म्हापसा येथील तार नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला वेग

  • १ सहस्र हेक्टर शेतीला मिळणार दिलासा
  • डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

म्हापसा, ५ मे (वार्ता.) – म्हापसा येथील तार नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला वेग आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ५ मे या दिवशी स्वत: होडीतून कामाची प्रत्यक्ष पहाणी केली आणि अधिकार्‍यांना काम वेळेत अन् दर्जेदार करण्याचे निर्देश दिले. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या वेळी जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता सालेलकर आदींची उपस्थिती होती.

पावसाळ्यात वारंवार गिरी परिसरातील अनुमाने १ सहस्र हेक्टर शेतभूमी पाण्याखाली जात असते आणि यामुळे शेतीची हानी होत असते. तार नदीच्या महत्त्वाकांक्षी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामामुळे या शेतीला आता दिलासा मिळणार आहे. कामाची पहाणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील शेती पुन्हा ओलिताखाली येणार आहे. शेतकर्‍यांना वर्षाला २ पिके घेणे शक्य होणार आहे. यंदाच्या पावसाळी हंगामाच्या पूर्वी शेतकर्‍यांना कृषी खात्याकडून आवश्यक ते सहकार्य देण्यात येणार आहे.’’

नदी स्वच्छ ठेवा !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘नागरिकांनी नदीत कचरा टाकू नये आणि नदी स्वच्छ ठेवावी. परिसर स्वच्छ ठेवावा. नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर टाळावा.’’

राज्यात १०० बंधारे उभारणार ! – जलस्रोतमंत्री शिरोडकर

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘राज्यात अशाच स्वरूपाचे अनेक जलसंधारण प्रकल्प बांधले जात आहेत. मागील २ वर्षांत अनुमाने १०० बंधार्‍यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. याचा लाभ ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना होणार आहे. योग्य मशागत केल्यास या भूमीतून अनुमाने २० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.’’

काय आहे तार नदी पुनरुज्जीवन प्रकल्प ?

बस्तोडा येथे उगम पावणारी नदी अनुमाने ८ किलोमीटर वहात जाऊन तार नदीला मिळते. नदीतील गाळ काढून या नदीचे पात्र स्वच्छ करण्यात येत आहे. आवश्यक ठिकाणी नदीची रुंदी वाढवण्यात येत आहे. त्याचबरोबर बांधाचे कामही हाती घेण्यात आले आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याचा प्रश्न अल्प होणार आहे. हा प्रकल्प शेती आणि जलव्यवस्थापन या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तार नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामाची पहाणी करतांना  डॉ. प्रमोद सावंत,  मंत्री सुभाष शिरोडकर,  आमदार केदार नाईक आणि प्रशासकीय अधिकारी