खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून होणारी लूटमार थांबवण्यासाठी राज्य सरकार कायदा करणार !

  • अनेक वर्षांपासूनच्या ‘सुराज्य अभियाना’च्या मागणीला यश !

  • परिवहनमंत्र्यांकडून ‘सुराज्य अभियाना’च्या शिष्टमंडळाला आश्वासन !

डावीकडून श्री. सतीश सोनार, डॉ. अंजेश कणगलेकर, परिवहनमंत्री श्री. प्रताप सरनाईक, श्री. अभिषेक मुरुकटे, श्री. सुनील घनवट आणि श्री. अरविंद पानसरे

मुंबई – खासगी प्रवासी वाहतूकदारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.च्या) दरापेक्षा ५० टक्के अधिक तिकीट दर घेण्याचा शासननिर्णय आहे. तरीही उन्हाळी सुट्टी, गणेशोत्सव, दिवाळी अशा सणांच्या काळात खासगी बस वाहतूकदार आणि ऑनलाईन प्रवासी खासगी ॲप्स अवाच्या सवा दर आकारून प्रवाशांची लूटमार करत आहेत. या लूटमारीला चाप लावण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असून आगामी अधिवेशनात तो मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आश्वासन राज्याचे परिवहनमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी ‘सुराज्य अभियाना’च्या शिष्टमंडळाला दिले. ‘सुराज्य अभियाना’ने गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

बैठकीतील अन्य महत्त्वाचे निर्णय आणि मागण्या !

मान. परिवहनमंत्री श्री. प्रताप सरनाई यांच्यासोबत बैठकीमध्ये सहभागी सुराज्य अभियानाचे शिष्टमंडळ

१. प्रवाशांची लूटमार थांबवण्यासाठी शासकीय समिती स्थापन करण्यात येईल. त्यात सुराज्य अभियानाच्या ३ प्रतिनिधींचा समावेश केला जाईल.

२. ‘रेड बस’, ‘मेक माय ट्रिप’ यांसारखी एकूण १८ खासगी प्रवासी ‘ॲप्स’ बंद करण्याची सूचना पुणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी ६ मार्च २०२४ या दिवशी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. त्याची कार्यवाही करण्याची मागणी ‘सुराज्य अभियाना’ने केली होती. यावर मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

३. स्थानकांवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृहांची सुविधा सुधारण्यासाठी लागू करण्यात आलेल्या २ टक्के अधिभाराचा विनियोग केला जाईल.

४. ‘बेस्ट’ आणि ‘एस्.टी.’ बसगाड्यांमधील सूचनांमधील मराठी भाषेच्या व्याकरणाच्या चुका सुधारण्याचे आश्वासनही मंत्र्यांनी दिले.

५. महामंडळाच्या बस आगारातील ७० टक्के दूरभाष सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना एस्.टी. सेवेचे अपक्षित लाभ मिळत नाहीत, या समस्येवर परिवहनमंत्री श्री. सरनाईक यांनी मंडळाच्या अधिकार्‍यांना ‘टोल फ्री’ क्रमांक चालू करण्याचा आदेश दिला.

सुराज्य अभियानाचे प्रसिद्धीपत्रक

बैठकीस उपस्थित मान्यवर आणि पदाधिकारी !

मंत्रालयात परिवहन विभागाशी संबंधित विविध विषयांवरील आयोजित बैठकीत  परिवहनमंत्री श्री. प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाचे अधिकारी, तसेच हिंदु जनजागृती समितिचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे, समन्वयक डॉ. अंजेश कणगलेकर, श्री. सतीश सोनार, श्री. रवी नलावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘सुराज्य अभिया’न निष्काम भावनेने कार्यरत आहे ! – परिवहनमंत्री, प्रताप सरनाईक

परिवहनमंत्री सरनाईक पुढे म्हणाले की,

‘सुराज्य अभिया’न गेल्या काही वर्षांपासून परिवहन विभागातील अनेक समस्या सोडवण्यासाठी अत्यंत निष्काम भावनेने प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. ‘सुराज्य अभियाना’ने केलेल्या सखोल अभ्यासाचा परिवहन विभागाला निश्चितच लाभ होईल.

सुराज्य अभियानाचा पत्ता

सुराज्य अभियान

टपालाचा पत्ता : श्री. अभिषेक मुरुकटे, ‘सुखठणकर रिट्रिट’, फ्लॅट क्र. एजी-४, चित्तार भाट, नागेशी, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संपर्क : ९८६७५५८३८४

ई-मेल : [email protected]

वेबपेज  : hindujagruti.org/surajya-abhiyan

‘एक्स’ खाते : @SurajyaAbhiyan

Instagram : surajyaabhiyan