भंडारा येथे गोतस्करांकडून आक्रमण होऊनही पोलिसांची बोटचेपी भूमिका !

पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचा आरोप

प्रातिनिधीक छायाचित्र

भंडारा – येथील लाखनी पोलीस ठाणे सीमेत येणार्‍या सालेभाटा गावात गो तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोतस्करांनी आक्रमण केले. त्यांनी थेट पोलीस कर्मचार्‍याची कॉलर पकडून त्याला धक्काबुक्की केली. लाखनीचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे म्हणाले, ‘‘कॉलर पकडली किंवा धक्काबुक्की केली, असा प्रकार घडलेला नाही; मात्र पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गोतस्करांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १५ गोवंशियांची सुटका करून त्यांना गोशाळेत पाठवण्यात आले आहे.’’

१. सालेभाटा गावातील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात गोवंशियांना बांधलेले असून त्यांना पशूहत्येसाठी नेणार असल्याची माहिती ‘गौरक्षा हिंदु दल’ आणि ‘बजरंग दल’ यांच्या कार्यकर्त्यांना मिळाली. ती त्यांनी पोलिसांना दिली. (जी माहिती गोरक्षकांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का मिळू शकत नाही ? – संपादक)

२. पोलीस कर्मचारी आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते घटनास्थळी पोचल्यावर गोतस्कर आक्रमक झाले.

३. तस्करांपैकी एकाने पोलिसाला धक्काबुक्की केली, तर दुसर्‍याने हातात काठी घेऊन गोवंशियांचे वाहन गोशाळेत नेण्यास प्रतिबंध केला. पोलिसांना रस्त्यात अडवून दमदाटी केली. हा प्रकार व्हिडिओद्वारे सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला.

पोलिसांवर हात उचलणार्‍या तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे.

संपादकीय भूमिका

  • पोलिसांना गोतस्करांचे भय वाटते कि कुणाच्या दबावामुळे पोलीस त्यांची प्रतिमा सांभाळत आहेत ?, असा प्रश्न कुणाच्या मनात निर्माण झाल्यास त्यात चूक काय ?
  • स्वतःच्या जिवावर बेतूनही गोतस्करांना संरक्षण पुरवणारे पोलीस काय कामाचे ?