अनोखी मानवंदना !

समुद्राच्या तळाशी जगातील सर्वात मोठा तिरंगा फडकवून भारताचा जागतिक विक्रम  ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

२ मे २०२६ या दिवशी भारताच्या अंदमान-निकोबार येथील ‘स्वराज द्वीप’ येथे राधानगर किनार्‍याजवळ समुद्राखाली ६० मीटर x ४० मीटर एवढ्या प्रचंड आकाराचा भारताचा तिरंगा ध्वज पाण्याखाली फडकवण्यात (म्हणजे पसरवण्यात) आला. अंदमान-निकोबार प्रशासनाने साहसी पर्यटन आणि ‘भारताच्या सागरी सामर्थ्याचे प्रदर्शन’ यांसाठी आयोजित केलेल्या या मोहिमेत २०० हून अधिक पाण्याखाली रहाण्याचे प्रशिक्षण असणार्‍यांनी यात भाग घेतला. भारतीय नौदल, तटरक्षक दल, पोलीस आणि विविध ‘डायव्हिंग’ (पाण्याखालील विविध कृतीशी संबंधित) संस्था यांनी संयुक्तरित्या केलेल्या अन् देशभक्ती दर्शवणार्‍या या अनोख्या घटनेची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.

वर्ष १९४३ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान निकोबार बेटांवर भारताचा झेंडा फडकवला होता. दुसर्‍या महायुद्धात जपानने ब्रिटिशांकडून ही बेटे जिंकली होती आणि नंतर ‘आझाद हिंद सेने’ला ती सुपुर्द केली होती. नेताजींनी अंदमानला ‘शहीद द्वीप’ आणि निकोबारला ‘स्वराज द्वीप’ अशी नावे दिली होती. त्यामुळे भारतीय सैनिकांमध्ये मोठी प्रेरणा निर्माण झाली होती. भारतासाठी ही बेटे केवळ पर्यटनस्थळे नसून ती सुरक्षा, व्यापार आणि सामरिक शक्ती यांचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्याजवळील ‘मालक्का सामुद्रधुनी’च्या मार्गातून चीन, जपान, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांचा व्यापार होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक घडामोडी येथे घडत असतात. भारताची पहिली संयुक्त ‘त्रिसेवा कमांड’, म्हणजे सेना, नौदल आणि हवाई दल यांची एकत्र काम करणारी तुकडी आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत किंवा युद्धकाळात भारतीय सैन्याला जलद कारवाई करणे शक्य होऊ शकते. संरक्षणतज्ञ या बेटांना ‘बुडू न शकणारे विमानवाहू जहाज’ असे म्हणतात. समुद्रातील भारताचे लष्करी सामर्थ्य अधिक बलवान होण्यासाठी ती नैसर्गिक तळासारखी काम करतात. शत्रूराष्ट्र चीनच्या ‘स्ट्रिंग ऑफ पिलर्स’ रणनीतीमुळे (विविध बंदरे आणि तळ यांद्वारे प्रभाव वाढवणे) भारताला सतर्कच रहावे लागते.

चीनचा हिंदी महासागरातील वाढता प्रभाव आणि हालचाली भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने घातक ठरू नयेत, यासाठी अन् सागरी गुप्तचर हालचाली, सागरी तस्करी, घुसखोरी रोखण्यासाठी अंदमान-निकोबार भागात भारत संरक्षणक्षमता वाढवत आहे. अनेक मोठ्या शक्ती हिंदी महासागरात सक्रीय असल्याने भारत या भागाला ‘संवेदनशील सामरिक क्षेत्र’ मानतो. त्यामुळेच भारत येथे नौदल तळ बळकट करणे, धावपट्ट्या आणि रडार प्रणाली वाढवणे, क्षेपणास्त्र अन् देखरेख व्यवस्था तैनात करणे यांसाठी प्रयत्नरत आहे. त्यामुळेच वरील घटना म्हणजे केवळ दिखावा नसून समस्त भारतवासियांसाठी अभिमानाचा क्षण आहे !

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.