विद्रोही आणि नास्तिकवादी चळवळीची वाताहत झाल्याने वैफल्यग्रस्ततेतून वारकरी संप्रदायावर टीका ! – ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर

पत्रकार परिषदेत मध्यभागी ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर

पंढरपूर – आताच्या काळात संपूर्ण विद्रोही आणि नास्तिकवादी चळवळीची वाताहत झाली आहे. या चळवळीला ज्यांनी राजाश्रय दिला त्यांचीही वाताहत झाली आहे. त्यामुळे नैराश्य आणि वैफल्यग्रस्तेतून ‘वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली आहे’, अशी विधाने केली जात आहेत. अशा प्रकारची विधाने जे करत आहेत, त्यांची कोणत्याही राजकीय पक्षांशी लढण्याची शक्ती राहिली नसल्याने वारकरी संप्रदायाला ‘सॉफ्ट टार्गेट’ (सौम्य लक्ष्य) म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केलेल्या अशा विधानांमुळे त्यांना वारकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे तर लागेलच; मात्र त्याही पुढे जाऊन संतांची निंदा करणार्‍यांना ईश्वराचा प्रकोपही सहन करावा लागेल, अशी चेतावणी ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील २० ‘प्रतिगामी महाराजां’ची नावे घोषित केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे वारकरी संप्रदायातील प्रमुखांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज पुढे म्हणाले, ‘‘समाजात जातीव्यवस्था निर्माण करायची, जातींचे गट पाडायचे आणि त्यातून राजकारण करायचे, असे ज्यांचे चालते त्यांचे जातीव्यवस्थेचे मनसुबे वारकरी संप्रदायामुळे उद्ध्वस्त होतात. त्यामुळे ते वारकर्‍यांवर अशी टीका करत आहेत. जे लोक एकादशीला पंढरपूरमध्ये येऊन मांसाहार करतात, अशा लोकांनी वारकरी संप्रदायाला काहीतरी शिकवणे; म्हणजे वेश्येने पतिव्रतेला संसार कसा करायचा ? हे शिकवण्यासारखे आहे.’’

विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा ! – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

महाराष्ट्रातील वारकरी संतप्त असून या संदर्भात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी, म्हणजेच महाराष्ट्र शासनाने स्वत: लक्ष घालून राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना तात्काळ अटक करावी. या संदर्भात वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळी १९ एप्रिल या दिवशी पंढरपूर येथे पोलीस ठाण्यात निवेदन देतील. विकास लवांडे यांना अटक न झाल्यास याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटतील.