श्री विठ्ठलाची शासकीय पूजा करण्यास नकार देणार्‍या शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाविषयी बोलू नये ! – ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने-शास्त्री, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष

राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने-शास्त्री यांचे विधान

डावीकडून ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने-शास्त्री आणि शरद पवार

पंढरपूर – शरद पवार मुख्यमंत्री असतांना त्यांनी श्री विठ्ठलाची शासकीय पूजा केली नाही. तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले की, तुम्हाला विठ्ठलपूजा करायची नव्हती तर तुम्ही पंढरपूर येथे का आलात ? तेव्हा नास्तिकतावादी शरद पवार यांनी ‘मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे’, असे उत्तर दिले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी विठ्ठलाची पूजा करण्यास नकार देऊन श्रीविठ्ठल आणि वारकरी यांचा अवमान केला आहे. अशा नास्तिकतावादी शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाविषयी बोलण्याचा अधिकार गमावला आहे, असे वक्तव्य ‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’चे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने-शास्त्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

१. पुणे येथे नास्तिकतावादी मेळाव्यात डॉ. मुग्धा कर्णिक यांनी ‘वारकरी आणि विठ्ठल कालबाह्य झाला आहे’, अशी मुक्ताफळे उधळली, तेव्हा पवार मूग गिळून गप्प का होते ? छगन भुजबळ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यात असतांना हिंदुत्वनिष्ठ होते; मात्र पवार यांच्या साथीला गेले आणि ते ‘श्री सरस्वतीदेवीचे फोटो शाळेतून काढा’, असे हिंदु धर्मविरोधी वक्तव्य करू लागले.

२. वारकरी संप्रदायाचे वेदांताचार्य वैकुंठवासी गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते बाबा नेहमी म्हणत असत, ‘वारकरी हा प्रथम हिंदु आहे आणि नंतर तो वारकरी आहे.’

३. सहस्रो वर्षांत हिंदूंवर अनेकांनी आक्रमणे केली. डच, पोर्तुगीज, इंग्रज, मुसलमान, नास्तिकतावादी इत्यादी सर्वांना पुरून उरण्याचे कार्य वारकरी संप्रदायाच्या संतांनी केले. अनेक जातींमध्ये संत निर्माण होऊन हिंदु धर्माचे महत्त्व वाढवण्याचे महत्कार्य वारकरी संतांनी केले आहे.

४. पवार यांनी वारकरी संप्रदायामध्ये पुरोगामी वारकर्‍यांच्या घुसखोरीचे षड्यंत्र त्यांच्या सत्ताकाळातही पुष्कळ करून पाहिले; परंतु वैकुंठवासी गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते बाबा आणि वारकरी यांनी त्यांना निष्प्रभ केले. तेव्हा पवार साहेब आम्ही तुमचा जाहीर निषेध करून सांगत आहोत, खबरदार, वारकर्‍यांविषयी बोलाल, तर तो अधिकार तुम्ही केव्हाच गमावला आहात.