देवघरातील मूर्ती कशा असाव्यात ?


१. धर्मग्रंथांनुसार देवघरातील मूर्ती

‘आपल्या देवघरातील मूर्ती कशा असाव्यात ?’, याविषयी शास्त्रकारांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

अ. ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथात महर्षि व्यास सांगतात, ‘१. पाषाणाची, २. काष्ठाची (लाकडाची), ३. लोह इत्यादी धातूंची, ४. मृत्तिकेने लिंपलेली, ५. रंगाने रेखाटलेली, ६. वाळूची, ७. मण्यांची नक्षी करून बनवलेली आणि ८. मनात आणलेली, अशा ८ प्रकारच्या देवाच्या मूर्ती असतात.’

श्री. अमर जोशी

आ. वरीलपैकी काष्ठाची (लाकडाची) मूर्ती ही ‘मधुकाची, म्हणजे मोहाच्या झाडाची (शास्त्रीय नाव : Madhuca longifolia ची) असावी’, असे वराहपुराणातील वचन आहे.

इ. ‘भार्गवार्चनदीपिका’ आणि भविष्य पुराण यांत सांगितले आहे, ‘अंगुष्ठपर्वापासून (अंगठ्याच्या पेरापासून, म्हणजे अंदाजे १ इंचापासून) एक वीतीपर्यंतच्या (हात पूर्ण पसरल्यावर अंगठा आणि करंगळी यांच्या टोकांमधील अंतर. अंदाजे ९ इंच) आकाराची मूर्ती घरात पुजावी. एका वीतीपेक्षा मोठ्या मूर्तीची पूजा घरात करू नये. त्यासाठी मंदिरांचे प्रयोजन करावे.’

ई. शाळिग्राम किंवा बाणलिंग या व्यतिरिक्त कोणत्याही नवीन मूर्तीची विधिवत् प्राणप्रतिष्ठापना करूनच ती देवघरात स्थापन करावी.

उ. ‘पूजा करणार्‍याच्या तपःसामर्थ्याने, दीर्घकाळ उत्तम प्रकारे पूजा झाल्याने आणि मूर्तींच्या सौंदर्याने मूर्तींच्या ठायी देवतांचे सान्निध्य होते (मूर्ती चैतन्यमय होते)’, असे ‘हयशीर्षपंचरात्र’, या ग्रंथात म्हटले आहे.

२. देवघरातील मूर्तीविषयी प्राप्त काळात आचरणात आणता येणारेे पर्याय !

वरील सर्व शास्त्रविहित भाष्य झाले. आता धर्मग्रंथांमध्ये नसलेले; पण आपल्याला प्राप्त काळात आचरणात आणता येतील, असे सोपे पर्याय बघूया.

अ. बाजारात मिळणार्‍या प्लास्टिक, फायबर, थर्माकोल आणि लाकूड (मोहाच्या लाकडाच्या व्यतिरिक्त इतर लाकूड) यांच्या मूर्ती देवघरात कधीही ठेवू नयेत.

आ. देवघरातील मूर्ती पितळ, पंचधातू किंवा चांदी इत्यादींच्या असाव्यात. चांदीच्या काही मूर्ती दिसायला मोठ्या असतात; पण आतून पोकळ असतात. त्यापेक्षा भरीव मूर्ती घ्याव्यात. भरीव मूर्तींचे मूल्य अधिक असते. अशा वेळी लहान आकारातील मूर्ती असल्या, तरी हरकत नाही; मात्र मोठ्या पोकळ मूर्तींपेक्षा लहान भरीव मूर्ती कधीही श्रेष्ठच आहेत.

इ. ‘देवाचे रूप सुंदर असेल, तसेच अवयव रेखीव आणि प्रमाणबद्ध असतील’, असे बघावे.’

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (२५.४.२०२६)

‘वरील लिखाण आमच्या अल्पमतीनुसार आहे. यामध्ये विद्वानांना काही पालट सुचवायचे असल्यास किंवा अधिक माहिती उपलब्ध करून द्यायची असल्यास सनातन वेदपाठशाळेच्या ८१८०९६८६६० या दूरभाष क्रमांकावर संपर्क करावा’, ही नम्र विनंती !’

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (८.४.२०२६)