सनातनच्या साधक विद्यार्थ्यांचे परीक्षेतील सुयश !

कु. आर्या तुपे, पनवेल 

कु. आर्या विजय तुपे

खांदा वसाहत, पनवेल येथील सनातनची साधिका कु. आर्या विजय तुपे हिने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८७.२० टक्के गुण प्राप्त केले आहेत. ती ‘महात्मा स्कूल ऑफ ॲकॅडमिक्स अँड स्पोर्टस्’ या शाळेत शिकते. या यशाविषयी कु. आर्या म्हणाली, ‘‘अभ्यासामध्ये एकाग्रता यावी, यासाठी अभ्यास करण्यापूर्वी मी श्री गणेशाचा नामजप करायचे आणि अथर्वशीर्ष म्हणायचे. श्री गणेश आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करायचे.’’

कु. आर्या अभ्यास सांभाळून सेवेत आईला साहाय्य करते. प्रासंगिक सेवेत सहभागी होते आणि सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमातही सेवेला जाते.


कु. स्नेहल चव्हाण, कारंजा (जिल्हा वाशीम) 

कु. स्नेहल चव्हाण

कु. स्नेहल चव्हाण हिने १० वीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवून सुयश प्राप्त केले आहे. तिला ‘संस्कृत’ विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तिच्या कुटुंबातील सर्वजण साधना करणारे असल्याने तिला अभ्यासाच्या संदर्भात त्या सर्वांचे आध्यात्मिक स्तरावर साहाय्य झाले. श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्या कृपेमुळे गुण मिळाल्याचा तिचा भाव आहे.


 कु. रिद्धी धोटे, कारंजा (जिल्हा वाशीम)

कु. रिद्धी धोटे

कु. रिद्धी धोटे हिला दहावीच्या परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळाले. प्रार्थना, अथर्वशीर्ष, गणपतिस्तोत्र म्हटल्याने आणि गुरुदेवांच्या कृपेमुळे यश मिळाल्याचा तिचा भाव आहे.


कु. रुद्र विनोद गायकवाड, विरार (जिल्हा पालघर)

कु. रुद्र विनोद गायकवाड

कु. रुद्र विनोद गायकवाड याला आय्.सी.एस्.सी. अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार्‍या दहावीच्या परिक्षेत ८९.४ टक्के गुण मिळाले. त्याला मराठी विषयात १००  पैकी १०० गुण मिळाले आहेत. कु. रुद्र ‘नॅशनल इंग्लिश स्कूल, वसई’ या शाळेत शिकत आहे. कु. रुद्रची आई सौ. विभूती आणि वडील श्री. विनोद हे विरार येथे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. कु. रुद्र हा नामजप करणे, प्रासंगिक सेवांमध्ये साहाय्य करणे यांसह सुटीच्या काळात सनातन आश्रमात जाऊन सेवा करतो. ‘अभ्यास नियमित करणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा यांमुळे हे यश मिळाले’, असे कु. रुद्र याने व्यक्त केले.


अकोला येथील कु. जयश्री अग्रवाल हिचे सुयश !

कु. जयश्री योगेश अग्रवाल

अकोला – हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि सनातन संस्था यांच्या धर्मकार्यात निःस्वार्थपणे समर्पित असणारे अकोला येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. योगेश अग्रवाल यांची कन्या कु. जयश्री योगेश अग्रवाल हिला दहावीच्या परिक्षेत ९८.२० टक्के गुण मिळाले आहेत. तिने संस्कृत, गणित आणि विज्ञान या विषयांत १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.


कु. विराज गिरीश धूत, पुणे

कु. विराज धूत

कु. विराज धूत याने दहावीच्या परीक्षेत ९७.२० टक्के गुण मिळवले. परीक्षेच्या कालावधीत त्याने नियमित हनुमानचालिसा, तसेच गणेशस्तोत्र आणि अथर्वशीर्ष पठण केले. जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा तो त्याच्या वडिलांसोबत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरण सेवेसाठी जातो.


कु. पार्थ क्षितिज क्षीरसागर, पुणे

कु. पार्थ क्षीरसागर

कु. पार्थ क्षीरसागर याने दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवले. या यशाविषयी सांगतांना त्याने सांगितले की, तो सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असायचा. तसेच नियमित गणेशस्तोत्र आणि अथर्वशीर्ष म्हणणे, श्री दगडूशेठ गणपति दर्शनाला जाणे, वेळ मिळेल तेव्हा देवतांची चित्रे काढणे केले. या प्रकारे त्याने आध्यात्मिक प्रयत्न करून मनाची एकाग्रता साधली आणि परीक्षेत यश मिळवले.


कु. पार्थ संभाजी मोरे, पुणे

कु. पार्थ मोरे

कु. पार्थ मोरे याने दहावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवले. या यशाविषयी त्याने श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. वडिलांना दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वितरणाच्या सेवेत साहाय्य करणे अन् प्रासंगिक सेवा करणे, प्रार्थना, कृतज्ञता, नामजपादी उपाय, रामरक्षा, मारुतिस्तोत्र म्हणणे इत्यादी आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न केल्यामुळे त्याला हे यश मिळाले.


कु. अलोक घाडगे, सांगली

कु. अलोक घाडगे

‘श्रीराम मालू हायस्कूल’चा विद्यार्थी आणि सनातनच्या साधिका श्रीमती सुनंदा रंगराव घाडगे यांचा नातू कु. अलोक घाडगे इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९७.२० टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला. हे उज्ज्वल यश प्राप्त केल्याविषयी कु. अलोकचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, पालक आणि शिक्षक यांचे मार्गदर्शन, गुरुदेवांवरील श्रद्धा यांमुळे त्याला हे यश मिळाले. प्रसाद पोचवणे, अर्पण पावत्या पोचवणे आदी प्रासंगिक सेवा तो आनंदाने करतो. शाळेमध्ये, तसेच शिकवणीला जातांना तो नेहमी गुरुदेवांना प्रार्थना करत असे. त्याला मिळालेल्या या यशाविषयी त्याने गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.


कु. आदित्य रवींद्र बुधवंत विद्यालय आणि पाथर्डी येथे प्रथम !

कु. आदित्य बुधवंत

कु. आदित्य बुधवंत याला इयत्ता १० वीच्‍या परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळाले आहेत. तो शिरापूर, ता. पाथर्डी येथील ‘श्री तिलोक जैन विद्यालय’ येथे शिकत होता. विद्यालयात आणि पाथर्डी तालुक्यात त्याचा प्रथम क्रमांक आला आहे. तो नियमित नामजप, व्यष्टी साधना करतो. कु. आदित्य सनातनच्या रामनाथी आश्रमातील संगीत शिबिरात सहभागी झाला होता.


पुणे येथील कु. चिन्मय चिंतामणी मुजुमले ७४.६७ टक्के गुणांसह बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण !

कु. चिन्मय मुजुमले

कु. चिन्मय मुजुमले याने बारावीच्या परीक्षेत ७४.६७ टक्के गुण मिळवले. ऑनलाईन सत्संगामध्ये भ्रमणभाष, भ्रमणसंगणक इत्यादी ‘स्क्रीन शेअरिंग’ची सेवा करणे, तसेच  गुरुदेवांची कृपा आणि त्यांच्याशी अनुसंधान यांमुळे तो हे यश गाठू शकला.

मिळालेल्या यशासाठी ‘सनातन प्रभात’कडून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन !