देवस्थानच्या भूमी वहिवाटदारांना देण्याचा प्रस्तावित कायदा सरकारने मागे घ्यावा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघ

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री नयन स्वामी महाराज, सद्गुरु नंदकुमार जाधव, बोलतांना श्री. सुनील घनवट आणि श्री. नीळकंठ चौधरी

जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान इनाम भूमी आणि मंदिरांच्या अन्य भूमी कुळांना किंवा वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायदा येत आहे. हिंदु देवस्थानांचे अस्तित्व संपवण्याचा हा डाव आहे. त्यामुळे शासनाने हा बेकायदेशीर आणि अन्यायकारक मसुदा मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर मंदिरांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडू, अशी चेतावणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत सरकारला दिली आहे. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, स्वामी नारायण मंदिराचे श्री नयन स्वामी महाराज, नागाई जोगाई माता मंदिराचे विश्वस्त श्री. दिनेश सोनवणे, मनुदेवी मंदिराचे विश्वस्त श्री. नीळकंठ चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे उपस्थित होते.