Amir Hamza Shot : पाकिस्तानमध्ये आतंकवादी आमिर हमजा याच्यावर अज्ञातांकडून गोळीबार : प्रकृती चिंताजनक

लाहोर (पाकिस्तान) – ‘लष्कर-ए-तोयबा’च्या संस्थापक सदस्यांपैकी एक  असणारा आतंकवादी आमिर हमजा याच्यावर येथे एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. यात तो घायाळ झाल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी गेल्या वर्षी मे महिन्यातही त्याच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी त्याला गोळी मारली होती. हमजा याला अमेरिकेकडून ‘आतंकवादी’ घोषित करण्यात आले आहे. हमजा याचा भारतातील आतंकवादी आक्रमणात सहभाग होता. त्याला जम्मूच्या सुंजवांमधील भारतीय सैन्याच्या ब्रिगेड मुख्यालयावरील आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार मानले जाते.

आमिर हमजा अफगाण मुजाहिदीनमधील अनुभवी कमांडरांपैकी एक मानला जातो. लढाईसोबतच विविध पुस्तके लिहिल्यामुळेही त्याची ओळख होती. तो बराच काळ आतंकवादी हाफिज सईद याचा निकटवर्तीय मानला जात होता. लष्कर-ए-तोयबामध्ये त्याची भूमिका निधी संकलन, नव्या आतंकवाद्यांची भरती आणि इतर घटकांशी संपर्क साधणे अशी होती. हमजाने १९८० च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत युनियनविरुद्धच्या युद्धात भाग घेतला होता. त्यानंतर तो हाफिज सईद आणि इतर आतंकवाद्यांशी जोडला गेला.