जगात ज्ञान असूनही काही जण अज्ञानात कसे ?

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. जगात एवढे ग्रंथ, संत असतांना लोक अंधारात का ? : ‘एक शंका आहे. ‘एवढी शास्त्रे आहेत. जगातील सगळ्या भाषांत गीतेचे अनुवाद आहेत. अनेक ग्रंथ आहेत. टीका भाषणे आहेत. असे अनेक ग्रंथ जगातील सगळ्या भाषांत आहेत. जगात अनेक संत आणि ज्ञानी झाले आहेत. सगळा प्रकाशच प्रकाश, असंख्य सूर्य, तरीही जग अंधारात का आणि कसा ? एवढा प्रकाश आहे, तरी आम्ही अंधारात कसे ? कोटी कोटी सूर्य आहेत, तरी आम्ही अंधारात कसे ?’

२. मत्सराने ग्रासलेल्या लोकांनी स्वतः अंधारात राहून दुसर्‍याचे दिवे विझवण्याचा प्रयत्न करणे : आम्ही अंधारात रहायचे ठरवले, घराच्या खिडक्या-दारे बंद करून घेतली. सूर्याचा प्रकाशच येऊ दिला नाही, तर दोष कुणाचा ? असंख्य दिवे उजळले आहेत. आम्हीच ते दिवे विझवून टाकण्याकरता प्रयत्न केले आहेत ना ! आम्ही अंधारात, तर तुम्ही उजेडात कसे ? ‘तुम्हीही आमच्यासारखे अंधारात रहा’, अशी आमची धारणा आहे. आम्ही अशा मत्सराने ग्रासले गेलो आहोत.

३. ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, त्याला साधु, सत्पुरुष, संत, शास्त्र आणि ग्रंथ यांच्यातून प्रकाश मिळवता येईल.

४. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् ।
लोचनाभ्यां विहीनस्य दर्पणः किं करिष्यति ।।

– चाणक्यनीती, अध्याय १०, श्लोक ९

अर्थ : ज्याप्रमाणे आंधळ्या मनुष्याला आरशाचा काही लाभ होत नाही, त्याचप्रमाणे ज्याला स्वतःची बुद्धी नसते, त्याला शास्त्र काय साहाय्य करणार ?

५. शास्त्र आणि सत्पुरुष यांच्या सत्संगाचा उपयोग : अंतःकरण निर्मळ असेल, तरच प्रज्ञा अंकुरते. बुद्धीला नवे नवे कोंब फुटतात. तो स्वतःची ज्योत शास्त्र, ग्रंथ यांवरून, सत्पुरुषांच्या सत्संगाने पेटवून घेतो. शास्त्रसंगाचा, सत्संगाच्या ज्योतीवरून पेटवून घेतो.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, १ डिसेंबर २०२१)