
अलीकडे समोर आलेली एक घटना मन सुन्न करणारी आहे. जन्मदात्री आईच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांनी ‘आम्हाला वेळ नाही, तुम्हीच उरका’, असे निर्ढावलेले वक्तव्य करत अंत्यसंस्काराचे दायित्व टाळले. शेवटी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत त्या आईचे अंत्यसंस्कार पूर्ण केले. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून सध्याच्या समाजातील पालटलेल्या मूल्यव्यवस्थेचे, नात्यांतील पोकळीचे आणि संवेदनशून्यतेचे गंभीर द्योतक आहे. ज्या आईने जन्म दिला, संगोपन केले, पोटच्या मुलांसाठी आयुष्यभर स्वतःच्या इच्छा-आकांक्षा यांचा त्याग केला, तिच्याच अंतिम क्षणी मुलांनी पाठ फिरवणे, ही केवळ नैतिक नव्हे, तर मानवी मूल्यांचे अपयश आहे.

भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना देवतुल्य स्थान दिले गेले आहे. त्यांच्या सेवेत पुण्य मानले गेले आहे; मात्र आधुनिक काळात ही मूल्ये केवळ पुस्तकांपुरती मर्यादित राहिली आहेत का ? असा प्रश्न निर्माण होतो. आज ‘वेळ नाही’ ही सबब प्रत्येक क्षेत्रात दिली जाते; पण ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचले, सर्वस्व पणाला लावले त्यांच्या अंतिम संस्कारासाठीही वेळ नसणे, ही स्थिती समाजाचे नैतिक अधःपतन झाल्याची प्रचीती आहे. सध्या छोट्या कुटुंबाचे प्रमाण वाढल्याने वृद्ध पालक एकाकी होत आहेत. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत ज्येष्ठांचा सन्मान होत असे, त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीतूनच पुढच्या पिढीला खरे शिक्षण मिळत असे. तिथे आज ज्येष्ठांना ‘ओझे’ मानले जाते. भौतिक सुखांच्या मागे धावणारी पिढी नात्यांतील भावनिक बंध विसरत चालली आहे. करिअर, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टींना प्राधान्य देतांना कर्तव्य, कृतज्ञता आणि संवेदनशीलता यांसारख्या मूल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. भ्रमणभाष आणि आभासी जगात रममाण झालेल्या समाजात नात्यांची उब हरवत चालली आहे.
अनेक ठिकाणी वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढले जाते, वृद्धाश्रमात सोडून दिले जाते किंवा त्यांच्या संपत्तीवर हक्क मिळवल्यानंतर त्यांची उपेक्षा केली जाते. काही प्रकरणांत आजारी पालकांना रुग्णालयात सोडून देऊन मुलांनी संपर्क तोडल्याच्या घटनाही समोर येत आहेत. यामुळे ‘प्रगती’च्या नावाखाली आपण मानवी मूल्ये गमावत आहोत का ?’, असा गंभीर प्रश्न पडतो. बालपणापासूनच संस्कारांचा अभाव होतो. ज्येष्ठांप्रती आदर, कृतज्ञता आणि दायित्व यांची जाणीव जर लहानपणापासून रुजवली गेली नाही, तर पुढे जाऊन व्यक्ती स्वार्थी बनते. वृद्धाश्रमांची संख्या वाढवणे, हा उपाय नसून वृद्धांना त्यांच्या कुटुंबातच सन्मानाने जगता येईल, अशी परिस्थिती निर्माण करणे महत्त्वाचे आहे. समाजाच्या विचारसरणीत मूलभूत पालट घडवून आणणे आवश्यक आहे. ‘कर्तव्य’ आणि ‘संस्कार’ यांना पुन्हा केंद्रस्थानी आणल्याविना या समस्येचे समाधान होणार नाही !
– सौ. सायली ढमढेरे, पुणे
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !