कोल्हापूर महानगरपालिकेचा ‘आय.आय.टी. मन्डी’ समवेत सामंजस्य करार !

‘आय.आय.टी. मन्डी’ समवेत सामंजस्य करार करतांना महापौर सौ. रूपाराणी निकम (गुलाबी जॅकेट), तसेच अन्य अधिकारी

कोल्हापूर – महानगरपालिकेने देशातील अग्रगण्य तांत्रिक संस्था ‘आय.आय.टी. मन्डी’ समवेत सामंजस्य करार केला असून या संस्थेचे आता थेट तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाणार आहे. ही संकल्पना महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्या पुढाकारातून साकार झाली असून कोल्हापूर शहराला आधुनिक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित शहर बनवण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रमास ‘आय.आय.टी. मन्डी’चे प्रमुख डॉ. सत्त्वशील पोवार, डॉ. अमित शुक्ला आणि हर्षवर्धन साळुंखे उपस्थित होते.

देशातील ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल !

देशातील विविध ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांमध्ये ‘आय.आय.टी.’ संस्थांचे तांत्रिक सहकार्य घेतले जाते. शहरी नियोजन, कृत्रिम बुद्धीमत्ता, संगणकीय ज्ञानजाल, पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्रांतील आयआयटीचा अनुभव कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘आय.आय.टी. मन्डी’ समवेतचा हा करार शहराच्या प्रगतीसाठी ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणारा ठरेल.

‘आय.आय.टी. मन्डी’ने यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालया समवेतच्या सहकार्य अंतर्गत नवरात्र उत्सवात अंबाबाई मंदिर परिसरात विशेष संगणकीय प्रणाली यशस्वीपणे राबवली होती, तसेच जोतिबा यात्रेतही ही प्रणाली प्रभावीपणे वापरण्यात आली होती. यामुळे गर्दी व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि सुकर झाले होते. या सहकार्यामुळे शहरातील आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, शहर नियोजन करतांना साहाय्य होणार आहे आणि यामुळे शहराच्या विकासाला बळ मिळणार आहे.