आस्थापन बंद न झाल्यास होणार तीव्र आंदोलन

लक्ष्मी ऑरगॅनिक आणि पिफास उत्पादन यांच्या विरोधात नागरिकांचा मोर्चा !  

खेड, ६ एप्रिल (वार्ता.) – तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक आणि आस्थापनाच्या ‘पिफास’ उत्पादनाच्या विरोधात येथील ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढला. या वेळी ग्रामस्थांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. कोकण पर्यावरण समितीच्या वतीने अशोक जाधव आणि राजू आंब्रे हे गेले ७६ दिवसांपासून या आस्थापनाच्या विरोधात साखळी उपोषण करत आहेत.

या मोर्चात युवक महिला शेतकरी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘जोपर्यंत हे आस्थापन बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील आणि ते पुढे तीव्र केले जाईल’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली. परिसरातील २५ ग्रामपंचायतींच्या परिसरातील ग्रामस्थांनी हा मोर्चा काढला असून यामध्ये सहस्रो ग्रामस्थ सहभागी झाले होते. या मोर्चाला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.