साधकांनो, स्वतःचे शारीरिक त्रास ‘प्रारब्धभोग’ म्हणून स्वीकारल्यास ईश्वरी साहाय्य मिळत असल्याने ते भोग आनंदाने स्वीकारा ! 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतून भक्तीसत्संगात स्रवलेले अमृतकण !

‘सध्या चालू असलेल्या विशेष भक्तीसत्संग शृंखलेच्या अंतर्गत साधनेच्या पंचसूत्रीतील तिसरे सूत्र ‘स्वीकारणे’ याविषयी गुरुकृपेने साधकांना मार्गदर्शन लाभत आहे. पंचसूत्रीतील ‘स्वीकारणे’ याअंतर्गत पहिले सूत्र ‘स्वतःला स्वीकारणे’ या पैलूच्या अंतर्गत ‘आपल्या शरिराच्या व्याधी आणि आजारपण यांसह स्वतःला स्वीकारणे’, यांविषयी आज पाहूया.

मानवी देह जन्माला येतांना देहासह जन्मोजन्मीची चांगली-वाईट कर्मे आणि त्यांचे फळ म्हणजे संचितही सोबत येत असते. जीवनात येणार्‍या सुखद क्षणांचे आपण सहर्ष स्वागत करतो, म्हणजे ते स्वीकारतो; मात्र जेव्हा देहाला मोठे आजारपण येते किंवा एखादी व्याधी जडते, तेव्हा अनेकदा साधक मानसिकरित्या कोलमडून जातात. साधकांचे मन ते आजारपण किंवा व्याधी स्वीकारत नाही. त्यामुळे ते चिंतित आणि दुःखी होतात. ‘स्वतःची शारीरिक स्थिती, आजारपण किंवा व्याधी न स्वीकारणे’, हा देहबुद्धीचाच एक भाग होय. ही देहबुद्धी आपल्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा आणते. हा हाडामासांचा देह म्हणजे ‘मी’, असे आपण मानतो; म्हणून देहाला होणार्‍या यातनांमुळे, म्हणजे देहबुद्धीमुळे स्वतःचे आजारपण आपण स्वीकारत नाही. स्वतःची ही स्थिती स्वीकारणे मनुष्याला पुष्कळ कठीण जाते. 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. स्वतःची शारीरिक स्थिती न स्वीकारणे – यामागील अयोग्य मानसिकतेची उदाहरणे

अनेकदा देहबुद्धीमुळे ‘स्वतःच्या देहाविषयी येणारे विविध विचार, शारीरिक क्षमता, शारीरिक व्याधी, वयोमानानुसार किंवा अल्प वयात येणारे आजारपण’ इत्यादी सर्व स्वीकारता येत नाही.

१ अ. टोकाचा विचार : न स्वीकारता येण्यामागे वेगवेगळे विचार कार्यरत असतात, उदा. ‘मलाच इतके शारीरिक त्रास का आहेत ? शारीरिक मर्यादेमुळे माझ्याकडून काहीच होणार नाही, माझी एवढीच क्षमता आहे. यापेक्षा मी अधिक काही करू शकत नाही’, असे टोकाचे विचार करणे.

१ आ. भविष्याची चिंता : सध्या होत असलेल्या लहानशा त्रासावरून ‘पुढे मला एखादा मोठा रोग होणार नाही ना ? आपत्काळात माझे कसे होईल ?’ किंवा ‘पुढे वय झाल्यावर मला कोण सांभाळणार ?’, अशा प्रकारे भविष्याची चिंता मनाला भेडसावत रहाणे.

१ इ. स्वतःच्या देहाकडून अवास्तव अपेक्षा : ‘मी इतरांसारखी सेवा किंवा साधना करू शकत नाही’, अशी इतरांशी तुलना करणे किंवा स्वतःतील उणेपणाची इतरांशी तुलना करणे, तसेच न्यूनगंड आदींमुळे अनेकदा साधकाचे मन अस्वस्थ होऊन त्याला नैराश्य येते.

२. साधकांनो, दुःख स्वीकारणे, हा पराभव नसून ते आध्यात्मिक बळ आहे ! 

शारीरिक त्रासांमुळे दुःखी होऊन ते दुःख न स्वीकारता त्याला विरोध केला, तर ते अधिक वाढते. ‘दुःखापासून पळणे’, म्हणजे कर्माचे बंधन अधिक घट्ट करणे आणि स्वतःच्या प्रारब्धात वाढ करणे होय ! ‘जेव्हा साधक दुःख किंवा शारीरिक वेदना ‘प्रारब्ध’ म्हणून स्वीकारतील, तेव्हा त्यांची त्या कर्मभोगांतून मुक्तता होण्यास आरंभ होईल ! व्याधीला ‘शत्रू’ न मानता तिला ‘ईश्वरेच्छा’ म्हणून स्वीकारल्यास आध्यात्मिक शक्ती मिळते.

३. दुःख आणि वेदना भोगून शुद्ध झाल्याने साधक ईश्वरचरणी पोचू शकतो !

दुःख भोगणे, म्हणजे पूर्वजन्मांतील संचित कर्मांचा क्षयहोणे ! दुःख आणि वेदना भोगून शुद्ध होऊन साधक ईश्वरचरणी पोचू शकतो. हे भोग याच जन्मी भोगले, तर साधकांच्या आध्यात्मिक वाटचालीतील अडथळे दूर होतील ! त्यामुळे शारीरिक त्रास होत असतांना ‘मलाच का त्रास होतो ?’ असा प्रश्न न विचारता ‘देवा, तुझे हे देणेही मला मान्य आहे’, असे म्हणत दुःख स्वीकारावे.

४. साधकांनो, जीवनातील संघर्षाकडे ‘प्रारब्धाचा क्षय’ म्हणून पहा ! 

साधकाच्या जीवनात जेव्हा आजारपणरूपी संकट उभे ठाकते, तेव्हा ईश्वरावरील श्रद्धा दृढ राहिल्यास ईश्वर त्याच्या साहाय्याला येतो. खरेतर भगवंताला काहीच अशक्य नाही; परंतु तो कुणाच्याही प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही. मनुष्याला प्रारब्ध टाळता येत नाही; पण श्रद्धेमुळे त्याला प्रारब्ध भोगण्याची शक्ती मात्र नक्कीच मिळते. साधकांनी जीवनातील संघर्षाकडे ‘प्रारब्धक्षय’ म्हणजे ‘प्रारब्ध कमी होत आहे’, असे म्हणून पाहिल्यास त्यांच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त होतो.

५. समर्थ रामदासस्वामींनी शारीरिक व्याधींवर मनाचा विजय मिळवण्यासाठी दिलेली शिकवण

समर्थ रामदासस्वामींनी मनाच्या श्लोकांतून पुढील शिकवण दिली आहे,

‘देहेदुःख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ।। – मनाचे श्लोक, १०

अर्थ : परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करतांना देहाला होणारे त्रास आनंदाने सोसावेत आणि विवेकाचा वापर करून आपले चित्त सदैव आपल्या स्वस्वरूपाच्या (आत्मतत्त्वाच्या) चिंतनात रमवावे.

यानुसार देहाला कितीही गंभीर व्याधी जडली, तरी ईश्वराच्या उपासनेमुळे ईश्वर साधकांना देहमर्यादांच्या पलीकडे घेऊन जातो. यासाठी साधकांनी स्वतःची शारीरिक स्थिती मनापासून स्वीकारावी आणि साधनेद्वारे मनोबल प्राप्त करून प्रारब्ध अन् शारीरिक व्याधी यांच्यावर विजय प्राप्त करून घ्यावा.

साधकांनो, प्रारब्धभोग टाळता येत नाहीत; पण मन शांत आणि स्थिर ठेवून भोग स्वीकारल्यास भगवंत आपल्या पाठीशी उभा रहातो. यासाठी भगवंताला शरण जाऊन त्याच्याकडे बळ मागा आणि ‘तो कोणकोणत्या रूपांत येऊन साहाय्य करतो ?’ याकडे कृतज्ञताभावाने पहा ! ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव दुःखनिवारक आहेत’, हे लक्षात घेऊन पूर्ण श्रद्धेने त्यांच्यावर सर्व भार सोपवा !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१६.४.२०२६)