Maharashtra NEET Paper Leak : फुटलेल्या नीट पेपरची ५ राज्यांत विक्री : सर्वाधिक खरेदी महाराष्ट्रात !

  • नीट पेपरफुटीचे प्रकरण

  • फुटलेल्या प्रश्नपत्रिका खरेदी करणार्‍या पालकांची सूची सिद्ध !

मुंबई – नीट पेपरफुटी प्रकरणाचे मुख्य केंद्र महाराष्ट्र असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (‘सीबीआय’च्या) चौकशीत स्पष्ट झाले. महाराष्ट्रातूनच राजस्थानसह इतर ५ राज्यांमध्ये हे प्रकरण पोचले असून यात फुटलेल्या पेपरची सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात आणि त्याखालोखाल राजस्थानमध्ये झाली. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यांपैकी सर्वाधिक ७ आरोपी महाराष्ट्रातील आहेत.

पैसे हस्तांतरित केलेल्या पालकांची चौकशी चालू झाली असून २१ मेच्या रात्रीपासून ‘सीबीआय’ने महाराष्ट्रात मोठी कारवाई चालू केली आहे. काही पालकांनी स्वतः पेपर विकत घेऊन तो इतर विद्यार्थ्यांना विकून साखळी सिद्ध केली. यामुळे नेमका किती विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर पोचला ?, याचा अचूक आकडा निश्चित करणे, हे अन्वेषण यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. मुख्य संशयित प्रा. शिवराज मोटेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी आणि त्यांची पुण्यातील सहकारी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यांमध्ये ज्या पालकांनी पैसे हस्तांतरित केले होते, त्या सर्वांची सूची ‘सीबीआय’ने सिद्ध केली आहे. पेपर फोडणार्‍या मुख्य सूत्रधारला पकडल्यानंतर ‘सीबीआय’चे ३ विशेष चमू पेपर खरेदी करणारे पालक आणि विद्यार्थी यांचा शोध घेत आहेत.

महाराष्ट्रानंतर लवकरच इतर राज्यांतही धाडी घातल्या जातील. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’) अंतर्गत कर्मचार्‍यांविना बाहेरील काही मोठ्या व्यक्तींचाही यात हात असल्याचा संशय आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी ‘सीबीआय’ची २ पथके स्वतंत्रपणे काम करत आहेत. जयपूर येथे २१ मे या दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ‘नीट’ पेपरफुटीविरोधात तीव्र निदर्शने केली आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.