चित्रपटांचे पालटलेले स्वरूप आणि त्यांचा समाजमनावर होणारा विपरीत परिणाम !

समाजाला नैतिक मूल्यांची जाणीव करून देणे आणि समाज योग्य दिशेने चालावा, यांसाठी गुणांचा संस्कार करण्याच्या उद्देशाने चित्रपटांचा आरंभ झाला. चित्रपटांच्या माध्यमातून कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातील मूल्ये वृद्धींगत करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आहेत. ‘अनेक चित्रपटांनी समाजावर सकारात्मक परिणाम घडवून आणला आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपल्या जीवनात चांगले पालट घडवले’, अशी उदाहरणेही आपण पहातो. चित्रपटाच्या प्रमुख अभिनेत्यांकडून तरुण पिढीला चुकीचा संदेश कसा दिला जातो, याविषयीचा ऊहापोह या लेखात करत आहे.

१. वाढते व्यसन 

सध्याच्या चित्रपटांकडे पाहिले असता ‘ते नेमका कोणता संदेश देत आहेत ?’, हा गंभीर प्रश्न निर्माण होतो. आजच्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्याला सिगारेट, मादक पदार्थ किंवा शस्त्रे हातात घेऊन एका वेगळ्या शैलीमध्ये दाखवले जाते, म्हणजेच समाजाला दिशा देणार्‍या मुख्य पात्रातूनच चुकीचे संदेश दिले जात आहेत. देशातील अनेक तरुण हे चित्रपटातील अभिनेत्यांचे अनुकरण करतात आणि त्याचप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करतात, हे वास्तव आपण समाजात पहात आहोत.

श्री. गुरुप्रसाद गौडा

२. तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळणे

अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये आरोपींनी ‘आम्ही चित्रपटांच्या प्रेरणेने हे कृत्य केले’, असे मान्य केल्याची उदाहरणेही आहेत. यावरून स्पष्ट होते की, ‘आजचे चित्रपट समाजाला, विशेषतः तरुण पिढीला चुकीच्या दिशेने नेण्याचे कार्य करत आहेत’ आणि हे आपल्या देशाच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे.

३. चित्रपटांमधून अयोग्य विचार आणि चुकीची शैली यांकडे होणारी वाटचाल 

आजची तरुण पिढी चित्रपटांचे अनुकरण करून केसांची शैली, कपडे आणि बोलण्याची पद्धत स्वीकारत आहे. त्यांना यात काहीही चुकीचे वाटत नाही; कारण चित्रपटांत दाखवलेले सर्व काही ‘सामान्य’ आणि ‘स्वीकारता येण्याजोगे आहे’, असे त्यांना वाटते; मात्र ‘चित्रपटांतून दिला जाणारा संदेश हिंदु संस्कृती, परंपरा यांना अन् देशाच्या भविष्यास पूरक आहे कि नाही ?’, याचा विचार होत नाही.

४. अश्लीलतेचा प्रसार

काही चित्रपटांमध्ये अभिनेत्री अर्धनग्न वेशभूषेत दिसून अश्लीलतेचा प्रसार करत आहेत. हे भारतीय संस्कृतीचे अवमूल्यन करणारे आहे. ‘कोणतीही लाज न बाळगता अशी चुकीची दृश्ये समाजासमोर मांडणे, म्हणजे आपल्या देशाच्या सन्मानाला धक्का देण्यासारखे नाही का ?’, याचा विचार चित्रपट निर्मात्यांनी करणे आवश्यक आहे.

‘आपल्या देशातील तरुण पिढी कोणत्या दिशेने जात आहे ?’, हा अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर या समस्येवर उपाय शोधणे, हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.’

– श्री. गुरुप्रसाद गौडा, हुब्बळ्ळी, कर्नाटक. (२१.२.२०२६)