Karnataka CET Exam : ‘सीईटी’ परीक्षेत विद्यार्थिनींच्या नथ काढता न आल्याने नाकावर चिकटवल्या चिकटपट्ट्या !

 कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण !

चिक्कमगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या वतीने (के.ई.ए.) घेतली जाणारी २०२६ या वर्षाची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) आजपासून राज्यभरात चालू झाली आहे. परीक्षेच्या वेळी परीक्षार्थींना धातूचे दागिने घालण्यावर बंदी असल्यामुळे काही परीक्षा केंद्रांत प्रवेश करण्यापूर्वी शेकडो विद्यार्थिनींना अडवून त्यांची नथ आणि इतर दागिने काढायला लावल्याच्या घटना घडल्या. चिक्कमगळुरूतील ‘एम्.ई.एस्.’ महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या नथ काढणे शक्य न झाल्याने परीक्षा केंद्रावरील कर्मचार्‍यांनी विद्यार्थिनींच्या नाकांवर चिकटपट्ट्या लावल्या आणि त्यांना परीक्षागृहात पाठवले. विद्यार्थिनींच्या नाकांवर चिकटपट्ट्या लावल्यामुळे त्यांच्या पालकांनी अप्रसन्नता व्यक्त केली. परीक्षेचा तणाव आणि परीक्षा केंद्रावरील हा विचित्र प्रसंग, यांमुळे विद्यार्थिनींमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला.

बळ्ळारी जिल्ह्यात १० केंद्रांत ‘सीईटी’ परीक्षा चालू झाल्या आहेत. या वेळी परीक्षा केंद्रांतील कर्मचार्‍यांनी विद्यार्थिनींना स्वतःच्या कानातले आणि इतर दागिने काढायला लावले. याखेरीज गळ्यात आणि हातात बांधलेले दोरेही काढण्यास भाग पाडले.

बेंगळुरू येथे ‘सीईटी’ परीक्षेत विद्यार्थ्यांना ‘जानवे’ काढायला लावल्याने वाद !

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही ‘सीईटी’ परीक्षेत विद्यार्थ्यांना त्यांचे ‘जानवे’ काढायला लावण्यावरून वाद निर्माण झाला. (यावरून परीक्षा घेणार्‍या मंडळाचा केवळ हिंदुद्वेष दिसून येतो ! – संपादक) मडिवाळा येथील कृपानिधी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना ‘जानवे’ काढायला लावल्याचा आरोप आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी विरोध करत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.

या घटनेनंतर शिक्षण विभागाचे अधिकारी आणि ‘सीईटी’चे अधिकारी घटनास्थळी पोचले. त्यांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तथापि ‘कृपानिधी महाविद्यालयामध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत’, असा आरोप करत पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

संपादकीय भूमिका

परीक्षा आणि नाका-कानातील दागिने यांचा काहीएक संबंध नसतांना ते काढण्यास सांगणे, हा मानसिक छळ नाही का ?