मतीन पटेल याचे अनधिकृत घर पुन्हा बांधण्याची एम्.आय.एम्.’चे नेते इम्तियाज जलील यांची दर्पोक्ती !

धर्मांधांना पाठीशी घालणार्‍या इम्तियाज जलील यांचा थयथयाट !

मतीन पटेल यांचे पाडलेले घर पुन्हा बांधून देण्याची इम्तियाज जलील (मध्यभागी) यांची दर्पोक्ती !

छत्रपती संभाजीनगर – ‘एम्.आय.एम्.’चे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत बांधकामावर प्रशासनाने बुलडोझर चालवल्याच्या कारवाईचा एम्.आय.एम्. पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी निषेध करत ‘पाडलेले घर पुन्हा बांधू’, अशी दर्पोक्ती केली आहे. नारेगाव परिसरातील समर्थकांशी संवाद साधतांना जलील म्हणाले की, न्यायालयाने ७ दिवसांचा अवधी दिला असतांना २४ घंट्यांत कारवाई का केली ? शहरात ४० टक्के अनधिकृत बांधकामे असतांना केवळ मतीन पटेल यालाच लक्ष्य केले आहे. तुम्ही घर पाडू शकता; मात्र घर बांधण्याची ताकद आमच्यामध्ये आहे.

निदा खान प्रकरणी इम्तियाज जलील हेच मुख्य सूत्रधार ! – पालकमंत्री संजय शिरसाट

जलील यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, मतीन पटेल हा केवळ एक छोटा प्यादा असून निदा खान हिला शहरात आणण्यामागे आणि लपवण्यामागे इम्तियाज जलील हेच मुख्य सूत्रधार आहेत.

जलील हे इस्लामचे नाव घेऊन केवळ लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. निदा खान हिला संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यामागे जलील यांचाच हात आहे. जलील हे इस्लामला मानत असतील, ‘कुरान शरीफ’ला मानत असतील, तर त्यांनी त्यावर हात ठेवून ‘निदा खानला मी शहरात आणले नव्हते, असे सांगावे’, असे आव्हान त्यांनी केले आहे.

हे वाचा → छत्रपती संभाजीनगरमध्ये नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर बुलडोझर !

मतीन पटेल याच्या कुटुंबियांकडून नाटकी कृती करून सवंग लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न

कारवाईच्या वेळी मतीन पटेलच्या कुटुंबियांनी महानगरपालिका पथकाचे हार घालून स्वागत करण्याचा ‘वेगळाच’ पवित्रा घेतला होता; मात्र प्रशासनाने कोणत्याही दबावाला न बधता हे अनधिकृत घर पाडले.

‘जिहाद’कराल, तर मुख्यमंत्र्यांचा बुलडोझर चालणारच ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री

श्री. नितेश राणे

महाराष्ट्रात कायदा हातात घेणार्‍यांची गय केली जाणार नाही. जर कुणी ‘जिहाद’ पसरवण्याचा प्रयत्न केला, तर ‘देवाभाऊंचा’ (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा) बुलडोझर चालल्याविना रहाणार नाही’, अशी चेतावणी मंत्री नितेश राणे यांनी १३ मे या दिवशी दिली.

‘जिहाद’चा मुख्य सूत्रधार कारागृहात हवा !

नाशिक येथील धर्मांतर (जिहाद) प्रकरणावर भाष्य करतांना नितेश राणे म्हणाले, ‘‘एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील हे नाशिक प्रकरणाचा खरे ‘मास्टरमाईंड’ (मुख्य सूत्रधार)आहेत. जे लोक ‘महाराष्ट्र को हरा कर देंगे’ (महाराष्ट्राला हिरवे करून टाकू), अशा वल्गना करतात, त्यांची जागा बाहेर नाही, तर कारागृहातच आहे. हे प्रकरण लवकरच उघड होईल.

प्रशासनाकडून ‘घाण’ साफ करण्यास प्रारंभ ! – संजय केनेकर, भाजपचे नेते

भाजपचे नेते संजय केनेकर यांनीही या कारवाईचे स्वागत करत प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अंततः शहरातील ‘घाण’ स्वच्छ करण्यास प्रारंभ केला आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य विचारांवर चालणारे आहे.

येथे धर्मांधांचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. ‘एम्.आय.एम्.’चा नगरसेवक मतीन पटेल याच्यावरील कारवाई हा केवळ एक प्रारंभ आहे. एम्.आय.एम्. देशामध्ये अराजकता माजवू पहात आहे. त्यांना दिलेला हा पहिला चोप आहे. जलील यांनी मतीन पटेल याला बंगला बांधून द्यावे नाही, तर काहीही द्यावे; पण अवैध काम करणार्‍यावर सरकार कारवाई करणारच.