
नवी देहली येथे लाल किल्ल्याजवळ वर्ष २०२५ मध्ये बाँबस्फोट झाला. त्याच्या अन्वेषणाच्या अंतर्गत आतंकवाद्यांनी घातपातासाठी ‘चॅट जीपीटी’ आणि ‘यू ट्यूब’ या संकेतस्थळांचा वापर केल्याचे उघड झाले. ही आतंकवादी संघटना ‘अल-कायदा’शी संबंधित आहे. आतंकवाद्यांनी रॉकेट बनवणे, बाँबचे मिश्रण इत्यादी माहिती त्या संकेतस्थळांवरून शोधली होती. या बाँबस्फोटात ११ लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. बाँबस्फोट ही गंभीर घटना आहेच; पण त्या जोडीला कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरातून बाँबस्फोट घडवले जाणे, हे विकसित होऊ पहाणार्या भारतासाठी धक्कादायक आहे. अशा घटना पाहिल्यावर ‘भारताच्या हाती ‘विकास’ आहे कि ‘विध्वंस’ ?’ असा प्रश्न नागरिकांना पडतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा हिंसक कृत्यांसाठी होऊ लागला, तर संपूर्ण जगासाठी ते चिंताजनक आहे. थोडक्यात काय, तर ‘हे तंत्रज्ञान विकासाचे पाय खेचत गुन्हेगारीची वाट धरत आहे’, असे म्हणता येईल. अशाने महाविध्वंसच होईल.
राष्ट्रघातकी मार्गदर्शन आणि प्रतिबंध !
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या बळावर माणूस प्रगतीपथावर आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता, सामाजिक माध्यमे आणि माहिती तंत्रज्ञान यांमुळे विकासाचा मार्ग सहजसाध्य होत आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, संशोधन आणि प्रशासन यांत मोठी क्रांती घडून येत आहे. ‘चॅट जीपीटी’सारखी कृत्रिम बुद्धीमत्ता विविध क्षेत्रांमधील माहिती अवघ्या काही सेकंदांत उपलब्ध करून देते. संपूर्ण जग मानवाच्या मुठीत तर आलेच आहे; पण या माहितीने मानवाचे मन आणि बुद्धी यांवरही नियंत्रण मिळवले आहे. सहज मिळणार्या ज्ञानाचा सदुपयोग व्हायला हवा; पण नाण्याला जशा २ बाजू असतात, त्याप्रमाणे याचीही दुसरी बाजू वरीलप्रमाणे समोर येते. हे विध्वंसक ज्ञान म्हणजे आतंकवादी संघटनांच्या हाती आयते कोलीत मिळाल्यासारखेच आहे. यातूनच घातक कारवायांना ऊत येतो.
आज त्यांनी बाँबस्फोटाची माहिती शोधली; पण उद्या कुणी ‘दंगल कशी घडवावी ?’, ‘बलात्कार कसा करावा ?’, ‘चोरी करण्याची माध्यमे कोणती ?’, ‘हत्या कशी करावी ?’, अशी माहिती शोधल्यास नवल ते काय ? एखादी योजना अयशस्वी झाली, तरी दुसरी योजना आखतांना काय काळजी घ्यावी, असे इत्यंभूत मार्गदर्शन यातून मिळते. संगणकीय ज्ञानजाल मानवाला अगदी टप्प्याटप्प्याने ही माहिती पुरवते. हे वाढते प्रकार म्हणजे पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. याआधी आतंकवाद्यांना आतंकवादी कृत्ये अवगत करण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरांना जावे लागत असे. तेथे त्यांना अशा प्रकारची तंत्रे शिकवली जात; पण आता संगणकीय ज्ञानजाल आणि कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे त्यांच्या हातातील बाहुलेच झाले आहे. चाकूचा उपयोग फळे कापण्यासाठीही होतो आणि हिंसक कृत्यांसाठीही होतो. सुरक्षा यंत्रणा या नव्या आव्हानाचा सामना कसा करणार आहेत ? हा प्रश्नच आहे. तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाला आळा कोण घालणार ?
अशा प्रकारच्या घटनांचे वृत्तांकन करतांना दक्षताही तितकीच बाळगायला हवी. आतंकवाद्यांना प्रसिद्धी मिळेल अशा पद्धतीने वृत्तांना प्रसिद्धी दिल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा समाजजागृती करणे, नागरिकांना सतर्क करणे आणि राष्ट्रीय एकात्मता साध्य करणे, यांवर भर दिला पाहिजे. अंतर्बाह्य राष्ट्रीय सुरक्षा हे केवळ सैन्य किंवा पोलीस यांचे दायित्व नसून त्यासाठी प्रत्येक नागरिक सजग असायला हवा.
सायबर विभागाने अशा प्रसंगांमध्ये सातत्याने निरीक्षण करणे, शोधली जाणारी धोकादायक माहिती हटवणे, कठोर नियंत्रण प्रणाली राबवणे अशा उपाययोजनांचा अवलंब करायला हवा. गुन्हेगारांनी वापरलेली डिजिटल साधने, ‘सर्च हिस्ट्री’ (शोधलेल्या माहितीचे मूळ स्रोत), तसेच संवाद यांचेही पुरावे गोळा करावेत. आतंकवादी यंत्रणेचा शोध घ्यावा. कृत्रिम बुद्धीमत्तेचा दुरुपयोग, आतंकवादी सामग्रीचा प्रसार आणि डिजिटल माध्यमांचा गैरवापर करणार्यांसाठी कठोर शिक्षेचे प्रावधान योजण्यात आले पाहिजे. यातूनच देशाची सायबर सुरक्षा भक्कम होऊ शकते.

नैतिकतेविना पर्याय नाही !
सध्या अभियांत्रिकीमध्येही ‘एआय’च्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. मग नव्या पिढीने याचा गैरवापर केल्यास त्याला उत्तरदायी कोण ? आतापर्यंत अनेक अभियंत्यांचा देशविघातक कृत्यांमधील सहभाग उघड झाला आहे. हे पहाता देशाच्या भावी पिढीने तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता ‘देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठीच आणि राष्ट्रनिर्मिसाठी त्याचा वापर करावा’, हे हितावह ठरेल. तसा दृढ संकल्प करणे, हीच राष्ट्रनिष्ठा होय ! ‘तंत्रज्ञानातून देशहितच साधायचे आहे’, अशी जाणीव त्यांच्या मनात निर्माण व्हायला हवी, तरच देशाची सुव्यवस्था अबाधित राहू शकते.
आज जगभरातील सरकारे आणि तंत्रज्ञान आस्थापने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सुरक्षित वापराविषयीची धोरणे सिद्ध करत आहेत. अनेकदा ‘एआय’ प्रणालीही धोकादायक माहिती देण्यावर मर्यादा घालतात; पण तरीही काही जण अप्रत्यक्ष मार्गांनी माहिती मिळवतात. त्यामुळे यांवर तांत्रिक निर्बंध घालणे पुरेसे नाही, तर नैतिक मूल्ये आणि कठोर कायदे यांचीही आवश्यकता आहे. कट्टर विचारसरणी नष्ट करण्यासाठी तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, मानवता, संयम, कर्तव्यनिष्ठा, धर्मनिष्ठा आणि विवेकबुद्धी या मूल्यांची जपणूक करण्यावर भर द्यायला हवा. तंत्रज्ञान आणि नैतिकता यांचा समतोल साधला गेला पाहिजे. विज्ञान मानवाला केवळ बुद्धी देते; पण तिचा योग्य वापर कसा करायचा, हे धर्म आणि संस्कार शिकवतात. आज नैतिकतेचाच र्हास होत असल्याने अशा घटना घडत आहेत. नैतिकतेचा अभाव हेच विनाशाचे कारण ठरते. यातूनच स्वार्थ, हिंसा अन् अराजकता वाढते. यामुळे आधुनिक शिक्षणासह नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षणाचीही जोड द्यायला हवी. आण्विक क्षेत्राप्रमाणे तंत्रज्ञानाचे क्षेत्रही नियंत्रित ठेवणे क्रमप्राप्त आहे. लाल किल्ला बाँबस्फोट प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी या सर्व उपाययोजनांकडे गांभीर्याने अन् दायित्वाने पाहून कृतीशील व्हावे; कारण यातच राष्ट्राचा उत्कर्ष दडलेला आहे. केवळ तंत्रज्ञानातील त्रुटी दुरुस्त करण्यावर भर न देता मूळ पाया नीतीवान असल्यासच गुन्हेगारी आणि आतंकवाद यांपासून मुक्त अशी आदर्श राष्ट्रउभारणी होऊ शकेल !
संपादकीय : स्टार्मर यांचे काय चुकले ?
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
संपादकीय : ‘तेज’स कि मागास ?
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास संपूर्ण इराण नष्ट केला जाईल ! : Donald Trump
Bhopal Terror Module : ‘पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ‘मिशन-२०४७’नुसार सर्व आतंकवादी बाहेर येऊन सत्ता उलथून टाकतील !