आधुनिक राजकीय विचारसरणीतील किंवा विज्ञानातील अंधश्रद्धा असो, ती दूर व्हायला हवी !

प्रसारमाध्यमांनी केवळ हिंदूंमधील बुवाबाजी न दाखवता अन्य धर्मीय आणि राजकीय क्षेत्रातील अपप्रकारही दाखवावेत !

‘सध्या मराठी माध्यमांमध्ये रूपाली चाकणकर आणि कॅप्टन अशोक खरात (निवृत्त) किंवा बुवा यांच्या बातम्यांचा तपशील मिटक्या मारत खात असल्यासारखा चघळला जात आहे. हा तितकाच ढोंगीपणा आहे. जवळजवळ ६० वर्षांपूर्वी आचार्य अत्रे यांनी एक प्रकरण बाहेर काढले होते. पुणे जिल्ह्यात केडगाव येथे एक बुवा होता आणि त्याने अशा शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केलेले होते. त्याचा मुखवटा आचार्य अत्रे यांनी त्यांच्या दैनिक ‘मराठा’तून फाडला होता. पुढच्या काळात त्यातील नाट्य ओळखून आचार्य अत्रे  यांनी ‘बुवा तेथे बाया’ नावाचे नाटक लिहिले आणि ते प्रचंड गाजले. मी शाळकरी वयात असतांनाचा तो काळ होता.

प्रथम त्या नाटकाचे नाव ‘श्रीआईबाबा’ असे ठेवलेले होते; पण साईबाबांच्या भक्तांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतल्यामुळे ते नाव पालटून ‘बुवा तेथे बाया’ असे करण्यात आले. ‘ब्रह्म तेथे माया, वृक्ष तिथे छाया आणि बुवा तेथे बाया’, असे वाक्य त्या नाटकामध्ये होते. फरक इतकाच आहे की, आज ज्या प्रकारे सगळीच्या सगळी माध्यमे मिटक्या मारत या घाणीवर तुटून पडलेली आहेत, अशा लोकांचे मुखवटे फाडले पाहिजेत. ते योग्य आहे; पण ते करतांना सामाजिक संबंध आणि सभ्यता डागाळली जाऊ नये, याचीही थोडी चिंता केली पाहिजे. अशा गोष्टी मिटक्या मारत सांगण्यासारख्या नसतात, तसेच दाखवण्यासारख्याही नसतात. ज्या प्रकारची चर्चा रंगली आहे, ती खरच शरमेची गोष्ट आहे.

१. ख्रिस्ती आणि मुसलमान पंथांतील कथित धर्मगुरूंकडून लैंगिक शोषणाची प्रकरणे

अ. काही वर्षांपूर्वी केरळच्या एका चर्चमध्ये एक महिला नन म्हणून काम करत होती. तेथील एका मोठ्या ख्रिस्ती धर्मगुरूने तिच्यासह अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले, याविषयीची पोलीस तक्रार तिने केली होती. त्याच्यावर कारवाईही होत नव्हती. पोलीस कारवाई होत नाही; म्हणून हे प्रकरण पुष्कळ गाजले होते. त्यावर चर्चच्या लोकांनी पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला होता. उलट त्या पीडित महिलेलाच सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले होते.

आ. काही मदरशांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी असतात. त्यांचेही तेथील मौलाना लैंगिक शोषण करतात. अशाही गोष्टी पुढे आलेल्या आहेत.

ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर

२. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘मी टू’ चळवळ

मध्यंतरी ‘मी टू’ नावाची एक चळवळ (कामाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी महिलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारी एक जागतिक चळवळ) चालली होती. चित्रपट किंवा मनोरंजन या क्षेत्रांमध्ये ज्या महिला-मुली अभिनयाची संधी मिळावी म्हणून येतात, त्यांचे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार काय थोडे थोडके घडलेले नाहीत. त्यामुळे याविषयी अनेकांनी ते पुढे येऊन सांगितलेले आहे.

३. प्रसारमाध्यमांची भोंदूगिरी उघड करणारे ‘तहेलका’ प्रकरण

बाकीच्या कशाला अगदी वृत्तपत्र क्षेत्रामध्येही हे अपप्रकार झालेले आहेत. समाजातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी कटिबद्ध असलेले विद्रोही पत्रकार तरुण तेजपाल आणि त्याचा एक सहकारी होता. त्यांना ‘तहेलका’ नावाचे वर्तमानपत्र काढायला काँग्रेस नेते अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी १ कोटी रुपये देणगी दिलेली होती. असा हा तेजपाल एका प्रकरणात सापडला. त्याच्या मीडिया हाऊसच्या वतीने गोव्यामध्ये एक मोठा महोत्सव (कॉन्क्लेव्ह) आयोजित करण्यात आला होता. तेथे त्याच्याच मीडिया हाऊसमधील एका तरुण मुलीचे तरुण तेजपालने लैंगिक शोषण केले. त्याचा पुष्कळ गाजावाजा झाला होता. तेव्हा देशात मोदी सरकार नव्हते, तर संयुक्त पुरोगामी आघाडीचे डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार होते. अशा वेळी हे प्रकरण गोव्यात नोंदवले गेले. त्यामुळे तरुण तेजपालला गोवा पोलिसांना सामोरे जावे लागले. तेव्हा तरुण तेजपाल म्हणाला होता, ‘गोव्यामध्ये भाजपचे सरकार आहे आणि मी ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) असल्यामुळे मला यात गोवण्यात आलेले आहे.’ त्या मुलीने ‘तिचे लैंगिक शोषण होत आहे आणि आपल्यावर आपला संपादक तरुण तेजपाल शारीरिक अतिक्रमण करतो’, असा ‘ई-मेल’ सहसंपादक असलेल्या महिलेला केला. तिने त्याकडे चालढकल केल्यानंतर या प्रकरणाचा गाजावाजा झाला, तेव्हा ते प्रकरण दडपण्यासाठी ‘आपण गमतीने असे वागलो’, असा ‘ई-मेल’ तरुण तेजपालने त्या मुलीला पाठवला आणि तो सगळ्यात मोठा स्वीकृती जबाब होता.

त्यानंतरही तरुण तेजपालच्या समर्थनार्थ देहलीतील सगळे बुद्धीजीवी मोठ्या प्रमाणावर उभे राहिले. कॅप्टन खरात हा कुणी सत्पुरुष आहे, असे मी अजिबात मानत नाही; पण त्याच्यावर तुटून पडलेली माध्यमे आहेत, त्यांनी लक्षात ठेवावे की, त्यांच्याही व्यवसायामध्ये अशी गलिच्छ माणसे राजरोसपणे आणि उजळ माथ्याने वावरत असतात. ‘घरोघरी मातीच्या चुली’, अशी मराठीत म्हण आहे. त्यामुळे आज जे कुणी मिटक्या मारत त्या खरातवर तुटून पडले, त्यांनी टेंभा मिरवण्याचे कारण नाही. तुम्ही ज्यांच्या समवेत वावरता, त्यामध्येही अशा स्वरूपाची अनेक माणसे आहेत, जी उजळ माथ्याने वावरतात आणि प्रतिष्ठित म्हणून वावरतात. त्यांनीही शेण खाल्लेले आहे आणि त्यांना शेण भरवणारे बुवा प्रत्येक व्यवसायात आहेत. भारतातील प्रसिद्ध काँग्रेस नेते अधिवक्ता अभिषेक मनू सिंघवी यांच्यावरही हा आरोप झालेला आहे. त्याचीही ध्वनीचित्रफीत आली होती. त्यामुळे उगाच कुणी ‘आम्हीच फार सभ्य आहोत आणि शुद्ध चारित्र्याचे आहोत’, असे सांगून दुसर्‍याकडे बोट दाखवण्याचे कारण नाही.

अशा प्रकारे मिटक्या मारत खाणे, हे बेशरमपणाचे सर्वांत मोठे लक्षण आहे. आज अशा रंगवून बातम्या देणे चूक नाही; पण बातम्यांमध्ये ज्या प्रकारचे वर्णने केली जातात, ती करतांना कुणालाही शरम वाटत नाही. कुणीही महिला का असेना, आपण त्या महिलेची अब्रू चव्हाट्यावर टांगत आहोत, याची या लोकांना शरम वाटत नाही. आपण कुणाचे तरी लैंगिक अपवर्तन दाखवत किंवा सांगत आहोत, हा टेंभा मिरवतांना तुम्ही सभ्य राहिला आहात का ? हे बघितले पाहिजे.

४. शेकडो महिलांचे शोषण करणारे केडगावकर बुवा !

वर्ष १९७० च्या काळात योगायोगाने मी दैनिक ‘मराठा’मध्ये पत्रकारिता चालू केली, तेव्हा आचार्य अत्रे हयात नव्हते; पण त्यांच्या समवेत काम केलेले भरपूर लोक ‘मराठा’मध्ये होते. त्यांपैकी एकाचे नाव प्रभाकर देवळापूरकर होते. त्यांच्याशी बोलता बोलता काही दिवसांत मला कळले की, प्रभाकर देवळापूरकर हे त्याच गावचे आहेत, ज्या गावातील या केडगावकर बुवाविषयी आचार्य अत्रे यांनी ‘बुवा तेथे बाया’ हे नाटक लिहिले. आचार्य अत्रे यांनी दैनिक ‘मराठा’मध्ये त्या बुवाविषयी बातम्यांची मालिका चालवून त्याला पुरता उघडा पाडला होता. एक दिवस असाच गप्पा मारत असतांना देवळापूरकर यांना विचारले, ‘काय रे, हे सगळे प्रकरण तुमच्या गावात घडले, ते खरे आहे का ?’ तो म्हणाला, ‘१०० टक्के खरे आहे. ज्या केडगावकर बुवांविषयी लिहिलेले आहे, ते १०० टक्के खरे आहे.’ मग मी त्यांना एक प्रश्न विचारला, ‘मग तुमच्या गावातील लोकांनी याला सहन कसा केला, त्याच्या कमरेत लाथ घालून धक्के मारून गावाच्या बाहेर कसा नाही हाकलला ?’, तेव्हा त्याने दिलेले एक उत्तर मला निरुत्तर करून गेले. तो म्हणाला, ‘ते सगळे खरे असले, तरी ते महाराज आहेत !’

राहुल गांधी

५. १५० वर्षांच्या काँग्रेसमधील अंधभक्ती

ही सगळी अंधभक्ती केवळ धर्माच्या नावाने येते, असे अजिबात नाही. ही विचारसरणी पक्षीय राजकारणातही असते. राहुल गांधीसारखा माणूस गेली १२ ते १५ वर्षे १५० वर्षे जुन्या एका राष्ट्रीय पक्षाला देशोधडीला लावून बसला आहे; पण त्याच्या विरुद्ध चकार शब्द बोलण्याचे धाडस आज काँग्रेस पक्षामध्ये कुणाकडे आहे का ? काँग्रेस पक्ष, म्हणजेच नेहरू परिवाराची ‘प्रॉपर्टी’ आहे, असे बोलणारे बुद्धीजीवी आपल्याकडे अल्प नाहीत. काँग्रेस पक्षाची स्थापना नेहरू घराण्याने केलेली नाही; पण तरीही नेहरू, म्हणजेच काँग्रेस पक्ष असे बोलणारे मोठमोठे संपादक आपल्याला मिळतील. त्यांची अंधभक्ती नसते; कारण ती राजकीय असते, ते संपादक असतात आणि ते बुद्धीजीवी असतात. त्यामुळे त्यांच्या अंधभक्तीला माफ केले जाते. खरातकडे जाणार्‍या महिला किंवा इतर लोक यांना हिणवले जाते, तेव्हा मला नवल वाटत की, राजकीय विचारसरणीच्या आहारी गेल्यानंतर तुमच्याकडे तारतम्य रहात नाही. तेच तारतम्य एखाद्या अडचणीमुळे अशा बुवाकडे जाणार्‍या लोकांमध्येही असते. दोघांमध्ये काडीचाही भेद नाही. दोन्हीकडे तितकीच हानी असते; पण हानी होते, याची जाणीवही नसते. आपण फसवले जात आहोत, असे बर्‍याच महिलांना कळत नाही आणि झाले, तर त्या निमूटपणे गप्प बसतात.

तो मनीष तिवारी असेल, तो शशी थरूर असेल यांच्याविषयी काय बोलणार ? आपल्या डोळ्यासमोर राहुल गांधी हा नेहरू घराण्याचा वंशज काँग्रेस पक्ष बुडवत आहे आणि त्यासह आपलेही भवितव्य बुडवत आहे, हे दिसत असूनही सहन करणारा जो वर्ग आहे, तोही त्या खरातकडे जाणार्‍या महिलांहून वेगळा नसतो. त्या बुवाकडे जाणार्‍या महिला अंधभक्त असतील, तर राहुल गांधीला खडसावून पार्टीतून बाहेर काढून काँग्रेस पक्षाला परत सुदृढ बनवण्याची इच्छा जयराम रमेश यांना का होत नाही ? काँग्रेसमध्ये अनेक बुद्धीमान लोक आहेत. राहुल गांधीच्या लागोपाठच्या अपयशातून आणि पक्षाचा सत्यानाश केल्यानंतरही त्याच्यावरच नितांत श्रद्धा दाखवणारे आणि खरातकडे जाणारे यामध्ये काहीही फरक नसतो.

६. प्रसारमाध्यमांचा पक्षपातीपणा

हा पक्षपात माध्यमांमध्येही दिसतो. जितक्या आवेशामध्ये तुम्ही खरातकडून फसवल्या गेलेल्या बायकांविषयी बोलता, तितक्याच आवेशात घराणेशाहीमुळे विविध पक्षांमध्ये जी मरगळ आलेली आहे आणि कर्तृत्वाची नासाडी होतांना दिसत आहे, त्या त्या पक्षांविषयी तेवढे परखडपणे बोलायचे धाडस किती पत्रकारांमध्ये आहे ? नसेल, तर तुम्हाला खरातविषयी बोलायचा अधिकार उरतो का ?

अंधश्रद्धा कुठलीही असो, अगदी आधुनिक राजकीय विचारसरणीची असो किंवा अगदी वैज्ञानिक अंधश्रद्धा असो, ती दूर व्हायला पाहिजे. विज्ञानानेही अंधश्रद्धा निर्माण होते. नको असलेली औषधे घेऊन विज्ञानाच्या आधारेच माणसे अधिक आजारी झाली, हेही विसरता येत कामा नये. ‘बुवा तेथे बाया, वृक्ष तेथे छाया, ब्रह्म तेथे माया’ हे सगळे मायावी जग आहे. ते ब्रह्माच्या भोवती फिरत रहाते आणि आपण त्या चक्रव्यूहात फसलेले सामान्य लोक असतो.’

– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार, देहली.

(साभार : ‘प्रतिपक्ष’ यू ट्यूब वाहिनी)