बहिणीचा मृत्यू झाल्याचे वारंवार सांगूनही बँकेच्या कर्मचार्यांकडून दुर्लक्ष !
पैसे काढण्यासाठी खातेदाराला (बहिणीला) घेऊन येण्याचा बँकेच्या कर्मचार्यांचा आग्रह !
केओंझर (ओडिशा) – मृत बहिणीच्या बँक खात्यातून २० सहस्र रुपये काढण्यासाठी जीतू मुंडा हा त्याच्या मृत बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत पोचल्याचा धक्कादायक प्रकार मल्लिपसी येथील ओडिशा ग्रामीण बँकेच्या शाखेत घडला. हा सांगाडा पाहून बँकेत एकच गोंधळ उडाला. बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या खात्यातून २० सहस्र रुपये काढण्यासाठी जीतू अनेकदा बँकेत गेला होता; परंतु बँकेतील कर्मचार्यांनी प्रत्येक वेळी त्याला खातेदाराला, म्हणजे त्याच्या बहिणीला घेऊन येण्यास सांगितले. जीतूने कर्मचार्यांना त्याची बहीण कालरा मुंडा हिचा मृत्यू झाल्याची अनेकदा माहिती दिली. तरीही त्याला कुणीही दाद दिली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या जीतूने पुरलेल्या त्याच्या बहिणीचा सांगाडाच थेट बँकेत आणला. हा सांगाडा घेऊन तो बँकेपर्यंत ३ किमी चालत गेला. बँकेत हा सांगाडा पाहून तेथे उपस्थित असलेल्या लोकांना धक्काच बनला. यानंतर बँकेच्या कर्मचार्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले.
स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी (तात्पुरते) पोलीस निरीक्षक किरण प्रसाद साहू म्हणाले, ‘‘जीतू हा डियानाली गावात रहाणारा आदिवासी जमातीचा असून तो निरक्षर आहे. त्याला कायदेशीर प्रक्रियेचे ज्ञान नाही. त्याला कायदेशीर वारस किंवा ‘नॉमिनी’ (खातेदाराच्या पश्चात् पैसे मिळणार्या व्यक्तीचे नाव) म्हणजे काय ?, हे ठाऊक नाही. बँकेचे अधिकारीही त्याला मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया समजावून सांगू शकले नाहीत. आता प्रशासनाने त्याला नियम समजावून सांगून लवकरच पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत त्याच्या बहिणीचा मृतदेह पुन्हा पुरण्यात आला.’’
बहीणीचे पती आणि मुलगा यांचेही झाले आहे निधन
कालरा मुंडा ही जीतूची मोठी बहीण होती. २६ जानेवारी २०२६ या दिवशी तिचा मृत्यू झाला. तिच्या बँक खात्यात नामनिर्देशित असलेला तिचा पती आणि मुलगा यांचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या नावावर जमा असलेल्या पैशांचा जीतू मुंडा हा एकमेव दावेदार आहे. जीतू आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत असल्यामुळे ही रक्कम त्याला हवी होती.

स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक