वाळवी लागलेली संस्कृती कुठवर टिकेल ?

तमिळनाडूमधील द्रमुक नेते आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन जे म्हणाले, ते आजवर चालत आलेल्या आणि पुढेही चालू रहाणार्‍या शृंखलेचा केवळ एक बिंदू आहे. (उदयनिधी स्टॅलिन तमिळनाडूच्या विधानसभेत ‘सनातन धर्म नक्कीच नष्ट केला पाहिजे’, असे म्हणाले होते.) वैदिक सनातन हिंदु संस्कृती संपवण्याचा प्रयास आजकालचा नाही, त्याला सहस्रो वर्षांचा इतिहास आहे. इस्लामी आक्रमणे नृशंस होती; पण त्यांचा प्रभाव संस्कृती संपवण्याइतका घातक नव्हता. ख्रिश्चॅनिटी त्यात फारच पुढारलेली आणि शिस्तबद्ध आहे. ख्रिश्चॅनिटी आणि समाजवादी-साम्यवादी हे दोन्ही ‘कल्ट’ (पंथ) आहेत. संस्कृती संपवण्याची त्यांची पद्धत सारखी आहे. एरव्ही भारताबाहेर त्यांचे एकमेकांत पटत नाही; पण भारतात एकवाक्यता असते, इथे ते हातात हात घालून फिरतात. जगभरातही जिथे जिथे निसर्गपूजक संस्कृती संपवल्या, तिथे तिथेही ते तसेच वागले आहेत.

जिथे ख्रिश्चॅनिटीचा उदय झाला, तिथेही तो स्थानिक मूर्ती फोडूनच झाला; पण बळ असेपर्यंतच यश मिळू लागले. मग एका नव्या नीतीचा उदय झाला. ‘संघर्षबिंदू (फॉल्टलाइन) शोधण्याचा; त्या शोधायच्या, वाढवायच्या आणि त्यांना सोडून द्यायचे. तेच एकमेकांत लढून लढून मरतात आणि उरलेले ख्रिस्ती होतात. संस्कृतीही संपते आणि आपले हातही रक्ताने माखत नाहीत’, अशी ही संपूर्ण योजना चर्चने राजसत्तेतून राबवली. त्यासाठी स्थानिकांचाच वापर केला. त्यांना मोठे केले.

१. काँगो, उत्तर अमेरिका आणि चीन येथे स्थानिक संस्कृती संपवणार्‍यांचे उदात्तीकरण

ओफोन्सो (प्रथम) या मध्य आफ्रिकेतील काँगो राजाने स्वतःच्या पूर्वजांच्या संस्कृतीला ‘सैतानी’ आणि ‘अंधश्रद्धेचे जाळे’ घोषित केले. त्याने काँगोच्या पारंपरिक देवीदेवतांच्या मूर्ती, चिन्हे आणि प्रार्थनास्थळे जाहीरपणे शिव्या शाप देत जाळून अन् फोडून टाकली. हा राजा तेथील आणि पाश्चात्त्य पाठ्यपुस्तकांत आता आफ्रिकेचा ‘पहिला प्रबुद्ध आणि आधुनिक राजा’ म्हणून शिकवला जातो. काँगोला ‘रानटी’ अवस्थेतून बाहेर काढणारा ‘महान सुधारक’ म्हणून तो शिकवला जातो. ऍझ्टेक संस्कृतीतील देवतांना गलिच्छ भाषेत शिव्या देऊन सैतान संबोधण्याचे काम करणारा हुआन डिएगो, आज तेथील अभ्यासक्रमात ‘स्थानिक लोकांमध्ये शांतता आणि ख्रिस्ती प्रेमाचा प्रसार करणारा महान दूत’ म्हणून गौरवला जातो. उत्तर अमेरिकेतील ‘माटोआका’ नामक स्त्रीनंतर ‘रेबेका’ झाली. तिने स्वतःच्या टोळीच्या पारंपरिक धार्मिक समजूती आणि देवांना ‘अंधार पसरवणारे’ अन् ‘रानटी’ ठरवून त्यांचा त्याग केला. आजही अमेरिकन शाळांमध्ये तिला ‘एक महान नायिका’ म्हणून शिकवले जाते. हॉलीवूडमध्ये तिच्यावर चित्रपटही काढण्यात आले. हॉन्ग झिक्वुआन याने चीनमधील पारंपरिक बौद्ध, कन्फ्युशियन आणि ताओइस्ट संस्कृतीला ‘सैतानी’ म्हटले. त्याने त्याच्या लाखो अनुयायांच्या साहाय्याने चीनमधील प्राचीन बौद्ध मंदिरे, कन्फ्युशियन पुतळे आणि ग्रंथ जाळून खाक केले, कोट्यवधी लोक मारले. आंतरराष्ट्रीय स्तरावर याला प्रारंभीच्या काळात चीनला जुन्या सरंजामशाहीतून आणि अंधश्रद्धेतून मुक्त करू पहाणारा ‘क्रांतीकारक अन् सुधारक’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आले.

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

२. भारतात हिंदु संस्कृतीला हीन ठरवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न

हेच कार्य भारतीय संस्कृतीला नावे ठेवणार्‍यांना जागतिक पातळीवर आणि भारतीय अभ्यासक्रमात महान ठरवण्यात आले. त्यांच्याच बगलबच्च्यांकडून त्यांना ‘राजा’, ‘महात्मा’ आणि ‘पेरियर’ अशा पदव्या बहाल करवण्यात आल्या. ऑक्सफर्ड, केंब्रिज, हॉर्वर्ड या जागतिक विद्यापिठांमध्ये या सुधारकांवर ‘पीएच्.डी’ (विद्यावाचस्पति) आणि संशोधनासाठी मोठा निधी दिला गेला. हाच अभ्यासक्रम पुढे भारतातील पाठ्यपुस्तकांत जसाच्या तसा उतरवला गेला.

भारतात त्यांना मारण्यासाठी एक न निखळणारी पाचर मिळाली. ‘सामाजिक अस्मिता’ ! स्वत:च्याच संस्कृतीतील देवतांना अभद्र, गलिच्छ आणि हीन शिव्या हासडणार्‍यांना अन् त्यांच्या सामाजिक कार्याला समाजाच्या अस्मितेशी घट्ट बांधले. आज पुरोगामी म्हणून टिकून रहाण्यासाठी हिंदु देवीदेवतांना हीन पातळीवर जाऊन टीका करण्याच्या त्यांच्या कृत्याकडे डोळेझाक तरी करावे लागते किंवा त्याचे समर्थन तरी करावे लागते. चुकीच्या सामाजिक चालीरितींवर प्रहार करण्यासाठी देवीदेवतांची अभद्र निंदा का करावी लागते, या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नसते. जातीभेद, उच्च-नीचता संपवून समता, समानता आणायची होती म्हणून त्यांनी तसे केले, असे समर्थन पुरोगामी विचारवंत करतात; पण तशी निंदानालस्ती न करताही सामाजिक सुधारणा करणारे स्वामी दयानंद सरस्वती, ईश्वरचंद्र विद्यासागर, नारायण गुरु असे असंख्य समाजसुधारक भारतातील प्रत्येक राज्यांत होते. त्यांची नावे पाठ्यपुस्तकात येणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. एकाच जातीवर सगळे खापर फोडायचे, आत्यंतिक जातीय द्वेष पसरवायचा आणि त्यालाच जातीभेद, उच्च-नीचता संपवण्याचे महान कार्य म्हणायचे. समाजसुधारकांनी केलेल्या जातीयद्वेषाचा उल्लेख केला, तरी तसे करणाराच जातीयवादी ठरतो. हिंदु संस्कृतीवर, देवांवर केलेली गलिच्छ टिकेला ‘गलिच्छ आहे’, असे म्हणतो, तोच आज ‘कम्युनल’ (सांप्रदायिक) ठरतो.

३. कथित ‘समाजसुधारकां’वर टीका करणारा ‘मनुवादी’ आणि ‘समतेचा विरोधक’ ठरवला जाणे

चर्च, मिशनरी, वसाहतवादी आणि आधुनिक काळात समाजवादी-साम्यवादी विचारवंत यांनी अभेद्य करून ठेवलेल्या ‘समाजसुधारकां’च्या विचारांवर टीका करणारा ‘मनुवादी’, प्रतिगामी आणि समतेचा विरोधक वगैरे ठरवला जातो. इतकेच नव्हे, तर तो त्या संपूर्ण समाजाचा विरोधक ठरवला जातो. या माणसांचे कार्य मोठे नाही का ? निश्चितच आहे; पण हिंदु संस्कृतीला आणि देवीदेवतांना हीन ठरवून ही माणसे महान झाली आहेत. हीच शृंखला पुढे चालू आहे आणि संस्कृती संपेपर्यंत चालूच राहणार आहे. दक्षिण भारत स्वतंत्र द्राविडी अस्मितेपायी आणि महाराष्ट्रासह उत्तर भारत समता-समानतेच्या वेडापायी हिंदु संस्कृती संपवत आहे. या वाळवींनी पोखरलेली संस्कृती किती तग धरते, तेच पहात रहाणे आपल्या हाती आहे. ते पहाण्याआधीच या जन्मी तरी निदान डोळे मिटावेत, हीच इच्छा !

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा.

(साभार : ‘प्रसन्नवदने’ ब्लॉगवरून)