शिवचरित्राचे विकृतीकरण : पुरोगाम्यांचा वैचारिक आतंकवाद आणि हिदुविरोध यांचे षड्यंत्र उघड !

सह्याद्रीच्या कड्याकपार्‍यांतून ज्यांनी ‘हर हर महादेव’ची गर्जना घुमवून आसेतुहिमाचल हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवला, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदीप्यमान इतिहास आज एका विशिष्ट विचारसरणीच्या वाळवीकडून पोखरला जात आहे. ‘पुरोगामी’ आणि ‘साम्यवादी’ विचारांचा मुखवटा चढवून मिरवणारे हे छद्म इतिहासकार प्रत्यक्षात हिंदु धर्म, भारतीय संस्कृती आणि धर्माधिष्ठित स्वराज्याच्या संकल्पनेचा द्वेष करत आहेत. शिवचरित्रात वैचारिक भेसळ करून हिंदु समाजात जातीपातीच्या नावाने फूट पाडण्याचे जे जाणीवपूर्वक सत्र चालू आहे, त्याचा आता वैचारिक स्तरावर समाचार घेणे, ही काळाची आवश्यकता आहे.

१. ‘शिवप्रेम’ हा केवळ दिखावा : पुरोगाम्यांचा देशविरोधी ‘अजेंडा’ (कार्यसूची)

स्वतःला शिवप्रेमी म्हणवून घेणारे कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांची साम्यवादी मंडळी प्रत्यक्षात छत्रपती शिवरायांच्या खर्‍या विचारांच्या विरोधात उभी राहिलेली दिसतात. पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता ?’सारखी पुस्तके लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा भाग, म्हणजे केवळ एक ‘राजकीय लढा’ म्हणून मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. हीच मंडळी जगातील कुख्यात आतंकवाद्यांना सन्मानाने संबोधतांना दिसतात; मात्र ज्यांनी आपल्याला ‘छत्र’ दिले, त्या छत्रपती शिवरायांना ‘छत्रपती’ ही पदवी लावण्याचे वावडे वाटते. अशा या पानसरे आणि त्यांच्या साम्यवादी टोळीचा खरा चेहरा समाजाने ओळखणे आवश्यक आहे. वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा याच पानसरे यांनी भारताची साथ देण्याऐवजी उघडपणे चीनची बाजू घेतली होती. या देशविरोधी भूमिकेसाठी त्यांना तत्कालीन सरकारने कारावासातही टाकले होते. जे मुळातच भारताच्या विरोधात उभे ठाकले होते, त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकांचा इतिहास सांगणे, हाच मुळी एक मोठा विरोधाभास आहे.

२. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागतिक कीर्तीच्या गुप्तहेर खात्याचा अवमान !

श्री. सुनील घनवट

काही पुरोगामी प्रवृत्तीच्या लेखकांनी जसे की, मा.म. देशमुख यांनी असा दावा केला, ‘समर्थ रामदासस्वामी हे आदिलशहाचे हेर होते.’ हे तेच लेखक आहेत, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या करणार्‍या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे ‘पिवळे’ पुस्तक लिहिले. येथे एक मूलभूत प्रश्‍न उपस्थित होतो, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुप्तहेर खाते हे त्या काळातील जगातील सर्वांत सक्षम यंत्रणा मानली जात असे. बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखालील या खात्याने शत्रूच्या गोटात अशा ठिकाणी प्रवेश केला होता की, शत्रूचा प्रत्येक बेत महाराजांना आधीच कळत असे. ज्यांच्या युद्धनीतीची आणि गनिमी काव्याची प्रशंसा आज व्हिएतनाम अन् इस्रायल यांसारखी प्रगत राष्ट्रे करतात, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्याच स्वराज्याच्या केंद्रस्थानी शिवथरघळ, तसेच सज्जनगड येथे रहाणारा एक ‘शत्रूचा हेर’ ओळखता आला नसेल का ? समर्थांना ‘हेर’ म्हणणे, हा केवळ समर्थांचा अपमान नसून तो प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिव्य दृष्टीचा आणि त्यांच्या अजेय गुप्तहेर यंत्रणेचा घोर अपमान आहे. ३०० वर्षांनंतर या तथाकथित लेखकांना जे ‘सत्य’ कळते, ते प्रत्यक्ष महाराजांना कळले नाही, असे म्हणणे, हा शिवद्रोहाचाच एक प्रकार आहे.

३. मोगल आक्रमकांचे उदात्तीकरण आणि हिंदु स्वाभिमानावर आघात

पुरोगामी इतिहासकार जाणीवपूर्वक मोगलांचे अत्याचार लपवण्याचे आणि हिंदु राजांना त्यांच्या बरोबरीचे ठरवण्याचे काम करत आहेत. साम्यवादी इतिहासकार इरफान हबीबने आपल्या ‘The Agrarian system of Mughal India’ या पुस्तकात मोगलांचे क्रौर्य झाकण्यासाठी मराठा सैन्याला अत्यंत हीन शब्दांत संबोधले आहे. ‘लूट  नाही, तर वेतन नाही’, ही छत्रपती शिवाजी महाराज यांची नीती होती’, असा खोटा प्रचार करून त्यांनी स्वराज्याच्या सैन्याला लुटारू ठरवण्याचा प्रयत्न केला. पानसरे यांनीही ‘औरंगजेबाने मंदिरांना देणग्या दिल्या’, असा दावा करून त्याला ‘सेक्युलर’ (निधर्मी) भासवण्याचा प्रयत्न केला, ज्याला कोणताही ठोस ऐतिहासिक आधार नाही. हे सर्व प्रयत्न केवळ हिंदु तरुणांमधील स्वाभिमान नष्ट करण्यासाठी केले जात आहेत.

४. हिंदुद्वेषातून शिवचरित्राचे विकृतीकरण : राजकीय नेत्यांचे षड्यंत्र !

नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘गागाभट्टांनी महाराजांना पायाच्या अंगठ्याने टिळा लावला’, असे विधान केले. ज्यांनी बलाढ्य जुलमी सत्तांना धूळ चारली, जे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भर दरबारात ताठ मानेने उभे राहिले, ते राजे असा अपमान सहन करतील का ? भाषेचे सौजन्य राखले पाहिजे; परंतु अशा चुकीच्या विधानांमागे केवळ एका विशिष्ट समाजाचा आणि परंपरेचा द्वेष दडलेला असतो, हे स्पष्ट दिसते. जेव्हा असा उघड अपमान होतो, तेव्हा स्वतःला शिवप्रेमी म्हणवून घेणार्‍या पुरोगामी संघटना गप्प का बसतात ? कारण त्यांचा उद्देश शिवचरित्र नसून केवळ हिंदु धर्मात जातीपातीचे विष कालवणे, हा आहे. मा.म. देशमुख, डॉ. आ.ह. साळुंखे, पुरुषोत्तम खेडेकर यांसारख्या मंडळींनी केवळ राजकीय हेतूने शिवचरित्रातील महापुरुषांचे विकृतीकरण केले आहे.

युवा पिढीला जागृत करण्याची हीच वेळ !

हिंदु समाजाला आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. ‘भाईचारा’च्या गोंडस नावाखाली आपण आपल्या पूर्वजांचे बलीदान विसरू शकत नाही. बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभु देशपांडे, बर्हिजी नाईक, हंबीरराव मोहिते यांनी जो लढा दिला, तो केवळ भूमीसाठी दिलेला लढा नव्हता, तर तो ‘स्वधर्म’ आणि ‘स्वराज्य’ टिकवण्यासाठीचा ‘धर्मसंग्राम’ होता ! या खोट्या इतिहासकारांना आणि त्यांच्या ‘लाल-पिवळ्या’ पुस्तकांना वेळीच रोखले पाहिजे. इतिहासतज्ञ आणि जागृत नागरिक यांनी एकत्र येऊन अशा विकृत साहित्याचा निषेध केला पाहिजे आणि खोटा इतिहास मांडणार्‍यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली पाहिजे. आम्हाला अशी पिढी घडवायची आहे, जिच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंह आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जाज्वल्य हिंदुत्व असेल.

शेवटी एकच आवाहन आहे, ‘हिंदूंनो, शिवद्रोही विचारांना वैध मार्गाने वेळीच रोखा ! आता नाही, तर कधीच नाही !’

– श्री. सुनील घनवट

५. स्वप्न इस्लामी राष्ट्राचे आणि ढाल शिवप्रेमाची

आज भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी लव्ह जिहाद आणि लोकसंख्येचे असंतुलन निर्माण करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे. नाशिक असो वा अमरावती, सुशिक्षित तरुण-तरुणींना ‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) जिहादच्या माध्यमातून फसवण्याचे षड्यंत्र उघड झाले आहे. या राष्ट्रविरोधी शक्तींच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा, म्हणजे ‘शिवचरित्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि पराक्रम !’ जोपर्यंत हिंदु समाज छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आणि त्यांचे धर्मरक्षणाचे कार्य स्मरणात ठेवेल, तोपर्यंत हे षड्यंत्र यशस्वी होणार नाही. म्हणूनच शिवचरित्रात खोट्या कहाण्या घुसडवणे, सण-उत्सवांवर (होळी, पाडवा आणि दसरा) आक्षेप घेणे आणि वारकरी संप्रदायामध्ये वैचारिक घुसखोरी करणे चालू आहे.

६. पुरोगाम्यांची वैचारिक दिवाळखोरी

कोल्हापूरमध्ये पुरोगामी लोक ‘शिवाजी विद्यापीठ’ असे एकेरी नाव घेतात; पण त्याचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्यासाठी त्यांची जीभ जड होते.  महाराजांचे नाव एकेरी घेण्यात त्यांना भूषण वाटते; मात्र आतंकवाद्यांची नावे घेतांना ‘लादेनजी’, ‘कसाबजी’, असे म्हणण्यात त्यांना धन्यता वाटते. हा दुटप्पीपणा आता उघडा पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही केवळ नावे नसून ती भारताची अस्मिता आहेत.

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२९.४.२०२६)