Donald Trump Buffalo : बांगलादेशात ‘डॉनल्ड ट्रम्प’ नावाच्या म्हशीची बकरी ईदच्या दिवशी होणारी हत्या रहित !

या म्हशीला आता प्राणीसंग्रहालयात ठेवले जाणार

‘डॉनल्ड ट्रम्प’ नावाची म्हैस

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात एका म्हशीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे नाव देऊन बकरी ईदच्या दिवशी तिची हत्या करण्यात येणार होती. तथापि तिला देण्यात आलेल्या नावामुळे जगभरात याची चर्चा झाली. यातून निर्माण झालेल्या दबावामुळे या म्हशीचे प्राण वाचले आहेत. तिची हत्या करण्याचा निर्णय रहित करण्यात आला असून आता तिला प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. म्हशीचा मध्यम पांढरा रंग आणि माथ्यावर असणारे सोनेरी रंगाचे केस यांमुळे म्हशीचे नाव ट्रम्प यांच्याशी जोडण्यात आले होते.

बांगलादेश सरकारच्या गृह मंत्रालयाने म्हशीची हत्या रहित केल्याचे २७ मे या दिवशीच घोषित केले. ७०० किलो वजनाच्या दुर्मिळ अल्बिनो जातीच्या या म्हशीची ३ लाख रुपयांना विक्री करण्यात आली होती.