत्री माणिक हिने रुक्मिणी रुपात कथा स्थळी केलेला प्रवेश उपस्थितांचा उत्साह वृद्धींगत करणारा ठरला. विविध फुलांची पुष्पवृष्टी आणि जयजयकार करत या श्रीकृष्ण-रुक्मिणीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महाआरती आणि महाप्रसादाने भक्तीपूर्ण वातावरणात या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

या वेळी श्रीमती पार्वतीबाई अरूणकाका जगताप, इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक गिरीवरधारी दास, वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके, डॉ.सौ. अंजली फाटके, सौ. वंदना कानडे, सौ. मिना रोहित जग्गड, सौ. सोनाली चवंडके, मिलिंद चवंडके, अशोक कानडे, मदन कांबळे, मदन थोरात, गणेश पलंगे, बापू ठाणगे, मगनभाई पटेल यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.