सेवाभावासह आज्ञापालन, नम्रता, त्यागी वृत्ती आणि साधकांविषयीची आत्मीयता असलेले येडशी (धाराशिव) येथील श्री. उत्तरेश्वर इंगळे (वय ७२ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

धाराशिव – येडशी (धाराशिव) येथील श्री. उत्तरेश्वर इंगळे (वय ७२ वर्षे) यांनी ६१ टक्के पातळी प्राप्त केल्‍याचे वैशाख शुक्ल नवमी (२५ एप्रिल २०२६) या दिवशी घोषित करण्‍यात आले. सनातनच्‍या ११२ व्या समष्टी संत पू. दीपाली मतकर यांनी श्री. उत्तरेश्वर इंगळे यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

श्री. उत्तरेश्वर इंगळे यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र देऊन सत्‍कार करतांना पू. दीपाली मतकर

या वेळी तुळजापूर येथे गुरुपोर्णिमेचा प्रसार करण्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या साधकांच्या बैठकीत ही आनंदवार्ता घोषित करण्‍यात आली.

पू. (कु.) दीपाली मतकर यांनी श्री. इंगळे काका यांच्या आध्‍यात्मिक प्रगतीचे गुपित उलगडतांना सांगितले, ‘‘श्री. उत्तरेश्वर इंगळे यांच्यातील सेवेची तळमळ, आज्ञापालन, नम्रता, त्यागी वृत्ती आणि साधकांविषयीची आत्मीयता हे गुण विशेष आहेत. वयाच्या ७२ व्या वर्षीही ते सेवेसाठी तत्पर राहून प्रसारसेवा भावपूर्ण करतात. लिहिता-वाचता येत नसूनही व्यष्टी साधनेचा आढावा देण्याचा प्रयत्न करणे, साधकांनी साधना करावी, यासाठी तळमळ असणे, चूक झाल्यास क्षमायाचना करणे आणि ‘मी काही करत नाही, गुरुदेवच सर्व करतात’, अशा कृतज्ञताभावात रहाणे, यांमुळे त्यांनी ६१ टक्के आध्‍यात्मिक पातळी गाठली आहे आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती होणे, ही श्री गुरूंची त्यांच्यावर असलेली कृपादृष्टीच आहे.’’

श्री. उत्तरेश्वर इंगळे

 श्री. उत्तरेश्वर इंगळे यांनी व्यक्त केलेले मनोगत

मी दगड आहे. माझ्या पत्नीचे निधन झाल्यापासून आतापर्यंत मी केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे जिवंत आहे. आता सध्या सांगण्यासारखे पुष्कळ आहे; पण ते शब्दात मी मांडू शकत नाही !


व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे आणि सेवेची तळमळ असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. उत्तरेश्वर इंगळे (वय ७२ वर्षे) !


‘२५.४.२०२६ या दिवशी येडशी, जिल्हा धाराशिव येथील श्री. उत्तरेश्वर इंगळे (वय ७२ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली. त्यांची माझ्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. दीपाली मतकर

१. ‘श्री. इंगळेकाकांचा स्वभाव अबोल असूनही सर्व साधकांना त्यांच्याविषयी जवळीक वाटते आणि काकांकडे पाहिल्यावर मन शांत होते.

२. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

अ. काकांना स्वभावदोष निर्मूलन सारणी लिहिता येत नाही. ते चुका नातवंडांकडून लिहून घेतात. ‘ऑनलाईन’ व्यष्टी साधनेचा आढावा सत्संग चालू असतांना ते नातवाला त्यांच्या चुका किंवा काही प्रसंग वाचून दाखवायला सांगतात आणि नंतर ते व्यष्टी साधनेचा आढावा देतात.

आ. काकांना कधी ‘ऑनलाईन’ व्यष्टी साधनेचा आढावा ऐकायला शक्य झाले नाही, तर ते कान पकडून क्षमायाचना करतात.

इ. एकदा ‘धाराशिव येथील साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नाहीत’, ही चूक उत्तरदायी साधकांनी लक्षात आणून दिली. ‘कोणाचीच व्यष्टी साधना होत नाही’, हे पाहून काकांनीच कान पकडून क्षमा मागितली. ‘साधकांनी साधनेचे प्रयत्न करावेत’, अशी त्यांची तळमळ असते.

३. सेवेची तळमळ

अ. काकांचे वय ७२ वर्षे असूनही ते येडशीहून धाराशिव येथे सत्संगासाठी सर्व साधकांच्या आधी येतात. काकांना सेवेसाठी सोलापूर येथे कधीही बोलावले, तर ते काही अडचण न सांगता त्वरित येतात.

आ. काका नेहमी उत्तरदायी साधकांचे आज्ञापालन करतात.

इ. त्यांचा स्वभाव अबोल असूनही ते सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण तळमळीने देत होते.

४. त्यागी वृत्ती

काका त्यांच्या शेतात पिकवलेले अधिकाधिक धान्य आश्रमात अर्पण करतात.

५. मायेची आसक्ती न्यून होणे

एकदा ते मला म्हणाले, ‘‘मला २ वर्षांपासून नातेवाइकांकडे जाऊ नये आणि मायेतील बोलू नये, असे वाटते.’’

६. कर्तेपणा नसणे

मी त्यांना ‘‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने तुमची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे’’, हा आनंददायी संदेश दिला. तेव्हा त्यांचा भाव जागृत झाला. तेव्हा त्यांनी ‘‘मी काही करत नाही. गुरुदेवच सर्व करतात’’, असे सांगून कान पकडून क्षमायाचना केली.’

– पू. दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत, वय ३७ वर्षे), सोलापूर सेवाकेंद्र (२५.४.२०२६)

नातेवाइकांचे मनोगत

श्री. बालाजी उत्तरेश्वर इंगळे (श्री. उत्तरेश्वर इंगळे यांचा मुलगा)

सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना आणि सेवा करत असतांना बाबांच्या (श्री. उत्तरेश्वर इंगळे यांच्या) स्वभावात झालेला सकारात्मक पालट अत्यंत आनंददायी आहे. पूर्वी रागीट आणि तापट स्वभाव असलेले बाबा आता सर्वांशी प्रेमाने अन् समजून बोलतात. साधनेमुळेच त्यांच्या वागण्या-बोलण्यात हा पालट झाला असल्याची अनुभूती येते. त्यांची साधना आणि आध्यात्मिक प्रगती अशीच होत राहो, तसेच त्यांनी पुढेही समष्टी सेवेसाठी अधिकाधिक वेळ द्यावा, असे वाटते. या आनंदवार्तेमुळे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता वाटते.

सौ. उज्ज्वला बालाजी इंगळे (श्री. उत्तरेश्वर इंगळे यांची सून)

साधना आणि सेवेमुळे त्यांच्यामध्ये (सासरे श्री. उत्तरेश्वर इंगळे यांच्यामध्ये ) झालेला सकारात्मक पालट पाहून अत्यंत आनंद आणि समाधान वाटते. आता ते सर्वांना समजून घेतात, प्रेमाने संवाद साधतात आणि नियमितपणे साधना, तसेच आध्यात्मिक स्तरावरील उपायही पूर्ण करतात.

त्यांच्यामध्ये झालेला हा पालट प्रेरणादायी असून, त्यांच्या सहवासातून आम्हालाही साधना वाढवण्याची प्रेरणा मिळत आहे.  त्यांच्यासारखी आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. त्यांच्या नातवानेही त्यांच्याकडून साधना, सेवा शिकून गुरुकृपा अनुभवली पाहिजे, असे वाटते. ही आनंदवार्ता ऐकून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.