मोनालिसा रुद्राक्षाची माळ विकत होती आणि आता कलमा म्हणत आहे ! – Dr. Pravin Togadia

आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांचे मोनालिसा-फरहान यांच्या विवाहवर विधान

(कलमा म्हणजे अल्लाचा गौरव करणारी विधाने)

फरहान व मोनालिसा (डावीकडे) डॉ. प्रवीण तोगडिया (उजवीकडे)

भोपाळ (मध्यप्रदेश) – मोनालिसा आणि फरमान यांच्या विवाहावरून वाद अधिकच तीव्र होत आहे. मोनालिसा भोसले ही राज्यातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर येथील रहिवासी आहे. तिने केरळमध्ये फरमानशी विवाह केला आहे. या विवाहानंतर मोनालिसा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. भाजप आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी याविषयी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, पूर्वी मोनालिसा रुद्राक्षाची माळ विकत होती आणि आता कलमा म्हणत आहे; हे अयोग्य आहे.

जाऊच देणार नाही, तर हिंदु धर्मात परत आणण्याचा प्रश्नच नाही !

मोनालिसासह काही मुलींच्या हिंदु धर्मात पुनर्प्रवेशावर ते म्हणाले की, जेव्हा आम्ही मुलींना हिंदु धर्मातून दुसर्‍या धर्मात जाऊच देणार नाही, तेव्हा परत आणण्याची आवश्यकताच पडणार नाही.

या प्रकरणावर भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री उषा ठाकूर यांनी या विवाहाला सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या विरोधात असल्याचे सांगत, ‘हा एक आखलेला कट आहे’, असा आरोप केला. तसेच ‘अशी मुलगी कुणालाही मिळू नये’, असेही त्यांनी म्हटले.

फसवणूक असेल, तर कायद्यानुसार कारवाई करावी ! – काँग्रेस

काँग्रेसचे प्रवक्ते अभिनव बरौलिया यांनी सांगितले की, राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असतांना जर कोणताही कट रचल्याचा आरोप केला जात असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी.

काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनीही म्हटले की, संबंधित तरुणी प्रौढ आहे आणि तिला स्वतःच्या इच्छेनुसार विवाह करण्याचा अधिकार आहे; मात्र जर कोणतीही फसवणूक झाली असेल, तर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे.

काय आहे प्रकरण ?

मोनालिसा भोसले ही कुंभमेळ्यात रुद्राक्षांच्या माळा विकत होती. त्या वेळी तिची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली होती. तिच्या सौंदर्यामुळे तिला एका चित्रपटात काम मिळाले. त्यानंतर तिने फरमान याच्याशी विवाह केला. हा विवाह केरळम् राज्यात झाला. त्यांच्या विवाहाला कम्युनिस्ट पक्षातील काही नेतेही उपस्थित होते. त्यानंतर हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याची टीका हिंदुत्वनिष्ठांनी केली होती, तर मोनोलिसाने हे आरोप फेटाळले होते.