दैवी युवा साधिकांचे प्रगल्भ विचार आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. १४ विद्या आणि ६४ कला यांचा साधनेसाठी उपयोग करून सर्वांना साधनेत पुढे न्यायचे आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘आपल्याकडे १४ विद्या आणि ६४ कला एवढे साधनामार्ग सांगितले आहेत. ज्याला ज्या मार्गाची आवड असेल, त्या मार्गाने त्याला आपण पुढे न्यायचे आहे. ‘संगीताच्या माध्यमातून ‘ईश्वरप्राप्ती’ कशी करायची ? आणि व्यष्टी साधना, व्यष्टी जीवन अन् समष्टी साधना म्हणजे काय ?’ याविषयी आपल्याला लोकांना शिकवता येईल. सगळ्यांना घेऊन पुढे जायचे आहे. हे सगळे आपले आहेत.

२. दिवस चांगला किंवा वाईट कसाही गेला असला, तरी त्यातून शिकायला मिळते !

कु. शर्वरी कानस्कर

कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे) : गुरुदेव, काल रात्री झोपण्यापूर्वी एक प्रसंग घडला. आपण कधी कधी म्हणतो ना, ‘‘आजचा दिवस चांगला नाही’’, तर असे म्हणायला नको; कारण ‘प्रत्येक दिवस हा ईश्वराने दिला आहे. आपल्या प्रारब्धात जसे असेल, तसे त्या दिवशी घडले असेल. त्यामुळे त्याकडे तत्त्वनिष्ठतेने पहायचे. एखाद्या कटू प्रसंगाला सामोरे जावे लागले, तर त्यातूनही शिकता यायला हवे. त्या प्रसंगाविषयी कृतज्ञता वाटून त्या दिवसाविषयी कृतज्ञता वाटायला हवी’, असे शिकायला मिळाले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो ! कसे छान विचार आहेत ना ! दिवस वाईट गेला, तरी शिकायला मिळते आणि दिवस चांगला गेला, तरी शिकायला मिळाले. खूप छान !

३. भावजागृतीच्या केलेल्या प्रयोगात श्रीकृष्णाने लोण्याने भरलेले मडके फोडणे, म्हणजे साधिकेचे अस्तित्व नष्ट करणे

कु. शर्वरी कानस्कर : मी एक भावजागृतीचा प्रयोग केला, ‘कृष्णाला लोणी आवडते ना ! तो मडके शोधत असतांना त्याला मडके पुष्कळ उंचावर बांधलेले दिसले. कृष्णाने ते मडके फोडले आणि त्यातील लोणी खाल्ले. ते मडके, म्हणजे मी आहे. यशोदामैय्याने त्यात लोणी ठेवले आणि त्याला वर लटकून ठेवले अन् कृष्ण ते शोधायला येतो. माझी अशी स्थिती झाली आहे की, ‘देव माझ्याकडे कधी दृष्टी टाकेल ?’ नंतर कृष्णाने मडके पाहिले आणि ते फोडले. ते मडके फुटले, म्हणजे माझे अस्तित्व नष्ट झाले. कृष्णाने लोणी खाल्ले, म्हणजे माझे अस्तित्व नष्ट झाले आणि माझ्याकडून जी सेवा झाली, ती गुरुचरणी अर्पण झाली.

 सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : चांगले सांगितलेस !

४. श्रीकृष्णाचे रूप व्यापक असल्याने तो सगळ्यांच्या समवेत असतो !

कु. शर्वरी कानस्कर : आपण भाव ठेवतो, ‘कृष्ण आपल्या समवेत आहे. तो जगाचा भार सांभाळतो. तो सगळ्यांच्या समवेत आहे.’ श्रीकृष्ण कधी विचार करत नाही, ‘मी याच्या समवेत जाऊ कि त्याच्या समवेत जाऊ ?’ तो सगळ्यांच्या समवेत असतो. त्याचा व्यापक विचार असतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : खूपच छान !

५. देव अनंत कोटी ब्रह्मांडांचे कार्य पहातो आणि त्यानुसार साधिकेला नवीन ठिकाणीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप दिसणे 

कु. अपाला औंधकर

कु. अपाला औंधकर : परम पूज्य, आता आमचे सेवा करण्याचे ठिकाण पालटले आहे. आरंभी मला ते मनापासून स्वीकारता येत नव्हते. नंतर मी विचार केला, ‘आपण यात अडकायला नको. देव कणाकणात आणि चराचरांत आहेत, तर तो तिकडेही आहे.’ मी जेव्हा सेवेसाठी नवीन ठिकाणी गेले तेव्हा मला सगळीकडे तुम्हीच दिसू लागलात. मी सहसाधिकेला म्हटले, ‘‘इकडे परम पूज्यच दिसत आहेत. आपल्याला वेगळे काही वाटतच नाही.’’ आता या परिस्थितीचे काही वाटत नाही. आनंदच वाटतो. ‘आपण देवाच्या जवळच आहोत’, असे वाटते.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : खूप छान ! देव अनंत कोटी ब्रह्मांडाचे कार्य पहातो ना !’