संपादकीय : तत्त्वज्ञानाचे शिक्षण आणि पालट !

मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुश्रुत धर्माधिकारी

राष्ट्रीय विधी विद्यापिठांमध्ये (‘एन्.एल्.यू.’मध्ये – ‘नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज’मध्ये) मनुस्मृति, अर्थशास्त्र, जैन आणि बौद्ध पंथीय यांचे प्राचीन साहित्य यांचे शिक्षण द्यायला हवे, असे विधान मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुश्रुत धर्माधिकारी यांनी केले. देशभरातील कायद्याच्या अभ्यासक्रमाची २७ विद्यापिठे राष्ट्रीय विधी विद्यापिठाच्या अंतर्गत येतात. यांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सामायिक चाचणी परीक्षा (कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट) असते. हे सांगण्याचे कारण यांतील विद्यार्थ्यांचा चांगला दर्जा आणि मोठी संख्या लक्षात येईल. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या मते ‘वरील साहित्याचा अभ्यास न केवळ त्यांची बुद्धी (विचारशक्ती) प्रगल्भ करील आणि ती स्थिर करील, तर त्यांना श्रेष्ठतम अशा प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी माहिती होईल. सध्या अनेक जण त्यांच्या सनातन धार्मिक तत्त्वज्ञानाच्या मुळापासून तुटलेले आहेत. वरील प्राचीन साहित्याचा एकमेकांशी असलेला संबंधही त्यांच्या लक्षात आला पाहिजे. त्यामुळे ते त्यांच्या कर्तव्याप्रती अधिक सजग होतील आणि उच्चतम मूल्ये असलेल्या देशात जन्मल्याचा त्यांना अभिमानही वाटेल, अन्यथा सध्या शिक्षणातून सामान्य संवेदनशील माणसापेक्षा ‘रोबो’ (मानवाप्रमाणे कामे करणारे कृत्रिम यंत्र) निर्माण होण्याचा दिवस दूर नाही; कारण या विद्यार्थ्यांना उद्या समाजसेवा करायची आहे, या दृष्टीने ते घडले पाहिजेत.’ न्यायमूर्ती साहेबांचे वरील वक्तव्य इथे हेतूपुरस्सर सविस्तर दिले; कारण केवळ कायद्याच्याच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांतील शिक्षणपद्धतीला लागू असलेले अत्यंत कळीचे सूत्र त्यांनी उपस्थित केले आहे.

भारतीय शिक्षणपद्धतीची रचनाच ‘कारकून’ निर्माण करण्यासाठी तत्कालीन ब्रिटीश अधिकारी मेकॉले याने केली, हे लक्षात आल्यामुळे आता केंद्रशासनाने पाठ्यक्रमांमध्ये आमूलाग्र पालट करण्यास आरंभ करून अंतिमतः नवीन पाठ्यक्रम चालू केला आहे; परंतु शिक्षणाचा उद्देश समाजाला आणि स्वतःला घडवणे हा राहिला नसून ‘केवळ गुणस्पर्धा जिंकणे अन् लक्षाधीश किंवा कोट्यधीश होणे’, हा केव्हाच झाला आहे. न्यायमूर्ती धर्माधिकारी साहेबांनी सध्याच्या आणि भावी पिढ्यांच्या काळजीच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य वक्तव्य केले आहे; परंतु या पिढीच्या आधीच्या १-२ पिढ्याही याच इंग्रजांच्या शिक्षणातून घडल्या गेल्याने पाल्यांवर ‘स्पर्धा आणि पैसा’ हेच कुसंस्कार नकळत झाले आहेत. त्याचसमवेत एकीकडे हिंदु कुटुंबातील धार्मिकतेचा पगडा सैल होणे आणि दुसरीकडे पाश्चात्त्य विचार, आहार-विहार, आचरण आदी सारे जवळ येणे यामुळे न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणतात त्याप्रमाणे सध्या खरोखरच ‘रोबो’ गुणवत्ताधारी पिढी तर बाहेर पडत नाही ना ? अशी शंका येते. हल्लीचे मूलतः हुशार विद्यार्थी हे पूर्वीच्या पिढीपेक्षा तांत्रिकदृष्ट्या अधिक तल्लख असल्याचेही लक्षात येते. ते अतिशय कुशलतेने तंत्रज्ञानाचा वापर करून अल्पावधीत प्रश्न सोडवतात किंवा काम पूर्ण करतात; परंतु मानवी मन समजून घेणारी, इतरांच्या अडचणी किंवा मर्यादा समजून घेणारी, निरपेक्ष प्रेमाने सर्वांना साहाय्य करणारी, अशी समाजाभिमुख पिढी आता लोप पावत चालली आहे. सध्याची पिढी पैशाशी बांधील आहे; म्हणून कर्तव्याला बांधील आहे; परंतु तिच्यात चिंतनशीलता, काही क्षण थांबून सारासार विचार करणे, विवेक, तारतम्य, विचारांची सुस्पष्टता, संवेदशीलता, अंतर्मुखता, नैतिकता, मूल्याधिष्ठता आदी गोष्टींची कमतरता प्रकर्षाने जाणवते. वरील वक्तव्यातून न्यायमूर्ती साहेबांना हेच अप्रत्यक्षरित्या सुचवायचे आहे. वरील सर्व गोष्टी या भारतीय तत्त्वज्ञान किंवा संस्कृती यांच्या अंगीकारातून आपोआप अंगी बाणवल्या जातात आणि हेच एवढी वर्षे भारताचे वैशिष्ट्य राहिले आहे. इंग्रजी शिक्षणपद्धतीच्या आक्रमणानंतर आणि भारतीय तत्त्वज्ञान, धर्माचरण यांना तुच्छ लेखले गेल्याने आता पुढच्या पिढ्यांवर त्याचे गंभीर परिणाम दिसत आहेत अन् तेच न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी अचूकपणे टिपले आहेत.

न्यायव्यवस्थेवर प्रचंड सकारात्मक परिणाम होईल !

सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या देशात लोकशाहीचा एक स्तंभ असलेल्या न्यायव्यवस्थेच्या सध्याच्या मर्यादा आणि अडचणी अनंत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेकदा खर्‍या न्यायापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे जनता अप्रसन्न रहाते. विलंबाने मिळणारा न्याय, देशभरातील सर्व स्तरांतील न्यायालयांत सहस्रो खटले प्रलंबित असणे, अनेक न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश यांची पदे रिकामी असणे, पदभरती पारदर्शक नसणे, भ्रष्ट न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश, राष्ट्रद्रोही विचारसरणीच्या बाजूने असणारे न्यायाधीश, खोटे साक्षी-पुरावे सादर होत असल्याचे लक्षात येऊनही हतबल असणारे न्यायाधीश, हतबलता व्यक्त करून अन्याय मुकाटपणे पहाणारे न्यायाधीश, भ्रष्ट अधिवक्ते, प्रचंड शुल्क आकारून अशिलाला फसवणारे अधिवक्ते, साक्षी-पुरावे गोळा न करणार्‍या सरकारी यंत्रणा, न्यायदानातील अनेक त्रुटी, न्यायालयातील प्रतिकूल वातावरण आणि पोषाख आदी अनेक गोष्टी आज आपल्या न्याययंत्रणेत सुधारणेला वाव असणार्‍या अशा आहेत. ‘कायद्याचे हात बांधलेले असतात’ किंवा ‘न्यायदेवता आंधळी असते’, असे मानून जनतेला आहे ती परिस्थिती स्वीकारावी लागते. अजूनही इंग्रजांच्या काळात बनवलेले काही कायदे चालू आहेत. न्यायव्यवस्थेवरही कुणाचा दबाव आहे कि काय ? अशी शंका यावी, अशीही काही वेळा स्थिती असते. या सर्व गोष्टींमध्ये पालट होणे आवश्यक आहे, याविषयी कुणाच्याही मनात शंका नसावी. हे सर्व पालटणे कधी शक्य होईल, जेव्हा या संपूर्ण यंत्रणेतील विविध स्तरांवर सहभागी असणारी पिढी ही सक्षम, अंतर्मुख, तत्त्वनिष्ठ आणि हा पालट करण्यासाठी आवश्यक तळमळ, चिकाटी, इच्छाशक्ती, दूरदृष्टी आदी असणारी असेल, तर येणारी कायद्याचे शिक्षण घेणारी पिढी न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी वर म्हटल्याप्रमाणे धार्मिक तत्त्वज्ञानाची ओळख आणि पुढे जाऊन धर्माचरण करणारी असेल अन् सध्याच्या न्यायव्यवस्थेतील त्रुटी पार करण्यासाठी ती सक्षम होऊ शकते. यावरून न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या वरील वक्तव्यात ‘व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन करण्याची शक्ती कशी दडलेली आहे ?’, हे लक्षात येईल. सनातन धर्माच्या प्राचीन तत्त्वज्ञानाची ओळख न केवळ तत्कालीन कायदा, न्यायदान यांसह सर्वच क्षेत्रांत सनातनी किती प्रगत होते, हे सांगेल, तर वर्तमानकाळातील भारतीय समाजाला योग्य आणि तत्पर न्याय मिळून व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याचे मार्गही दाखवील, यात शंका नाही. ‘मनुस्मृति’ आणि कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथांतील सखोल अन् मुख्य म्हणजे परिपूर्ण ज्ञान आजच्या काळातही कसे लागू आहे ?, हे यातून लक्षात येईल; कारण हे ग्रंथ एक प्रकारे धर्मशास्त्रावरच आधारलेले असल्याने त्याचे चिरकालत्व अबाधित आहे. त्यामुळे न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी सुचवलेले प्रत्यक्षात कृतीत आले, तर न्यायव्यवस्थेत आमूलाग्र पालट होईल आणि मूळ मातीशी नाते सांगणारी न्यायव्यवस्था उभी राहील, हे मात्र निश्चित !

पाठ्यक्रमात प्राचीन हिंदु ग्रंथांचा अभ्यास ठेवण्याच्या न्यायमूर्ती सुश्रुत धर्माधिकारी यांच्या सूत्राची कार्यवाही होईल, तो सुदिन !