
मडगाव, १६ एप्रिल (वार्ता.) – हेडलँड सडा, वास्को येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने हटवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाची कार्यवाही १६ एप्रिल या दिवशी करण्यात येणार होती आणि असा प्रस्ताव मुरगाव बंदर प्राधिकरणाने शासनाकडे मांडला होता; मात्र जनभावना लक्षात घेऊन १६ एप्रिलला पुतळा हटवण्याची कार्यवाही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुतळ्यासंदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने गोवा सरकारने हेडलँड सडा परिसराच्या ५० मीटर परिसरात भारतीय न्याय संहितेच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. उच्च न्यायालयाने पुतळा हटवण्याचे निर्देश दिले आहेत. मुरगाव बंदर प्राधिकरणाला न्यायालयाच्या निर्देशांची कार्यवाही करण्यास मिळावी यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकार्यांनी १६ एप्रिल या दिवशी प्रसारित केलेल्या आदेशात म्हटले आहे. पुतळा हटवण्याच्या प्रस्तावित कारवाईला विरोध करण्यासाठी १ ते दीड सहस्र लोक एकत्र येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे, असे आदेशात म्हटले आहे. मिरवणूक, धरणे, निदर्शने आणि घोषणाबाजी यांसह सर्व सार्वजनिक मेळाव्यांवर प्रतिबंधित क्षेत्रात बंदी घालण्यात आली आहे. चिथावणी देणारी भाषणे किंवा अशांतता निर्माण करण्याची शक्यता असलेल्या कृतींवरही बंदी घालण्यात आली आहे.
या भागात प्रवेश केवळ अधिकृत सरकारी अधिकारी, मुरगाव बंदर प्राधिकरणाचे कर्मचारी आणि नियुक्त पोलीस कर्मचारी यांच्यापुरता मर्यादित आहे.
हा पुतळा हटवण्याचे काम हाती घेतल्यास काय होऊ शकते ? यावर विचायविनिमय करण्यासाठी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस् यांनी आधी एक बैठक बोलावली. या बैठकीला दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई, उपविभागीय दंडाधिकारी, मुरगावचे मामलेदार, पोलीस निरीक्षक, मुरगाव बंदर प्राधिकरणाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती. या वेळी सशस्त्र पोलीस दलाची पुरेशी कुमक नेमण्याची आवश्यकता आणि कायदा अन् सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था यांची पूर्तता सुनिश्चित करणे, या गोष्टींवर विचार करण्यात आला. त्यानंतर प्रस्तावित कार्यवाही स्थगित करण्याचा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस् यांनी दिली.
मुरगाव बंदर प्राधिकरणाने जनभावनेचा आदर राखावा ! – आमदार संकल्प आमोणकर
मुरगाव बंदर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यावरून मुरगावचे भाजपचे आमदार संकल्प आमोणकर यांनी, ‘‘मुरगाव बंदर प्राधिकरणाने पुतळा हटवू नये आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान राखावा. प्राधीकरणाने जनभावनेचा आदर राखावा’’, असे आवाहन केले आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘प्राधिकरणाने संबंधित पुतळा हटवण्याचा प्रस्ताव रहित करून संबंधितांकडे चर्चा करून सहमतीने यावर तोडगा काढावा. छत्रपती शिवाजी महाराज हे असंख्य लोकांचे आराध्य दैवत आहे. पुतळ्याचे सूत्र हे सांस्कृतिक आणि जनभावना यांच्याशी निगडित आहे.’’
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !