PM Assassination Plot : पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचणार्‍या अमन तिवारी याला अटक

अमेरिकेतील गुप्तचर संस्था सी.आय.ए.ला ईमेल पाठवून केली होती पैशांची मागणी

आरोपी अमन तिवारी व पंतप्रधान मोदी

बक्सर (बिहार) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २२ दिवसांत ठार मारण्याची धमकी देणारा अमन तिवारी आणि त्याचे २ साथीदार यांना पोलिसांनी येथे अटक केली.

तिवारी याने या हत्येसाठी अमेरिकेतील गुप्तचर संस्था सी.आय.ए.ला ईमेल पाठवून मोठ्या रकमेची मागणी केली होती; मात्र किती रक्कम मागितली ?, हे पोलिसांकडून सांगण्यात आले नाही. पोलिसांनी त्याच्याकडून भ्रमणभाष, लॅपटॉप आणि अनेक डिजिटल साधने जप्त केली. अमन रहात असलेली खोली बंद (सील) केली आहे. तो गावात राहून सायबर कॅफे चालवत होता, असे सांगितले जात आहे.

१. सर्व संबंधितांची बँक खाती आणि डिजिटल व्यवहार यांची पडताळणी चालू  आहे. या जाळ्यामागे आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना आहे का ?, याचीही निश्चिती करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून सध्या प्रकरणाचे सखोल अन्वेषण चालू  आहे.

२. पोलीस अधीक्षक शुभम् आर्य यांनी सांगितले की, हे प्रकरण अत्यंत गोपनीय असून अन्वेषण पूर्ण झाल्यानंतरच याची पूर्ण माहिती दिली जाईल.

३. अमनची पार्श्वभूमीही गुन्हेगारीची आहे. वर्ष २०२२ मध्ये कोलकाता विमानतळ ‘हॅक’ करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.