‘ईठ्ठला’ नाटक सादर केल्यास कायदेशीर कारवाई होईल ! – रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • बंदी असतांनाही वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकाचे प्रयोग रत्नागिरीत सादर करण्याचा प्रयत्न

  • विठ्ठलभक्तांनी ‘जनता दरबारात’ पालकमंत्र्यांना दिले निवेदन

पालकमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर कार्यालयाबाहेर उपस्थित वारकरी संप्रदायाचे हभप आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

रत्नागिरी – वारकरी संप्रदायाची विटंबना करणार्‍या ‘ईठ्ठला’ नाटकाला वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती, विठ्ठलभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला. या नाटकाला महाराष्ट्रात बंदी असतांनाही हे नाटक सादर करण्याचा अट्टाहास केला जात आहे. या विरोधात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ठाम भूमिका घेत ‘नाटक सादर केले, तर कायदेशीर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणी दिली आहे.

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ११ एप्रिल या दिवशी रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडलेल्या ‘जनता दरबारा’त त्यांची ही भूमिका मांडली. बंदी असूनही नाटक सादर केले जात असल्याविषयी वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

१. यापूर्वी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी निवेदन दिले असता पालकमंत्री डॉ. सामंत यांनी नाटकाच्या सादरकर्त्यांना नाटकाच्या नावात पालट करा, पात्रांना दिलेली संतांची नावे हटवा आणि वारकरी संप्रदायाला हिंसक दाखवणार्‍या संकल्पनेत त्वरित पालट करा’, अशा कडक सूचना दिल्या, तसेच ‘सदर नाटक परत सादर करता येणार नाही’, अशी समजही दिली होती.

२. यानंतरही ‘ईठ्ठला’ नाटक पुन्हा विविध ठिकाणी सादर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे’, अशी माहिती वारकरी आणि हिंदु जनजागृती समितीचे साधक यांनी जनता दरबारात दिली. तेव्हा पालकमंत्री म्हणाले, ‘‘बंदी असूनही नाटक सादर करण्याचा प्रयत्न होत असेल, तर सादरकर्त्यांची अरेरावी खपवून घेतली जाणार नाही. नाटक सादर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. एक हिंदु म्हणून माझी ही भूमिका आहे. मी तुमच्यासोबत आहे.’’

३. या वेळी लांजा तालुका वारकरी संप्रदायाचे सर्व ह.भ.प. मनोहर उपाख्य दादा रणदिवे, तुळशीराम मोरे, विष्णु लांजेकर, दर्शन आग्रे, गोविंद चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे अमितराज खटावकर, भैरूलाल भंडारी, गोविंद भारद्वाज, संजय जोशी आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे वारकरी आणि विठ्ठलभक्त यांनी स्वागत केले आहे.

काय आहे ‘ईठ्ठला’ या नाटकात ?

१. नाटकात श्री विठ्ठलाच्या भक्तीत बेभान होऊन नाचणारे दांपत्य पैशांच्या लोभापायी १० लोकांची हत्या करतात, असे दाखवले आहे. हे वारकरी तत्त्वज्ञानाच्या पूर्णतः विरोधात आहे.

२. नाटकातील पात्रांना ‘तुका’, ‘जनाई’ आणि ‘नामा’ अशी संतांची नावे देऊन त्यांचा अवमान करण्यात आला आहे.

३. पत्नीच्या सांगण्यावरून पती (तुका) अितथींची हत्या करतो आणि पत्नी स्वतःच्या मुलाची हत्या करते, असे अत्यंत निषेधार्ह चित्रण यात आहे.