२३.४.२०२६ या दिवशी बेळगाव येथील दिलीप पार्श्वनाथ कागवाड (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६८ वर्षे) यांचे निधन झाले. ५.५.२०२६ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात झालेले पालट आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. श्रीमती आशा कागवाड (कै. दिलीप कागवाड यांच्या पत्नी), बेळगाव

१ अ. अमेरिका येथे गेल्यावर यजमानांमध्ये झालेले पालट ! : ‘मी आणि यजमान (दिलीप पार्श्वनाथ कागवाड) २६.११.२०२५ ते १७.४.२०२६ या कालावधीत अमेरिकेला गेलो होतो. तेथे आम्ही माझा मुलगा श्री. प्रशांत, सून सौ. सहाना अन् ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नाती कु. मायरा (वय ८ वर्षे) आणि चि. मानवी (वय ४ वर्षे) यांच्याकडे राहिलो होतो. ‘या कालावधीमध्ये यजमानांमध्ये गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने झालेले पालट’ मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.
१ अ १. अमेरिकेला गेल्यानंतर यजमानांचा स्वभाव पुष्कळ शांत झाला होता.
१ अ २. मायेपासून अलिप्त होणे : ते मायेतून अलिप्त झाले होते. बाहेर जेवायला गेल्यानंतरही ते स्वतःसाठी काही वेगळे मागवत नव्हते. ते ‘तुम्हाला काय हवे, ते मागवा. तेच मी खाईन’, असे म्हणत असत. एरव्ही ते त्यांच्या आवडीचे पदार्थ मागवण्यास सांगत असत.
१ अ ३. त्यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयीचे प्रवचन भ्रमणभाषवर सतत ऐकणे, तसेच नामजप ऐकणे’, यांतच आनंद वाटत होता.
१ अ ४. मायेतील न बोलता गुरुदेवांविषयी बोलणे : त्यांना मायेतील बोलण्यात रुची नव्हती. अमेरिकेमध्ये यजमान, मी आणि मुलगा प्रशांत, असे सर्व जण बोलत असतांना बहुतांश वेळा ते गुरुदेवांविषयीच बोलत असत किंवा ‘गुरुदेवांनी आपल्याला किती दिले आहे’, हे सांगत असत.
१ अ ५. ते नातींना नामजपाची आठवण करून देत असत. ते नातींकडून प्रतिदिन १० मिनिटे नामजप करून घेत असत.
१ अ ६. कृतज्ञताभावात असणे : अमेरिकेतील मुलाचे सर्व वैभव आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या दोन्ही नाती पाहून त्यांना सतत कृतज्ञता वाटत असे. सुनेने त्यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ काही मागवल्यास ते लगेचच तिच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करत असत.
१ अ ७. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असणे : एकदा प्रशांत आम्हाला म्हणाला, ‘‘मी नोकरी करत असलेल्या आस्थापनातील ३० सहस्र व्यक्तींना नोकरीवरून काढून टाकले.’’ तेव्हा एक क्षण मी घाबरले; परंतु यजमान म्हणाले, ‘‘प्रशांतसाठी जे योग्य आहे, ते गुरुदेव करणार आहेत. ‘आतापर्यंत गुरुदेवांनी आपल्यासाठी काय काय केले आहे’, ते आठव.’’ हे ऐकून मुलालाही धीर आला आणि तो शांत झाला. हे संभाषण संपल्यावर सून म्हणाली, ‘‘मला नोकरीत बढती मिळाली आहे’, असा ई-मेल आला आहे.’’ त्यावर यजमान म्हणाले, ‘‘गुरुदेव कसा आनंद देतात’, हे बघा.’’ त्यांचा ठाम विश्वास होता की, गुरुदेव आपल्यासाठी जे योग्य आहे, तेच करणार. ‘जरी मुलाची नोकरी गेली, तरी त्यातूनही पुढे चांगलेच होणार असेल’, अशी त्यांची ठाम श्रद्धा होती.
गुरुदेवांनी मला अनेक गुण असणारे पती दिले. ‘त्यांच्यासारखा भाव माझ्यात येऊ दे आणि माझ्याकडून त्यांच्यासारखे भावजागृतीचे प्रयत्न होऊ दे’, अशी मी गुरुदेवांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करते.’
२. श्री. प्रशांत कागवाड (कै. दिलीप कागवाड यांचा मोठा मुलगा), अमेरिका
अ. ‘बाबा हे आदर्श वडील होते. त्यांनी आम्हाला लहानपणापासून कधीच काही न्यून पडू दिले नाही.’
३. श्री. प्रतीक कागवाड (कै. दिलीप कागवाड यांचा धाकटा मुलगा), बेळगाव
३ अ. वेळेचे पालन करणे : ‘बाबा दैनंदिन कृती ठरलेल्या वेळेतच करत असत. घरीच आहेत; म्हणून ते उशिरा उठले आहेत आणि त्यांच्या जेवणाच्या वेळा मागे-पुढे झाल्या आहेत, असे कधी झाले नाही. कुठेही जायचे झाले, तर ते नेहमी वेळ पाळायचे.
३ आ. सर्वांशी चांगले वागणे : बाबांच्या मनामध्ये कुणाविषयीही राग नव्हता. त्यांच्याशी कुणी कसेही वागले, तरी ते सर्वांशी चांगलेच वागत असत आणि आम्हालाही चांगलेच वागायला सांगत असत.
३ इ. गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे मुलांची काळजी न करणे : ‘बाबांना मी आणि माझा भाऊ (श्री. प्रशांत) यांची कधी काळजी वाटली नाही. एका सत्संगात गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) बाबांना सांगितले होते, ‘‘तुम्ही मुलांची काळजी करू नका. त्यांचे सर्व चांगले होणार आहे.’’ बाबांची गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा असल्यामुळे त्यांना आमची कधीच काळजी वाटली नाही. ते आम्हाला ‘तुम्ही किती पैसे मिळवता किंवा काय करता ?’, असे कधीच विचारले नाही.’
४. सौ. निकिता प्रतीक कागवाड (कै. दिलीप कागवाड यांची धाकटी सून), बेळगाव
४ अ. सुनेला मुलीप्रमाणे वागवणे : ‘मी विवाह करून घरामध्ये सून म्हणून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून सासर्यांनी मला कधीच परके समजले नाही. त्यांनी मला कुटुंबामध्ये लगेच सहभागी करून घेतले. ते माझ्या समवेत सासर्यांप्रमाणे न वागता वडिलांप्रमाणे वागत होते. त्यांनी मला मुलीसारखीच वागणूक दिली.
४ आ. इतरांचा विचार करणे : मी सासरी आल्यानंतर नोकरी करत होते. काही मासांसाठी सासूबाई (आशा कागवाड) अमेरिकेला गेल्या होत्या. त्या वेळी बाबा मला शनिवारी रात्री सांगायचे, ‘‘मी रविवारी सकाळी अल्पाहारासाठी बाहेर जातो.’’ त्यांना वाटायचे की, मला विश्रांती मिळावी.
४ इ. ते शांत, इतरांची काळजी घेणारे, कृतीतून प्रेम व्यक्त करणारे, दयाळू आणि कुटुंबियांचा भक्कम आधारस्तंभ होते.
४ ई. मुलांकडून अपेक्षा न करणे : त्यांना २ मुले असूनही ते स्वावलंबी होते. त्यांनी मुलांकडून ‘मुलांवर वडीलधार्यांची सेवा करण्याचे दायित्व आहे’, अशी अपेक्षा केली नाही.’
५. श्रीमती प्रमिला पाटील (कै. दिलीप कागवाड यांच्या सासूबाई (पत्नीची आई), आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ८४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
अ. ‘कै. दिलीप यांचे पार्थिव पुष्कळ तेजस्वी जाणवत होते.
आ. त्यांच्या घरात दाब न जाणवता चैतन्यच जाणवत होते.’
६. वैद्या माया पाटील (कै. दिलीप कागवाड यांची मेहुणी (पत्नीची बहीण)), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
६ अ. पार्थिव पनवेलहून बेळगावला गाडीने घेऊन जातांना भीती न वाटणे, तसेच दाब न जाणवणे : ‘भावोजींचे (दिलीप कागवाड यांचे) निधन पनवेल येथे झाले. त्यांचे पार्थिव पनवेल येथून बेळगाव येथे घेऊन जाण्यासाठी आम्ही पहाटे ३.२० वाजता चारचाकी वाहनाने निघालो. ‘आम्ही एका मृतदेहाच्या समवेत प्रवास करत आहोत’, असे आम्हाला जाणवले नाही. गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा दाब किंवा भीती वाटत नव्हती. ‘जणू गुरुदेव आम्हाला सुरक्षितपणे बेळगावला पोचवत आहेत’, असे वाटत होते. माझ्या बहिणीचा स्वभाव पुष्कळ भित्रा आहे, तरीही तिला गाडीत भीती वाटली नाही. ‘गुरुदेवांमुळेच हे शक्य होत आहे’, असे तिला वाटत होते आणि तिच्याकडून गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.
६ आ. चेहर्यावर तेज आणि प्रसन्नता जाणवणे : भावोजींचे पार्थिव बेळगाव येथे आणल्यानंतर त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ तेज आणि प्रसन्नता जाणवत होती. सर्वांनाच वाटत होते की, ते आता उठून बसणार. ‘ते मृत झालेले आहेत’, असे कुणालाच वाटत नव्हते. ‘ते सनातनचे करत होते, देवाचे करत होते, त्याचा हा परिणाम आहे’, असे मत अंत्यदर्शन घेणार्यांनी व्यक्त केले.
६ इ. अस्थिसंचयन करतांना जाणवलेली सूत्रे
१. बेळगाव येथे अस्थी गोळा करण्यासाठी महिलांनी स्मशानात जाण्याची पद्धत आहे; म्हणून मीही तेथे गेले होते. भावोजींच्या अस्थी गोळा करतांना मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते.
२. अस्थींतून सात्त्विक आणि थंड लहरी येतांना जाणवत होत्या.
३. ‘भावोजी करत असलेला नामजप त्यांच्या पेशीपेशीमध्ये आणि अस्थींपर्यंत गेला होता’, असे मला जाणवले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.४.२०२६)
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !