(म्हणे) ‘दाऊद इब्राहिम यांच्यामुळे माझे घर चालते !’ – Ram Gopal Varma

चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे वादग्रस्त विधान

राम गोपाळ वर्मा व दाऊद इब्राहिम

मुंबई – मी दाऊद इब्राहिम याच्यामुळे जगत आहे. त्याच्यामुळेच माझे घर चालते, असे वादग्रस्त विधान चित्रपट दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी केले. ‘फिल्मफेअर’ या ‘यू ट्यूब चॅनेल’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राम गोपाल वर्मा यांनी हे वक्तव्य केले.

या वेळी राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘‘मी माझे ‘गन्स अँड थाईज’ हे आत्मचरित्र दाऊद इब्राहिम याला समर्पित केले होते; मात्र प्रकाशकांनी दाऊद याचे नाव हटवले. दाऊद इब्राहिम नसता, तर मी ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ यांसारखे अजरामर चित्रपट बनवू शकलो नसतो. मग मी त्याला हे पुस्तक का समर्पित करणार नाही ? त्यामुळेच मी माझे घर चालत आहे. मी एकमेव असा माणूस होतो, ज्याला गुन्हेगारांकडून धमक्यांचे कधीच दूरभाष  आले नाहीत; कारण त्यांना ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ हे चित्रपट पुष्कळ आवडले होते. त्यांना मला त्रास द्यायचा नव्हता. मी एक प्रकारे त्यांचा जीवलग मित्र झालो होतो.’’

संपादकीय भूमिका

राम गोपाल वर्मा यांच्या विधानातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कुठून पैसा येत होता, हे स्पष्ट होते. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतून हिंदूंच्या श्रद्धास्थानांना वारंवार दुय्यम लेखले जाणे, त्यांची विटंबना करणे असे प्रकार सर्रासपणे होत होते आणि अद्यापही होत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत असे कुणाकुणाला पैसे पुरवले गेले, याची पोलिसांनी सखोल चौकशी करणे आवश्यक !