पुणे शहरातील सारसबाग बंदच; तळ्यातील श्री सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी खुले !

‘श्री देवदेवस्थान संस्थान’चे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांची माहिती

पुणे – शहरातील प्रसिद्ध ‘सारसबाग’ २ दिवस बंद रहाणार आहे. पोलिसांनी शहरात प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणांवरून २८ आणि २९ मे या दिवशी ‘सारसबाग’ बंद रहाणार; मात्र सारसबागेत असलेले तळ्यातील गणपति मंदिर चालू रहाणार आहे. भाविकांना या मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती ‘श्री देवदेवस्थान संस्थान’चे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी सांगितली.

हे २ दिवस कुणालाही सारसबागेत जाता येणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. प्रभारी मुख्य उद्यान अधीक्षक संतोषकुमार कांबळे यांनी हे आदेश काढले आहेत. पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश हे केवळ सारसबाग उद्यानासाठी आहेत. सारसबागेतील गणपति मंदिरात येणार्‍या भाविकांसाठी हे आदेश लागू नाहीत. त्यामुळे या २ दिवशी मंदिर भाविकांसाठी खुले रहाणार आहे. तळ्यातील गणपति दर्शनासाठी येणारे भाविक पूर्वेकडील महालक्ष्मी मंदिराच्या समोरील बाजूच्या मुख्य प्रवेशद्वाराने मंदिरात येऊ शकतात. मंदिराची वेळ सकाळी साडेपाच ते रात्री १० अशी आहे, असेही पंडित यांनी सांगितले.

महापौर सौ. नागपुरे यांचा खुलासा

सारसबाग आणि श्री गणपति मंदिर २ दिवस बंद रहाणार असल्याची पोस्ट महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या सामाजिक माध्यम विभागाकडून करण्यात आली होती. त्यावर महापौर नागपुरे यांनी सामाजिक माध्यम विभागाकडून चुकीने मंदिर दुरुस्तीसाठी बंद रहाणार असा संदेश दिला गेल्याचे सांगितले. पोलिसांनी सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, ही माहिती महापौर म्हणून केवळ पुणेकरांना दिली. बकरी ईद आणि सारसबाग बंद ठेवण्याचा कोणताही संबंध नाही.