बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. दिलीप कागवाड (वय ६८ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या शेवटच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे !

२३.४.२०२६ या दिवशी बेळगाव येथील दिलीप पार्श्वनाथ कागवाड (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६८ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या शेवटच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. दिलीप कागवाड

१. श्रीमती आशा कागवाड (कै. दिलीप कागवाड यांच्या पत्नी), बेळगाव

श्रीमती आशा कागवाड

१ अ. गुरुकृपेने अमेरिकेला जाऊन भारतात सुखरूप परतणे आणि अमेरिकेत मुलाची शेवटची भेट होणे : ‘मागील ६ वर्षे आम्ही यजमानांच्या (दिलीप कागवाड यांच्या) प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमेरिकेला मुलाकडे (श्री. प्रशांत याच्याकडे) जाऊ शकलो नव्हतो. आता २६.११.२०२५ ते १७.४.२०२६ या कालावधीमध्ये गुरुदेवांच्या कृपेने आम्ही अमेरिकेला जाऊन भारतात सुखरूप परतलो. त्या निमित्ताने गुरुदेवांनी आम्हा कुटुंबियांना एकत्र रहाण्याचा आनंद दिला; अन्यथा या कठीण प्रसंगामुळे अमेरिकेतील मुलगा प्रशांत याची भेट होऊ शकली नसती.

१ आ. अमेरिकेतील घराची शुद्धी करणे : आमचा मोठा मुलगा श्री. प्रशांत याने अमेरिकेत घर घेतले होते. यजमानांना वाटत होते, ‘या वास्तूमध्ये पूर्वी रहाणारे लोक कसे होते ?’, हे आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळे वास्तूची शुद्धी व्हायला हवी.’ यासाठी यजमान प्रत्येक खोलीमध्ये भ्रमणभाषवर सतत नामजप लावून ठेवायचे. एकदा मुलाने यजमानांना विचारले, ‘‘लहान आवाजात नामजप लावल्याने काय लाभ होणार ?’’ त्यावर यजमान म्हणाले, ‘‘नामजप हा गुरुदेवांचा प्रसाद आहे. या जपामुळे वास्तूची शुद्धी होणार आहे. तुम्हीही नामजप करा.’’ ते घरामध्ये आणि घराच्या भोवती गोमूत्र शिंपडत असत. गोमूत्र शिंपडत असतांना ते ‘घराभोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे. या वास्तूमध्ये कोणत्याही वाईट शक्तींचा त्रास व्हायला नको’, अशी प्रार्थना करत असत.

१ इ. मुलाच्या मित्रांशी जवळीक साधणे : प्रशांतचे मित्र यजमानांना भेटायला आले की, ते त्यांच्याशीही मोकळेपणाने बोलत असत. एकदा प्रशांतचे मित्र म्हणाले, ‘‘काकांकडे जादू आहे. त्यांच्याशी बोलावेसे वाटते. आम्ही त्यांच्याकडे खेचले जातो. ‘त्यांच्याशी बोलतांना आम्ही वडिलांशीच बोलत आहोत’, असे वाटते. ते इकडे आले की, आम्हालाही आनंद जाणवतो. तू त्यांना आमच्याकडे घेऊन ये.’’

१ ई. भावपूर्ण प्रार्थना करणे

१. मुलगा, सून आणि नातवंडे यांच्यासाठी यजमान नेहमी पुढीलप्रमाणे प्रार्थना करत होते – ‘सर्वांना अध्यात्म काय आहे ?’, याची जाणीव होऊ दे. त्यांना गुरुदेवांचे अस्तित्व जाणवू दे. ‘गुरुदेवांनी त्यांना सर्व चांगले दिले आहे’, त्याबद्दल त्यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त होऊ दे.’

२. ते येणार्‍या आपत्काळाविषयीची सर्व सूत्रे मुलाला सांगण्यापूर्वी गुरुदेवांच्या चरणी पुढील प्रार्थना करत असत, ‘तुम्हीच त्याला समजावा. त्याच्याकडून योग्य ती कृती करून घ्या. त्याला जे सांगणे अपेक्षित आहे, तेच मला सुचवा.’ ते मुलालाही नेहमी प्रार्थना आणि नामजप करण्यास सांगत असत.

१ उ. ते आमच्या नाती कु. मायरा (वय ८ वर्षे) आणि चि. मानवी (वय ४ वर्षे) यांच्याकडून प्रतिदिन कापूर अन् अत्तर यांचे उपाय करून घेत असत.

१ ऊ. मुलाला ‘गुरुदेवच सर्व करतात’, असा भाव ठेवण्यास सांगणे : अमेरिकेला जाण्याचे आमचे आरक्षण झाल्यानंतर प्रशांतला जे घर घ्यायचे होते, त्याचा व्यवहार अंतिम झाला. ‘वडिलांमुळे एवढी चांगली वास्तू मिळाली’, असे मुलाला वाटत होते. आम्ही अमेरिकेत असतांना ते प्रशांतला नेहमी सांगत असत, ‘‘सर्व गुरुदेव करतात आणि गुरुदेवच करणार आहेत. तू गुरुदेवांवर विश्वास ठेव. तुझा हात ते कधी सोडणार नाहीत. मला गुरुदेवांनी अनेक कठीण प्रसंगांतून बाहेर काढले आहे. माझे उदाहरण समोर ठेवून तुम्ही गुरुदेवांचा हात धरून ठेवा.’’

२. वैद्या माया पाटील (कै. दिलीप कागवाड यांची मेहुणी (पत्नीची बहीण)), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

वैद्या माया पाटील

२ अ. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे

२ अ १. हृदयविकाराचा तीव्र त्रास असतांनाही ‘गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा आणि भाव’, यांच्या बळावर अमेरिकेचा प्रवास करणे : ‘वर्ष २०२२ मध्ये भावोजींना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला होता. तो त्यांना समजला नव्हता. त्यानंतर काही मासांनी त्यांना शारीरिक त्रास होऊ लागला; म्हणून ते रुग्णालयात गेले. तेव्हा सर्व तपासण्या केल्यानंतर ‘त्यांच्या हृदयाची क्षमता न्यून झाली आहे’, हे लक्षात आले. त्यांचा एल्.व्ही.ई.एफ्. (टीप) २० टक्के होता. (निरोगी व्यक्तीमध्ये हे प्रमाण ५५ ते ७० टक्के असते. ४० टक्क्यांपेक्षा अल्प क्षमता, म्हणजे हृदय दुर्बळ असल्याचे लक्षण असते.)

टीप – एल्.व्ही.ई.एफ्. : ‘हृदयाच्या डाव्या बाजूच्या खालच्या कप्प्यातून प्रत्येक ठोक्याला किती टक्के रक्त शरिरात ढकलले जाते ?’, हे मोजण्याचे परिमाण

त्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार चालू केले. ते त्यांची प्रकृती अतिशय सांभाळून असत. औषधोपचाराच्या समवेत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनीही भावोजींना नामजपादी उपाय सांगितले होते. भावोजींनी नामजपाचे उपाय चालू केल्यानंतर काही मासांनी त्यांचा एल्.व्ही.ई.एफ्.२८ टक्के झाला आणि पुढे ३२ टक्क्यांपर्यंत वाढला. त्या वेळी त्यांच्यावर उपचार करणारे आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘हे केवळ तुमच्या गुरूंच्या कृपेमुळे झाले आहे. वैद्यकीय उपचारांनी एवढा पालट होऊ शकत नाही.’’

भावोजींची गुरुदेवांवर दृढ श्रद्धा होती. या प्रसंगानंतर दृढ श्रद्धेच्या समवेतच त्यांच्यातील कृतज्ञताभावामध्ये पुष्कळ वाढ झाली. त्यांची ‘नामजप आणि गुरुदेव यांच्यामुळेच सर्वकाही होते’, ही श्रद्धा आणखी दृढ झाली. प्रत्येक क्षणी ‘मी केवळ गुरुदेवांच्या कृपेने जिवंत आहे’, असे त्यांना वाटत होते. काहीही त्रास झाला, तर ते प्रथम नामजपादी उपाय विचारत असत आणि ते पूर्ण करत. ते वैद्यांनी दिलेले औषधोपचार नियमितपणे घेत होते; परंतु ‘माझी प्रकृती गुरुदेवांच्या हातात आहे. माझा श्वास त्यांच्यामुळे चालू आहे’, असा त्यांचा भाव होता. भावोजींनी हृदयाची क्षमता ३२ टक्के असतांना केवळ गुरुदेवांची कृपा आणि त्यांची इच्छाशक्ती यांच्या बळावरच अमेरिकेचा प्रवास सुखरूपपणे केला.

२ अ २. अमेरिकेतील साडेचार मासांच्या वास्तव्यात कोणताही त्रास न होणे : १९.४.२०२६ या दिवशी माझे भावोजी दिलीप कागवाड आणि बहीण आशा कागवाड अमेरिकेहून देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमामध्ये आले. त्यांचा अमेरिकेचा प्रवास आणि तेथील साडेचार मासांचे वास्तव्य यांमध्ये त्यांना कोणताही शारीरिक किंवा आध्यात्मिक त्रास झाला नाही.

२ अ ३. संतांचा सत्संग आणि देवद आश्रमातील चैतन्य यांमुळे आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे : ते देवद आश्रमामध्ये ३ दिवस होते. या कालावधीमध्ये त्यांची आश्रमातील साधक आणि संत यांच्याशी भेट झाली. ‘त्यांना संतांचा सत्संग आणि आश्रमातील चैतन्य मिळाल्यामुळे आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ झाला’, असे मला जाणवले.

२ अ ४. त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात भरती केल्यावर चेहर्‍यावरील तेज पुष्कळ वाढल्याचे जाणवणे : २१.४.२०२६ या दिवशी मध्यरात्री भावोजींना त्रास होऊ लागला. त्रासाची तीव्रता पाहून त्यांना पनवेल येथील एम्.जी.एम्. रुग्णालयामध्ये भरती केले. भावोजींना रुग्णालयामध्ये भरती केल्यावर काही घंट्यांनंतर त्यांच्या चेहर्‍यावरील तेज पुष्कळ वाढल्याचे जाणवले. त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवले होते. त्या वेळी ‘त्यांचा चेहरा पाहिल्यावर ते रुग्णाईत आहेत’, असे वाटत नव्हते.

२ अ ५. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी वेळोवेळी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे आध्यात्मिक अडथळे दूर होणे : २२.४.२०२६ या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी भावोजींसाठी नामजपादी उपाय सांगितले. त्यांनी सांगितलेला नामजप पूर्ण झाल्यानंतर आम्ही सद्गुरु दादांना तसे कळवत होतो. त्यानंतर ते सूक्ष्म परीक्षण करून पुन्हा दुसरा नामजप सांगत असत. याचा परिणाम म्हणून भावोजींच्या शरिरावरील वाईट शक्तीचे त्रासदायक आवरण दूर झालेले जाणवत होते. त्यांचा चेहरा पुष्कळ तेजस्वी दिसत होता. रुग्णालयात असूनही त्यांच्या जवळ गेल्यानंतर कोणताचा आध्यात्मिक त्रास जाणवत नव्हता. ‘ते शांत झोपले आहेत’, असे जाणवत होते.

२ आ. हृदयविकाराचा झटका येऊन निधन होणे : २३.४.२०२६ या दिवशी सायंकाळनंतर सद्गुरु दादांना भावोजींसाठी नामजपादी उपाय शोधूनही मिळत नव्हते. ‘भावोजींची सर्व चक्रे शांत होत आहेत’, असे त्यांना जाणवत होते. सद्गुरु दादांनी भावोजींसाठी नामजप न करता केवळ गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) स्मरण आणि प्रार्थना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही चालू केले. उपचार चालू असतांना पहाटेच्या वेळी भावोजींना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर मिळालेल्या औषधोपचाराला त्यांच्या शरिराने प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वास घेण्याच्या यंत्रणेवर) ठेवण्यात आले. त्यानंतर गुरुवार, २३.४.२०२६ या दिवशी त्यांचे निधन झाले.

२ इ. ‘सनातनचे साधक, म्हणजे एक कुटुंब आहे’, हे अनुभवणे : भावोजींची प्रकृती अकस्मात् बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. त्या वेळी साहाय्यासाठी लगेच कुणी नातेवाईक येणे शक्य नव्हते. त्या वेळी आश्रमातील साधकांनी सर्व साहाय्य केले.

पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत, वय ३६ वर्षे) यांनी ‘कोणतेही साहाय्य लागल्यास लगेचच सांगा’, असे सांगून मोठा आधार दिला. ‘आम्ही सनातनच्या आश्रमात आहोत, म्हणजे काही काळजी नाही’, असेच आम्हाला वाटत होते. कलियुगामध्ये असे विशाल कुटुंब केवळ गुरुदेवांमुळेच मिळू शकले.

२ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली असीम कृपा ! :

१. भावोजींना देवद आश्रमामध्ये शारीरिक त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयामध्ये जाण्यासाठी लगेचच वाहन उपलब्ध झाले.

२. एम्.जी.एम्. रुग्णालयामध्ये लगेचच वैद्य भेटले आणि उपचार चालू झाले.

३. त्या रात्री भावोजी बेळगाव येथे जाण्यासाठी निघणार होते; परंतु ‘थकवा’, हे एक कारण झाल्यामुळे त्यांचे बेळगाव येथे जाण्याचे रहित झाले.

४. अमेरिका येथून मुलाच्या घरातून भारतामध्ये पोचण्याच्या साधारण २८ घंट्यांच्या प्रवासामध्ये कुठेच त्यांना त्रास झाला नाही. या प्रवासामध्ये बहीण आणि भावोजी दोघेच होते.

घडलेल्या सर्व प्रसंगामध्ये आम्ही गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) कृपा क्षणोक्षणी अनुभवली. गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

‘गुरुकृपा, भाव आणि श्रद्धा कशी कार्य करते ?’, हे भावोजींच्या उदाहरणातून मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. ‘आम्हा सर्वांमध्ये भावोजींप्रमाणे भाव आणि दृढ श्रद्धा निर्माण होऊ दे’, अशी मी गुरुदेवांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.४.२०२६)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक