Pakistan LPG Crisis : पाकिस्तानमध्ये फुग्यांतील गॅसवर स्वयंपाक !

तीव्र गॅस टंचाईमुळे लोक स्वयंपाकासाठी लागणार्‍या गॅसचा फुग्यांमध्ये करत आहेत साठा !

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या गॅसच्या तीव्र टंचाईमुळे लोक आता प्लास्टिकच्या फुग्यांमध्ये गॅस भरून त्याचा वापर स्वयंपाक करण्यासाठी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धोकादायक पद्धत कराचीतील ओरंगी टाऊन परिसर, तसेच मोमिनाबाद येथे वापरली जात असल्याचे दिसून आले आहे. तेथील लोकांचे म्हणणे आहे की, गॅसच्या अनियमित पुरवठ्यामुळे त्यांच्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही. जेव्हा घरातील पाईपद्वारे थोड्या वेळासाठी गॅस पुरवठा केला जातो, तेव्हा लोक विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकच्या फुग्यांमध्ये गॅस साठवतात आणि तो गॅस एका पाईपद्वारे शेगडीला जोडून त्याद्वारे स्वयंपाक करतात. या फुग्यांची किंमत एक ते दीड सहस्र पाकिस्तानी रुपये इतकी आहे.

हा तर फिरता बाँब ! – तज्ञांची चेतावणी

या प्रकारावर तज्ज्ञांनी आक्षेप घेतला असून ‘हा तर फिरता बाँब आहे’, अशी चेतावणी दिली आहे. सुरक्षा विश्लेषकांचे म्हणणे आहे की, गॅस भरलेल्या प्लास्टिकच्या फुग्यांचा घर्षण, उष्णता, ठिणगी अशा कुठल्याही क्षणी मोठा स्फोट होऊ शकतो. घरांमध्ये असे गॅस भरलेले फुगे ठेवल्याने आग लागण्याचा धोका असून दाट लोकवस्तीच्या भागांत याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.