
१. ‘अधिक मास’, म्हणजेच ‘पुरुषोत्तम मास’!
‘हिंदु कालगणनेनुसार अनुमाने प्रति ३ वर्षांनी येणारा ‘अधिक मास’ हा अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्वाचा मानला जातो. या मासाला ‘मलमास’(टीप) असेही म्हटले जाते; मात्र शास्त्रात याला ‘पुरुषोत्तम मास’ असे गौरवले गेले आहे. त्यामुळे हा मास ईश्वरभक्ती, आत्मशुद्धी आणि साधना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
(टीप : ‘मल’ या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत – अतिरिक्त किंवा साचलेला भाग, मुख्य प्रवाहाबाहेर पडलेली गोष्ट.
चांद्र वर्ष आणि सौर वर्ष यांच्यात सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो. हा फरक साचत जातो आणि साधारण ३२ – ३३ मासांनी एक अतिरिक्त मास जोडावा लागतो, तोच अधिक मास. या मासात मोठे शुभ कार्य (उदा. विवाह, गृहप्रवेश इ.) करण्याचे टाळले जात असल्याने काही ग्रंथांत त्याला ‘मलमास’, म्हणजे नियमित क्रमात अतिरिक्त आलेला मास’, असे संबोधले गेले आहे.)
२. ‘अधिक मास’ हा आध्यात्मिक उन्नती करून घेण्यासाठी मिळालेली एक विशेष संधी
चांद्र आणि सौर वर्षातील भेद भरून काढण्यासाठी अधिक मासाची रचना करण्यात आली आहे; मात्र धार्मिक दृष्टीकोनातून पहाता व्यक्तीला आध्यात्मिक उन्नती करून घेण्यासाठी मिळालेली ही एक विशेष संधी आहे. ‘या काळात मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनातील व्यस्तता थोडी न्यून करून ईश्वरस्मरण, जप, तप आणि दानधर्म यांकडे अधिक लक्ष द्यावे’, असे सांगितले जाते.

३. अधिक मासात करण्यात येणारी पुण्यकर्मे
अधिक मासात विशेषतः ‘श्रीमद्भागवत’ या पवित्र ग्रंथांचे वाचन आणि विष्णु सहस्रनामाचा जप करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. ‘या मासात केलेले अन्नदान, वस्त्रदान आणि इतर दानधर्म अनेक पटींनी फळ देतात’, असे धर्मग्रंथांत सांगितले आहे. त्याचप्रमाणे या मासात ‘ध्यान, योग आणि सत्संग’ यांद्वारे मनाची शुद्धी करून आत्मिक शांती प्राप्त करण्यावर भर दिला जातो.
४. अधिक मास हा आध्यात्मिक साधना करण्यासाठी अधिक योग्य मानला जात असणे
धर्मशास्त्रानुसार अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, नामकरण, नवीन व्यवसाय चालू करणे, यांसारखी शुभकार्ये करत नाहीत. यामागील मुख्य कारण, म्हणजे हा काळ भौतिक गोष्टींपेक्षा आध्यात्मिक साधना करण्यासाठी अधिक योग्य मानला जातो. त्यामुळे या मासात साधेपणा, संयम आणि सात्त्विक जीवनशैली स्वीकारण्यावर भर दिला जातो.
५. अधिक मास आपल्याला जीवनातील खर्या मूल्यांची जाणीव करून देतो. सततच्या धावपळीत आपण स्वतःकडे आणि ईश्वराकडे दुर्लक्ष करतो; मात्र हा मास आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतो. वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी हा मास अत्यंत उत्तम आहे.’
(संदर्भ : ‘निर्णय सिंधू’, ‘धर्मसिंधू’)
– श्री. सिद्धेश प्रकाश करंदीकर (ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिष होराभूषण), सनातन वेदपाठशाळा (१०.५.२०२६)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !