यंत्रणांच्या चौकशांमुळे विवाहितेच्या पतीचीही स्वतः ‘वेडा’ झाल्याची भावना !

वरिष्ठांच्या छळामुळे विवाहिता मनोरुग्ण झाल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – कार्यालयातील वरिष्ठांनी केलेल्या लैंगिक छळामुळे एक विवाहिता मनोरुग्ण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे संबंधित आरोपींवर कारवाई व्हावी आणि आपल्या उद्ध्वस्त कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी तरुणीचा पती कायदेशीर लढा देत आहे; पण  संबंधित यंत्रणा त्यालाही प्रचंड मानसिक त्रास देत असल्याने तरुण वेडा होण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीकडे त्याने या प्रकरणी त्याचे मनोगत मांडले.

१. पत्नीचा तिच्या कार्यालयातील सहकारी छळ करायचे. असाह्य त्रासामुळे तिने वरिष्ठांना याविषयी सांगितल्यावर तिला नोकरी गमवावी लागली. या घटनेचा तिच्या मनावर मोठा परिणाम झाल्याने ती मनोरुग्ण बनली. यामुळे घरातील सर्व कामे, स्वयंपाक आणि नोकरी सांभाळून पतीने पत्नीवर उपचार केले. तिला न्याय मिळण्यासाठी पोलिसांचीही वारंवार भेट घेतली.

२. फेब्रुवारी महिन्यात रात्री घरी २ तरुण आले. त्यांनी महिलेचे केस कापून तिला आणखी विद्रूप केले. या वेळी तिच्या पतीने पोलिसांकडे धाव घातली. बरेच हेलपाटे मारल्यानंतर त्याला हे प्रकरण अदखलपात्र असल्याचे सांगण्यात आले.

३. यानंतर त्याने अनुसूचित जाती-जमाती आयोग, तसेच राज्य महिला आयोग यांच्याकडे तक्रार केली. दोन्हींकडून त्याला पोच मिळाली. १० मार्च २०२६ या दिवशी राज्य महिला आयोगाने नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाला पत्र पाठवून तातडीने कारवाई करून अहवाल आयोगाला सादर करण्यास सांगितला.

४. पोलिसांनी मनोरुग्ण पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावले आहे; पण ती मनोरुग्ण असल्याने त्यांच्यासमोर ती काय सांगणार ?, हा प्रश्न आहे. तरीही पोलिसांनी तिला आणण्यासाठी ५ दिवसांची सममर्यादा दिली. यावर त्याने सांगितले, ‘‘आता डोके फोडून घेऊ का ? न्याय मिळण्याऐवजी सतत मनस्तापच मिळत आहे. त्यामुळे मलाच मी वेडा झाल्यासारखे वाटते. आपणच डोके फोडून घ्यावे’, असे वाटते.’’

संपादकीय भूमिका

हा प्रकार म्हणजे न्याय मागणार्‍या जनतेला अन्यायाच्या दरीत लोटण्याचा  प्रकार आहे. असे करणार्‍यांनाच कारागृहात डांबायला हवे !