सध्या ऊर्जेवरून चालू झालेल्या युद्धात इराण आणि अन्य आखाती प्रदेशातील तेलसाठ्यांवर होत असलेल्या आक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात तेल अन् नैसर्गिक वायू ऊर्जेची हानी होत आहे. मध्यंतरीच्या काळात इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनीतील मार्ग बंद केल्याने अनेक देशांच्या तेलवाहू नौका तेथे अडकल्या. त्यामुळे ऊर्जेचे मोठे संकट जगासमोर उभे ठाकले. याला भारतही अपवाद नव्हता; परंतु भारताचे कणखर नेतृत्व, योग्य परराष्ट्रनीती, कूटनैतिक प्रयत्न आणि भारताच्या नौदलाच्या सुरक्षा चौकटी यांमुळे देशात काही तेलनौका आल्या, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे जनतेला प्रतिदिन वाहन चालवण्यासाठी पर्याप्त इंधन आणि घरगुती वापरासाठी ‘एल्.पी.जी.’ गॅसचा (द्रवीभूत पेट्रोलियम वायू) पुरवठा तूर्तास तरी चालू आहे; परंतु ही परिस्थिती युद्धकाळात केव्हाही पालटू शकते. याखेरीज भारतात इंधनाचा अनधिकृत साठा करून साठेबाजीद्वारे इंधनाच्या किमतीत फुगवटा निर्माण करणारे महाभागही आहेतच. त्यामुळे जनतेला कोणत्याही परिस्थितीशी येनकेन प्रकारेण या समस्येचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ऊर्जा सुरक्षा आणि अत्यावश्यक पुरवठा यांसह ऊर्जा बचतही तितकी आवश्यक झाली आहे. यांतील सुरक्षा आणि पुरवठा ही कर्तव्ये सरकार यथायोग्य पार पाडतच आहे; परंतु ऊर्जा बचत करण्याचे सूत्र मात्र आम्हा नागरिकांना हाताळावे लागणार आहे. याविषयीचा ऊहापोह या लेखात करण्यात येत आहे.

१. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जनतेला केलेल्या आवाहनाचे पुन्हा अनुकरण हवे !
वर्ष १९६५ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जनतेला ‘जय जवान, जय किसान’ हा मूलमंत्र देऊन २ आघाड्यांवर युद्ध करायला सांगितले होते. पहिले सीमेवर शत्रूशी आणि दुसरे देशांतर्गत निर्माण झालेल्या अन्नधान्याच्या टंचाईशी. त्यासाठी त्यांनी शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात धान्य पिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यासह अन्नटंचाईचा सामना करण्यासाठी जनतेला आठवड्यातून किमान एक वेळ उपवास करण्याचे आवाहनही शास्त्री यांनी केले होते. त्यांचे वैशिष्ट्य, म्हणजे ते केवळ आवाहन करून शांत बसले नाहीत, तर त्यांनी तशी प्रत्यक्ष कृती करून जनतेला प्रेरणा दिली होती. परकीय साहाय्यावर विसंबून न रहाता समस्येचा स्वबळावर सामना करण्याचे धैर्य त्यांनी त्या वेळी भारतियांना दिले. आज ‘जय जवान, जय किसान’ यांसह ‘जय तंत्रज्ञान’ असाही उद्घोष करावा लागतो; कारण आज अन्न-धान्यापेक्षाही आपण तंत्रज्ञानासाठी लागणार्या ऊर्जेसाठी अन्य देशांवर विसंबून आहोत. त्यामुळे आपल्याला युद्धकाळात अधिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यादृष्टीने पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात लालबहादूर शास्त्री यांनी ज्या प्रकारे नागरिकांना एकजुटीने राहून देशातील साधनसामग्रीचा वापर काटकसरीने आणि दायित्वाने करण्यास सांगितला होता, त्या आवाहनाचे अनुकरण करण्याची वेळ आज आली आहे.
![]() ‘वर्ष १९६५ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी अन्नटंचाईचा सामना करण्यासाठी जनतेला आठवड्यातून किमान एक वेळ उपवास करण्याचे आवाहन केले होते.’ – श्री. योगेश जलतारे |
२. युद्धकाळाला सामोरे जाण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून आजच कृती आवश्यक !

आज आपणा सर्वांनाच बेपर्वा वृत्तीने वागण्याची सवय झाल्याने समस्येचे गांभीर्य लक्षात येत नाही. त्यामुळे ‘आज आहे, तर उपभोग घेऊया. उद्याचे उद्या पाहू’, असा विचार आपण करतो. श्रीमंत व्यक्ती म्हणते, ‘माझ्याकडे मुबलक आहे, तर मी इतरांचा विचार का करू ?’ गरिब व्यक्ती म्हणते, ‘माझ्या स्थितीत कोणता पालट होणार आहे ?’ या सर्व विचारप्रक्रियेत स्वतःची मनोभूमिका स्वकेंद्रित असल्याने समष्टीचा विचार आपल्या मनात येत नाही किंवा आलाच, तर तो अल्प काळच रहातो; परंतु संत-महात्मे कृपाळू असल्याने त्यांना सर्व जीवितांची काळजी असते; म्हणून ते पोटतिडकीने युद्धाविषयी सजग करतात किंवा आपत्काळासंबंधी पूर्वसूचना देऊन तशी पूर्वसिद्धता करायला सांगतात. तेव्हा त्यांचे आज्ञापालन म्हणून तरी आपण कृतीला आरंभ करायला हवा.
थोडा वेळ मनाशी विचार करून पहा. आपल्याला उपवासाची सवयच नाही आणि २-३ दिवस जेवणच मिळाले नाही, तर काय ? चहा घेतला नाही, तर आपल्याला दिवसभर डोकेदुखीचा त्रास होतो, उद्या युद्धकाळात आपल्या घरापर्यंत दूध पोचले नाही तर ? आपल्याला अगदी जवळ जरी जायचे असले, तरी आज आपण वाहनाचा उपयोग करतो, उद्या जर आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध झाले नाही, तर काही अंतर चालण्याची क्षमता आपल्यात आहे का ? किंवा आज सायकल चालवण्याची वेळ आली, तर आपले गुडघे त्यासाठी सिद्ध आहेत का ? या विचारांतूनच आपल्याला पूर्वसिद्धतेचे मर्म लक्षात येईल. आज जरी स्थिती आटोक्यात असली, तरी आपल्याला बचतीची सवय नसल्याने युद्धकाळात आपल्याला अधिक त्रास होऊ शकतो. आज एक दिवस जरी भ्रमणभाष काही कारणाने नादुरुस्त झाला किंवा सेवा देणार्या आस्थापनांत काही तांत्रिक अडचण निर्माण होऊन भ्रमणभाष बंद पडला, तर आपली स्थिती वेड लागल्यासारखी होते. असे सतत काही दिवस अनुभवायला आले तर काय ? यादृष्टीने प्रसंगाचा सराव म्हणून या गोष्टींचा उपयोग काटकसरीने करणे, बचत करणे, स्वतःच्या शारीरीक क्षमतेचा उपयोग करण्याचा प्रयत्न करणे, अशा कृतींतून ऊर्जा बचतीचा मार्ग अवलंबायला हवा.
घरच्या घरी ऊर्जा बचत कशी करू शकतो ?

देशसेवा म्हणून स्वतःच्या स्तरावर ऊर्जा बचत आपण कशी करू शकतो, याचे चिंतन आपण आपापल्या स्तरावर निश्चितच करावे. येथे उदाहरणे म्हणून काही कृती देत आहे.
घरात आपण प्रतिदिन विविध पदार्थ करत असू, तर जेवणात काही काळ दोनच पदार्थ शिजवू शकतो का ?, उदा. पोळी-भाजी किंवा वरण-भात आणि सायंकाळी केवळ खिचडी अथवा पराठे. यातून घरगुती गॅसची काही प्रमाणात बचत होईल.
आपण रहात असलेल्या मजल्यापर्यंत (अनुमाने चौथ्या मजल्यापर्यंत तरी) जाण्यासाठी उद्वाहन (लिफ्ट) न वापरता आपल्याला जिन्याचा उपयोग करता येईल. यातून देशाची विद्युत् ऊर्जा वाचेल.
जवळपास जाण्यासाठी वाहनाचा उपयोग न करता चालत जाऊ शकतो किंवा सायकलचा उपयोग करू शकतो. यातून इंधन वाचेल.
भ्रमणभाषचा वापर अत्यावश्यक आहे तेव्हाच केला, तर यातून वेळ आणि अन्य ऊर्जाही वाचेल.
सध्या उन्हाळा असल्याने अंघोळीला पाणी पुष्कळ गरम लागत नाही, तर तेथेही विजेची किंवा गॅसची थोडी बचत करता येईल.
अशा प्रकारे घरात काडेपेटी, वीज, पाणी अशा विविध संसाधनांचा उपयोग काटकसरीने करू शकतो.
शरिराला हानीकारक शीतपेये प्राशन करणे पूर्णपणे थांबवू शकतो.
अशा अन्यही काही गोष्टींचा अभ्यास करून काय बंद करणे किंवा काटकसरीने उपयोगात आणणे शक्य आहे, हे पाहू शकतो.
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह.
३. ऊर्जेच्या बचतीच्या लाभाचे गणित अभ्यासल्यास त्याची फलनिष्पत्ती कळेल !
‘थेंबे थेंबे तळे साचे’, ही म्हण आपण लहानपणापासून ऐकली असणार. यातून प्रतिदिन थोडी थोडी बचत केली, तर चांगला संचय होतो, हे शिकायला मिळते. यादृष्टीने पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी केलेल्या एक वेळ उपवासाचेच उदाहरण पाहूया. आठवड्यातून एक वेळ आपण जेवलो नाही, तर आपल्याला शारीरिकदृष्टया आणि देशाला अन्नऊर्जेच्या बचतीच्या माध्यमातून लाभ होणार. समजा एका व्यक्तीचा आहार एक वेळच्या जेवणात २ पोळ्या खाण्याचा आहे आणि भारतातील अशा राष्ट्रप्रिय नागरिकांनी ज्यांची संख्या अनुमाने ५० लाख गृहीत धरल्यास एक वेळ जेवण घेतले नाही, तर एक वेळेला १ कोटी पोळ्यांची बचत होईल. वाचक सूज्ञ असल्याने अन्य पदार्थ, उदा. भात, भाजी, आमटी यांचे बचतीचे प्रमाण येथे देत नाही. आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यातून एक वेळ उपवास करावा, हे आयुर्वेदच सांगतो. त्यामुळे आपल्यावर या उपवासाचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, हे निश्चित. यासह उपवास केल्याने संयम वाढेल, तो वेगळा.
२७ मार्च २०२६ या दिवशी ‘गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन’चे अध्यक्ष नरहर ठाकूर गोव्यातील उपलब्ध पेट्रोलसाठ्याविषयी माहिती सांगतांना म्हणाले, ‘‘माझ्या पेट्रोलपंपावर २६ मार्च या दिवशी सकाळी ६ सहस्र लिटर पेट्रोल होते, ते पुढील २ घंट्यांत संपले; परंतु लगेचच पुरवठा झाला.’’ कल्पना करा… गोव्यासारख्या छोट्याशा राज्यात एका पेट्रोलपंपावर केवळ २ घंट्यांत इतके पेट्रोल विकले जाते. संपूर्ण राज्यात आणि नंतर संपूर्ण भारत देशात किती पेट्रोल विकले जात असेल ? वर उल्लेखल्याप्रमाणे देशातील ५० लाख राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एका सप्ताहात केवळ १ लिटर पेट्रोल बचत करायचे ठरवले, तर प्रति सप्ताह ५० लाख लिटर पेट्रोल देशाला अन्यत्र वापरता येईल कि नाही ? त्यामुळे आपण जेव्हा छोटी बचत करतो, तेव्हा त्याचे परिणाम मोठे असतात, हे लक्षात घेऊन आपण प्रत्येक ठिकाणी शक्य तितकी ऊर्जेची बचत करायला हवी.
४. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे मनाची ऊर्जा योग्य रितीने वापरावी !
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।
बन्धनं विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं मनः ॥ – त्रिपुरातापिन्युपनिषद्, उपनिषद् ५, श्लोक ३
अर्थ : मनुष्याच्या बंधनात असण्याचे किंवा मोक्षप्राप्ती करून घेण्याचे कारण मन हेच असते.
यातून हे लक्षात येईल की, आपण मनाची ऊर्जा कशी वापरतो, यावर हे अवलंबून आहे. आपण केवळ युद्धाचा विचार करून चिंताग्रस्त होत असू, ‘पुढे कसे होईल ?’, असा विचार करत असू किंवा भयग्रस्त होत असू, तर आपण आपल्या मनाच्या ऊर्जेचा अपव्यय करत आहोत. ‘युद्धाचे संकट समोर आहे’, हे लक्षात घेऊन विवेकबुद्धी जागृत ठेवून त्या दृष्टीने आवश्यक पूर्वसिद्धता, काळाला धीराने सामोरे जाण्यासाठी मनाची सिद्धता करत असू, तर आपण मनाच्या ऊर्जेचा योग्य उपयोग करत आहोत. त्यामुळे युद्धकाळात मनाची ऊर्जा नकारात्मक स्थितीत रहाण्यात खर्ची न घालता ‘देव, देश आणि धर्म यांसाठी मी काय करू शकतो ?’, याचा विचार केल्यास त्या ऊर्जेचा उपयोग योग्य दिशेने होत आहे, असे आपण समजू शकतो. यादृष्टीने समाजप्रबोधन करून त्यांना साधनेसाठी उद्युक्त् करणे, समाजाला राष्ट्र आणि धर्म रक्षण यांसाठी सिद्ध करणे; जेथे काही संकट आहे, तेथे धावून जाणे, असे करू शकतो. या प्रतिकूल काळातही देश आणि देशवासीय यांना अनुकूलता लाभावी; देशाच्या सीमेवरील सैनिकांचे रक्षण व्हावे, यांसाठी यज्ञयागादी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे, ज्यांना शक्य आहे त्यांनी समष्टी कल्याणासाठी निरंतर प्रार्थना आणि नामजप करणे, लोकांना युद्धकाळात आधार देणे, एखाद्याच्या घरात काही आपत्ती आल्यास त्याचे मनोधैर्य खचून जाऊ नये, यासाठी त्याला आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन स्थिर ठेवणे, अशा विविध माध्यमांतून आपण साधनारत राहिल्यास मनाची ऊर्जा खर्ची न पडता वाढेल, यात शंका नाही.’
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (२८.३.२०२६)

‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)