सीमेपलीकडील आतंकवादाला भारत कसा प्रतिसाद देतो, यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हा एक निर्णायक टप्पा ठरला. अनेक दशकांपासून भारताने आक्रमणे सहन केली, राजनैतिक निदर्शने केली आणि नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे लष्करी प्रत्युत्तर टाळले. ‘ऑपरेशन सिंदूर’ने हे सर्व रेकार्ड मोडले. भारत आता मोठ्या आतंकवादी आक्रमणांना वेगळे धक्के म्हणून नव्हे, तर परिणामांसाठी प्रेरणा म्हणून पहातो, असे संकेत त्याने दिले.

१. भारताची क्षमता आणि हेतू
भारताची क्षमता सुधारत असतांना तणाव वाढवण्याचा हेतू नव्हता, तर त्याच्याकडे कार्यात्मक क्षमता आहे आणि त्याहूनही महत्त्वाचे, म्हणजे शत्रूवर दंडात्मक कारवाई करण्याचा राजकीय हेतू आहे, हे दाखवून देण्याचा उद्देश होता. जागतिक स्तरावर प्रामुख्याने हेच निरीक्षण नोंदवण्यात आले की, भारताने आपल्या या पालटलेल्या हेतूचे, म्हणजेच ‘न्यू नॉर्मल’ (नवे निकष) यशस्वी प्रदर्शन केले आहे. हा पालट एका रात्रीत झाला नाही. वर्ष २०१६ चा ‘सर्जिकल स्ट्राईक’ (तात्पुरती सैनिकी कारवाई) आणि वर्ष २०१९ ची बालाकोट हवाई कारवाई यांच्यापासून भारताने ‘सब-थ्रेशोल्ड फोर्स’ (विशिष्ट मर्यादेखालील लष्करी बळ) वापरणे सातत्याने सामान्य केले आहे. ही अशी लष्करी कारवाई आहे, जी पाकिस्तानच्या ‘अण्वस्त्र रेड लाईन’ (अंतिम सीमा) ओलांडणार नाही; परंतु तरीही शत्रूची मोठी हानी करील, अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने या संपूर्ण उत्क्रांतीला अधिक बळकटी दिली आहे.

थोडक्यात सांगायचे, तर भारताने जगाला हे दाखवून दिले आहे की, त्याच्याकडे आता केवळ लष्करी शक्तीच नाही, तर ती वापरण्याची राजकीय इच्छाशक्तीही आहे.
प्रतिबंधात्मक जरब ही केवळ विधानांवरून निर्माण होत नाही, तर ती सातत्यपूर्ण वर्तनातून निर्माण होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ मागील तर्कशास्त्र हेच आहे की, आतंकवादी गटांना प्रायोजित करणार्या किंवा त्यांना थारा देणार्यांच्या ‘धोका आणि लाभ’ या गणितात पालट करणे. ‘न्यू नॉर्मल’चा अर्थ ‘केवळ सूडबुद्धीने शिक्षा देणे’, असा नाही, तर ‘हे धोरण भविष्यगामी आहे आणि शत्रूच्या वर्तणुकीत पालट घडवून आणण्यासाठी आखले गेले आहे. भविष्यातील आक्रमणांची वारंवारता आणि तीव्रता न्यून करणे किंवा ते पूर्णपणे थांबवणे’, हे यामागचे ध्येय आहे. आतंकवादी कारवाया करणे रणनैतिकदृष्ट्या तोट्याचे ठरेल, अशी परिस्थिती निर्माण करणे, हा मुख्य उद्देश आहे. या अर्थाने ‘ऑपरेशन सिंदूर’ हे ‘प्रतिक्रियाशील पीडित’ असण्याकडून ‘संरचित प्रतिबंधात्मक धोरणा’कडे झालेला पालट दर्शवते. यातून भारत आता हे स्पष्टपणे सूचित करत आहे की, विशिष्ट मर्यादा ओलांडल्यास त्याचे निश्चितपणे परिणाम भोगावे लागतील आणि त्यातून होणारी हानी शत्रूला परवडणारी नसेल.
यशाचे मोजमाप कसे करावे ?

‘ऑपरेशन सिंदूर’चे यश केवळ किती लक्ष्यांवर यशस्वी आक्रमणे झाली, यावर मोजता येणार नाही, तर कालांतराने पाकिस्तानच्या वर्तणुकीत पालट घडवून आणण्यात ही मोहीम कितपत यशस्वी ठरते, यावर त्याचे खरे यश अवलंबून आहे. जेव्हा रावळपिंडीला (पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाला) हे जाणवेल की, भारतावर मोठी आक्रमणे करणे, हे आता अतिशय धोकादायक आणि खर्चिक आहे, तेव्हाच या मोहिमेला खर्या अर्थाने यशस्वी म्हणता येईल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताला खालील सूत्रे टिकवून ठेवणे आवश्यक आहे –
अ. राजकीय सत्तांतरे झाली, तरी राष्ट्रीय सुरक्षा धोरणात सातत्य असणे.
आ. सहनशीलतेच्या मर्यादांविषयी शत्रूला स्पष्ट आणि ठाम संकेत देणे.
इ. संपूर्ण देशाचा (प्रशासन, लष्कर आणि जनता) एकसंध दृष्टीकोन असणे.
ई. मोहिमा दीर्घकाळ चालू ठेवण्यासाठी विश्वासार्ह आणि सतत अद्ययावत् होणारी लष्करी क्षमता विकसित करणे.
जर या अटींची पूर्तता झाली, तर ‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ ‘एक यशस्वी लष्करी मोहीम’ म्हणून ओळखली जाणार नाही, तर तो एक असा महत्त्वाचा टप्पा ठरेल, जिथे भारताने आपल्या ‘प्रतिबंधात्मक धोरणात’ कायमस्वरूपी ‘न्यू नॉर्मल’ प्रस्थापित केले.
– ब्रिगेडियर संजय अग्रवाल (निवृत्त)
२. आंतरराष्ट्रीय संकेत आणि देशांतर्गत प्रगल्भता
जागतिक भागीदारांना दिलेला संदेश स्पष्ट होता की, भारत सीमापार मोठ्या आतंकवादी आक्रमणांना मर्यादित आणि प्रमाणबद्ध लष्करी प्रत्युत्तर देण्यासाठी कायदेशीर आधार मानतो, तसेच बाह्य देशांच्या संमतीची वाट न पहाता कारवाई करण्यासाठी भारत सज्ज आहे. असे करतांनाच ‘लक्ष्य निवड’ आणि ‘प्रमाणबद्धता’ या जागतिक निकषांचे पालनही भारत करतो. भारत स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणत्याही जागतिक शक्तीच्या अनुमतीवर अवलंबून रहाणार नाही, हे यातून स्पष्ट होते. भारताने स्वतःची कारवाई ‘दायित्वशून्य’ म्हणून दिसू दिली नाही. उलट जागतिक स्तरावर स्वीकारल्या गेलेल्या ‘आतंकवादविरोधी तत्त्वांच्या’ चौकटीत राहूनच हे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे भारताची विश्वासार्हता टिकून राहिली. ही कारवाई करतांना सर्वसामान्य नागरिकांची हानी टाळून केवळ आतंकवादी लक्ष्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे भारतावर ‘अतिरेकी कारवाई’चे आरोप झाले नाहीत. या दृष्टीकोनामुळे भारताने जगाला हे पटवून दिले की, भारत एक उत्तरदायी; पण कठोर राष्ट्र आहे, जे आपल्या सार्वभौमत्वासाठी कोणतीही तडजोड करणार नाही.
देशांतर्गत पातळीवर ‘ऑपरेशन सिंदूर’मधून एक अधिक आत्मविश्वासपूर्ण राजकीय भूमिका दिसून आली. या मोहिमेनंतर कोणताही अतीउत्साही जल्लोष किंवा प्रक्षोभक वक्तव्ये केली गेली नाहीत. त्याऐवजी यातून भारताचा ‘रणनैतिक संयम’ आणि ‘नियंत्रित संकल्प’ दिसून आला. काही वर्षांपूर्वी भारत मोठ्या आक्रमणांच्या वेळी केवळ शोक व्यक्त करून पुरावे सादर करून किंवा राजनैतिक निषेध नोंदवून उत्तर देत असे. आता ‘आपॅरेशन सिंदूर’ एका अशा नव्या आकृतीबंधात बसते, जिथे भारतीय जनता आता सरकारकडून केवळ निषेधाच्या विधानांची नाही, तर प्रत्यक्ष, दृश्य आणि मोजक्या कृतीची अपेक्षा करते.
लेखक : ब्रिगेडियर संजय अग्रवाल (निवृत्त), गृह मंत्रालयाचे माजी सुरक्षा सल्लागार, देहली.
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक