GLOBAL INFLATION : जागतिक महागाई दर ४.४ टक्क्यांपर्यंत पोचणार !

अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम !

नवी देहली – इराणविरोधातील अमेरिकेच्या युद्ध सध्या स्थगित असले, तरी त्याचे परिणाम जगावर होत असून पुढेही हे परिणाम असेच दिसत रहाणार आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सांगितले की, युद्धापूर्वी यावर्षी जागतिक महागाई दर ४.१ टक्क्यांवरून ३.८ टक्के पर्यंत अल्प होण्याची अपेक्षा होती; परंतु आता तो ४.४ टक्क्यांपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. या युद्धामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची लोकप्रियताही अल्प झाली आहे.

१. इराणमधील मानवाधिकार संघटनांच्या मते, युद्धात आतापर्यंत ३ सहस्र ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात १ सहस्र ७०० हून अधिक नागरिक आहेत.

२. हार्वर्डच्या अर्थशास्त्रज्ञ लिंडा बिल्म्स यांचा अंदाज आहे की, या युद्धाचा एकूण खर्च १ ट्रिलियन डॉलर, म्हणजेच अनुमाने ९४ लाख ९१ सहस्र कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे.

जागतिक विकास दर ३.३ टक्क्यांवरून ३.१ टक्क्यापर्यंत घसरला

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक विकासाचा अंदाजही अल्प केला आहे. आता यावर्षी जगाची अर्थव्यवस्था ३.१ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे, तर जानेवारीमध्ये हा अंदाज ३.३ टक्के होता.

खतांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. ज्या देशांमध्ये लोक शेतीवर अधिक अवलंबून आहेत आणि स्वतःच्या कमाईचा मोठा भाग खाण्यावर खर्च करतात, त्यांना या महागाईचा थेट अन् अधिक फटका बसणार आहे.