‘आपण मन या शब्दाचा व्यवहारात सहज आणि वारंवार उपयोग करतो; परंतु मन ही काय वस्तू आहे, याचा यत्किंचितही विचार करत नाही. निरनिराळे संत, महात्मे, ऋषिमुनी, तत्त्ववेत्ते यांनी मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मन ही अशी गोष्ट आहे की, ताब्यात आली, तर विश्वच ताब्यात येऊ शकते. त्यात प्रचंड शक्ती आहे, असा सर्व ज्ञाते लोकांचा निष्कर्ष आहे. ‘मन’ या विषयावर २०५ श्लोक लिहून मनाला काय कर, काय करू नको, हे जीव तोडून श्री समर्थ रामदासस्वामी यांनी सांगितले. खरेतर तो उपदेश आपल्यासाठीच आहे. ‘अचपळ मन माझें नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ।।’. (करुणाष्टक, श्लोक १) म्हणजे ‘माझे मन हे अतिशय चपळ आहे. त्यावर कितीही बंध घातले, तरी ते आवरता येत नाही. काय करू, तुझी भेट व्हावी, या विचाराने माझे मन आता थकले आहे. तेव्हा तूच धावून ये’, अशी प्रभु श्रीरामचंद्राला शरण जाऊन प्रार्थना केली.

१. मन नियंत्रणात आल्यास काय होऊ शकते ?
योगशास्त्राप्रमाणे ‘मन’ ही शक्ती आहे आणि ती निरनिराळ्या कार्यासाठी उपयोगात आणू शकतो. मन आपल्या नियंत्रणात नसल्याने त्या शक्तीचा ओघ चारही दिशेला पसरून त्याची सारी शक्ती निष्क्रीय होते. आकाशात विजेचा प्रचंड लोळ आहे. तो लोळ कडाडून भूमीवर पडून नष्ट होतो; पण तीच वीज नियंत्रित केली, तर त्या शक्तीकडून पंखा फिरवणे, प्रकाश घेणे, कारखान्यातील यंत्र चालवणे इत्यादी यांसारखी कामे करून घेता येतात, तसेच आपल्या मनाचे आहे, ते आपल्या कह्यात असले, तर अतर्क्य अशा गोष्टी साध्य होतात. एखाद्या कामात एकाग्रता आली, तर काम चांगले होते. जितके काम मोठे तितकी मनाची एकाग्रता अधिक लागते. काम कशा पद्धतीने करावे आणि काय अडचणी येण्याची शक्यता आहे इत्यादी गोष्टींचा ‘साक्षात्कार’ आपोआप होतो. त्यामुळे योग्य तो मार्ग सुचतो. हा आपला व्यवहारातील साधा अनुभव आहे.

२. मनाचा कठोर निर्धार केल्यानंतर चांगले प्रयत्न केल्याची उदाहरणे
आपल्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण फार बोलके आहे. त्यांना ५ पातशहांशी झुंज घेण्याची शक्ती कुठलीही साधनसामग्री आणि पैसा नसतांना कुठून आली ? मनाचा कठोर निर्धार हाच उपाय. युद्धात त्यांनी साध्य केलेले कित्येक विजय केवळ ‘अशक्य’ याच सदरात मोडणारे होते. आताचे उदाहरण, म्हणजे वंदनीय वीर पुरुष नेताजी सुभाषचंद्र बोस ! अर्थात् त्यांना एका विशिष्ट रेषेपुढे काही कारणाने जाता आले नाही. मन खचते, तेव्हा शरीर खचते. काम करण्यास शरीर नकार देते. मन जेव्हा उत्साही असते, तेव्हा जर्जर शरीरही पराक्रम करते, उदा. वीर बाजीप्रभु देशपांडे.
३. मनाला आवर घालण्यात धर्म, आहारविहार आणि आचार-विचार यांचे महत्त्व
मनाचा हा महिमा असतांना आज आम्ही नेभळट का ? आज आम्ही त्याचा उपयोग करून घेण्यास असमर्थ का ? आम्हाला पाश्चात्त्यांनी मधल्या काळात सतत शिकवले की, तुमचा धर्म कुठल्याच कामाचा नाही. खरेतर बर्याच अंशी मनावर ताबा ठेवण्याचे शिक्षण आपल्या घरातील रहाणीनेच सहजच मिळत होते. आपल्या सनातन धर्मातील आचार आणि विचार यांत मनाला आपण कळत नकळत ताब्यात ठेवत होतो. सकाळी उठणे, व्यायाम, पूजा, स्तोत्र पठण इत्यादी करून मग व्यवहाराला लागणे. व्यवहारात खोटेपणा नको, पाप भोगावे लागेल, दुसर्याला साहाय्य करणे, दानधर्म ईश्वरचिंतन इत्यादी उच्च कोटीच्या गोष्टी आमच्या रक्तात भिनल्या होत्या. त्यामुळे काय करावे आणि काय करू नये, हा विवेक जागृत राहून मनावर बर्याच प्रमाणात ताबा रहात असे अन् माणूस धाडसाने अडचणींना तोंड देत असे. सारा समाज हळूहळू अवनीतीला लागला. आहारशुद्धतेचा भाग आपल्या हातून निसटला. आहाराचे महत्त्व ‘छंदोग्या’तील अध्यायामध्ये दिले आहे,
आहारशुद्धौ सत्त्वशुद्धिः । सत्त्वशुद्धौ ध्रुवा स्मृतिः । स्मृतिलम्भे सर्वग्रन्थीनां विप्रमोक्षः ।। – छान्दोग्योपिनषद्, अध्याय ७, खंड २६, वाक्य २०
अर्थ : सात्त्विक आहाराने सत्त्वशुद्धी होते, सत्त्वशुद्धीने आत्मस्मृती होते. त्यामुळे सर्व वासनाग्रंथी तुटतात आणि मुक्ती मिळते.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे येथे सत्वाचें सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशीं ।।’ म्हणजे ‘सत्त्वगुणाचे सामर्थ्य ओळखून दिवसरात्र परमार्थ करावा.’
मनाला आवर घालण्यासाची जी साधने आहेत, त्यांतील काही साधने ‘आहार-विहार आणि आचार-विचार’ ही आहेत. आपल्या नित्यक्रमात ती सहज आपल्या पदरात पडत होती. वैदिक धर्मात सांगितले आहे की, ‘सत्त्वगुण’ प्रथम बाणावा, म्हणजे पुढचे काम सोपे होते.
४. मनाच्या असामान्य शक्तीविषयी चालू असलेले संशोधन
मनाच्या शक्तीविषयी आपल्या पुराणामध्ये पुष्कळ उदाहरणे आहेत. या शक्तीने पर्वताचे तुकडे होऊ शकतात. आज आधुनिक जगात मनाच्या असामान्य शक्तीचे संशोधन चालू आहे. ‘सायको कायनेटिक्स’ (Psycho kinetics) हे या विज्ञानाचे नाव आहे. एखादी वस्तू नुसत्या दृष्टीने हालवणे, डोळे बंद करून रंग ओळखणे इत्यादी. आजच्या पदार्थ विज्ञानाप्रमाणे या विज्ञानाचे नियम बसवत आहेत; परंतु आज हे विज्ञान फार पुढे जाऊ शकले नाही. ध्यानाचा उपयोग यासाठी प्राथमिकतेने होतो.
५. मनावरचा ताबा सुटल्याने होणारे स्वैर वागणे
आज सर्वसाधारण जीवनात मनाला बांध घालण्याचे प्रसंग फार अल्प येतात. पूर्वी एकत्र कुटुंब असल्याने स्वैर वागण्याला पुष्कळ निर्बंध होते. त्यामुळे अनुमाने १०० वर्षांपूर्वी सामान्य माणसाजवळसुद्धा मनःशक्ती आजपेक्षा अधिक होती. आज स्वैर वागण्याचा महिमा फार आहे. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य हवे, त्यामुळे मनःशक्ती संचय व्यवहारात लागणार्या शक्तीपेक्षा अल्प असल्याने प्रतिकूल परिस्थितीत स्वतःवरचा ताबा सुटून मनुष्य गैरव्यवहार करू लागतो. खून, चोरी, मारामारी, हे प्रसंग आजकाल फार वाढले आहेत.
६. पातंजल योगसूत्रांनुसार मिळणारे फळ
भारतीय मानसशास्त्र, म्हणजे ‘पातंजल योगसूत्रे’ याचे ४ पाद असून एकंदर १९५ सूत्रे आहेत. हे आपल्या सनातन धर्माचे प्रत्यक्ष विज्ञान (Applied) आहे. कुठल्याही सूत्राचा सतत जप केला, तरी त्या सूत्रातील फळ आपणास मिळेल. सूत्रांचा अभ्यास करून त्याचे अवलंबन केले, तरी तसेच फळ मिळेल. आपण उदाहरणादाखल काही सूत्रे बघू –
अ. साधनपाद, सूत्र ३६ : ‘सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम् ।’ (पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ३६), म्हणजे ‘वाणी आणि मन सत्यस्वरूप झाले की, अशा माणसाला वाक्सिद्धी प्राप्त होते. तो बोलेल, ते खरे होते. त्याला जी इच्छा होते, तसे घडते.’
आपण सतत सत्य बोलत असू, तर आपल्या तोंडून निघणारी वाणी सत्य होते; मात्र आपण गंमत म्हणूनही असत्य उच्चारू नये. हे व्रत न्यूनतम १२ वर्षे पाळल्यास हळूहळू ही शक्ती प्राप्त होते, मनाची शक्ती वाणीद्वारे प्रगट होते. सत्य बोलण्यासाठी पुष्कळ शक्ती लागते. वेळ आली, तर आपण सहज असत्य बोलून जातो. सत्य बोलणे ही लहान दिसणारी गोष्ट मनाची शक्ती वाढवते.
आ. विभूतिपाद, सूत्र २४ : ‘बलेषु हस्तिबलादीनि ।’ (पातञ्जलयोगदर्शन, विभूतिपाद, सूत्र २४), म्हणजे ‘हत्ती किंवा तत्सम बलवान प्राण्याच्या शक्तीवर ‘संयम’ केला, तर ती शक्ती आपल्या शरिरात उत्पन्न होते.’ संयम, म्हणजे मन त्या वस्तूवर एकाग्र करणे.
आता आपल्याला मनाचा महिमा कळला असेल. आपण पाश्चात्त्यांकडील मानसशास्त्र वाचतो. ते शास्त्र नुसते पुस्तकी ज्ञान देते; पण भारतीय मानसशास्त्र आपल्याला त्या प्रयोगाचा प्रत्यक्ष प्रत्यय आणून देते. ‘मनाला जाणून घ्या आणि मनाला ताब्यात ठेवा’, हे सर्वच श्रेष्ठ पुरुष सांगतात. मन ताब्यात आल्यावर परमेश्वराचे सान्निध्य आहेच.’
– श्री. श्रीनिवास गोटे, संपादक, त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, नागपूर.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !