महापुरुषांच्या कर्तव्यांचे स्मरण करून देणारी यंदाची आगळीवेगळी अक्षय्य तृतीया !

पाच पातशाह्यांचे निर्दालन करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवराय यांचा इतिहास कुणाला वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही. या युगपुरुषाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःतील ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या बळावर हिंदूंवर चहू बाजूंनी होणारी आक्रमणे केवळ थोपवली नाहीत, तर परतवली. दुराचारी मोगलांचा महाराजांनी निःपात केला. हिंदूंना सुरक्षित ‘हिंदवी स्वराज’ मिळवून दिले. यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य वेचले. आज आपणही छत्रपतींप्रमाणे धर्मरक्षणार्थ सिद्ध होण्याची नितांत आवश्यकता आहे.

– श्री. योगेश जलतारे

१. सनातन राष्ट्र अक्षय्य राखण्यासाठी भगीरथ प्रयत्न करण्याचा संकल्प आवश्यक ! 

‘आज वैशाख शुक्ल पक्ष तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया ! साडेतीन शुभमुहुर्तांपैकी एक शुभमुहूर्त ! या तिथीला कोणतेही शुभकार्य करण्यासाठी मुहूर्त पहाण्याची आवश्यकता नसते. ‘मदनरत्न’ या ग्रंथात भगवान श्रीकृष्णाने ‘या तिथीला देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य म्हणजे न्यून न होणारे असते’, असे सांगितले आहे. या दिवशी भगवान श्रीविष्णूने परशुरामाच्या रूपात सहावा अवतार घेतला. भागीरथी गंगानदीचे अवतरण पृथ्वीतलावर याच दिवशी झाले. यावर्षीचा दुग्धशर्करायोग, म्हणजे परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती याच दिवशी आहे. त्यामुळे या दिवशी ३ महापुरुषांच्या कर्तव्यांचे स्मरण करून त्यांच्याप्रमाणे सनातन राष्ट्र अक्षय्य राखण्यासाठी भगीरथ प्रयत्न करण्याचा संकल्प करणे, हीच त्यांच्याप्रतीची खरी कृतज्ञता ठरेल !

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक आणि सामाजिक कृती !

१. ‘देवता आणि पितर यांच्यासाठी तीलतर्पण केले जाते, तसेच दानधर्म करण्यात येतो.

२. या दिवशी धर्मशास्त्रात वृक्षारोपण करण्यास सांगितले आहे. यातून हिंदु धर्माने वृक्षारोपणाचे महत्त्व शतकानुशतके समाजमनावर अंकित केले आहे, हे स्पष्ट होते. ही हिंदु धर्माची महानता आहे.

३. अनेक लोक या दिवशी पाणपोई चालू करतात. पाणपोई म्हणजे रस्त्यावर सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची केलेली निःशुल्क सोय. यातून समाजऋण फेडले जाते.

या दिवशी काही विशेष कृतीही केल्या जातात, उदा. भूमीची मशागत करणे, बियाणे पेरणे इत्यादी.’

– श्री. योगेश जलतारे

२. पृथ्वीला २१ वेळा दुराचारी राजांपासून मुक्त करणारे भगवान परशुराम !

भगवान परशुरामाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,

‘अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।’

अर्थ : मुखात चार वेद आहेत, पाठीवर बाणांसह धनुष्य आहे, असा परशुराम शाप देऊन किंवा बाणाने शत्रूचा नाश करतो.

श्री. योगेश जलतारे

भगवान परशुरामाने स्वतःतील ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या बळावर २१ वेळा सनातन धर्माची क्षती (हानी) करणार्‍या दुराचारी राजांपासून पृथ्वीला मुक्त करून सनातन धर्माचे रक्षण केले. आजही सनातन धर्मावर चहूबाजूंनी आक्रमणे चालू आहेत. या आक्रमण करणार्‍यांमध्ये जिहादी आक्रमक, कुटीलतेने भोळ्याभाबड्या हिंदूंना फसवून त्यांचे धर्मांतर करणारे ख्रिस्ती, वामपंथी, नास्तिकतावादी आणि बुद्धीजीवी अशा सर्वांचाच समावेश असून ते सनातन धर्म नष्ट करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

या पार्श्वभूमीवर हिंदूंनी योग्य साधनेद्वारे स्वतःतील ब्राह्मतेज वाढवून सर्वांना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, तसेच धर्मावर होणार्‍या विविध आघातांचा योग्य वेळी प्रतिवाद करून धर्मरक्षण करणे आवश्यक आहे. यातूनच सनातन धर्म अक्षुण्ण (अबाधित रहाणारे) राहू शकणार आहे. सनातन धर्म अनादी आणि चिरंतन असल्याने त्याला कुणीही नष्ट करू शकणार नसले, तरी त्याला क्षती पोचवण्याचे प्रयत्न तरी आपण का खपवून घ्यावेत ? त्यामुळे साधनेद्वारे आपले तपोबल वाढवून धर्मरक्षणार्थ सिद्ध होण्याचा संकल्प आजच्या दिवशी हिंदूंनी करायला हवा.

 

३. पितरांना मुक्ती मिळवून देण्यासाठी सहस्रो वर्षे तप करून गंगा नदी पृथ्वीवर आणणारा राजा भगीरथ !

इश्वाकु वंशातील महान राजा भगीरथ दृढनिश्चयी आणि पितृभक्त राजा होता. राजा भगीरथाने पूर्वजांना मुक्ती मिळावी, यासाठी सहस्रो वर्षे तप करून ब्रह्मदेव आणि शिव यांना प्रसन्न करून गंगा नदी पृथ्वीवर आणली. यासाठी राजा भगीरथाला विविध समस्यांवर मात करून अत्यंत चिवटपणे तप करावे लागले. यावरूनच ‘भगीरथ प्रयत्न’ हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. आज हिंदूंनीही राजा भगीरथाप्रमाणे चिवटपणे प्रयत्न करून धर्मपालन, धर्मरक्षण आणि धर्मजागृती करणे आवश्यक आहे.

यंदा धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया साजरी करण्यासह राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आपण सज्ज होऊया !’

– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (२८.३.२०२६)