Tamil Nadu Fraud Voting : भारतात घुसखोरी करून बनावट कागदपत्राद्वारे तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदान : २५ परदेशी नागरिकांना अटक

बहुतेक नागरिक श्रीलंकेचे !

प्रातिनिधिक छायाचित्र

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत बनावट मतदान केल्याच्या आरोपाखाली २५ परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान केल्याचा हा प्रकार समोर आला आहे.

१. पोलीस आणि ‘इमिग्रेशन’ (आगमन-निर्गमन) विभागाच्या संयुक्त कारवाईत चेन्नई, मदुराई आणि इतर विमानतळांवरून या लोकांना ते भारत सोडून परदेशात जाण्याच्या सिद्धतेत असतांना पकडण्यात आले. या परदेशी नागरिकांच्या बोटांवर मतदानानंतर लावली जाणारी पक्की शाई आढळली. यानंतर त्यांना कह्यात घेऊन चौकशी चालू करण्यात आली.

२. अन्वेषण यंत्रणांच्या मते, अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुतांश श्रीलंकेचे नागरिक आहेत, तर काही ब्रिटन आणि कॅनडा पारपत्रधारकही आहेत.

३. पोलिसांच्या माहितीनुसार अनेक संशयित निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच तमिळनाडूत आले होते आणि मतदानानंतर काही दिवस राज्यातच थांबले होते, जेणेकरून त्यांच्या बोटांवरील शाई पुसली जावी.

४. अनेक परदेशी नागरिक अजूनही भारतात असण्याची शक्यता आहे आणि अन्वेषण यंत्रणा अशा सर्व लोकांचा माहिती पडताळत आहेत, जे मतदानापूर्वी भारतात आले होते आणि अद्याप परतलेले नाहीत. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.

५. अशा प्रकारची प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. वर्ष २०२५ मध्ये ‘इमिग्रेशन’ अधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाला अनुमाने १०० परदेशी नागरिकांची नावे मतदार सूचीतून हटवण्याची विनंती केली होती.

६. अन्वेषणात असे आढळून आले होते की, परदेशी नागरिकांकडे मतदार ओळखपत्र होते आणि त्यांनी चुकीच्या पत्त्याच्या आधारे मतदानाचा अधिकार मिळवला होता. या वर्षीही अनुमाने ६० परदेशी नागरिकांची नावे मतदार सूचीतून हटवण्यात आली आहेत.

७. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार केवळ तोच परदेशी मतदार मतदान करू शकतो, ज्याने इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले नाही. अनिवासी भारतीय  मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी भारतीय नागरिकत्व कायम ठेवणे आणि मतदानाच्या वेळी मूळ भारतीय पारपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

संपादकीय भूमिका

हे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा यांना लज्जास्पद ! मुळात ते भारतात घुसलेच कसे आणि त्यांना मतदानापूर्वी अटक का झाली नाही ?, याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे !