सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील परदेशी विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य !

चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे कुलगुरुंचे आश्वासन

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील परदेशी विद्यार्थिनींच्या वसतीगृहात २८ मार्च या दिवशी एका ‘डिलिव्हरी बॉय’ने (वस्तू देण्यासाठी येणारी व्यक्ती) प्रवेश करत विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य केले. या प्रकरणाची पोलिसांमध्ये तक्रार प्रविष्ट करू नये, यासाठी विद्यापिठातील व्यक्तींनी दबाव टाकल्याची तक्रार संबंधित विद्यार्थिनींनी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे केली. याची गंभीर नोंद घेत ‘सखोल चौकशी करून दोषींवर २ दिवसांत कारवाई केली जाईल’, असेही डॉ. गोसावी यांनी स्पष्ट केले. या घटनेचे पडसाद २८ मार्च या दिवशी झालेल्या विद्यापिठाच्या अधिसभेत उमटल्याचे समजते.

१. परदेशी विद्यार्थिनी रहात असलेल्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आदी सुविधा नव्हत्या.

२. ‘विद्यापिठातील व्यक्तींनी आम्ही ही तक्रार पोलीस ठाण्यात करू नये, यासाठी आमच्यावर दबाव टाकला आणि तसे न करण्याविषयी लेखी लिहून घेतले’, अशी संबंधित विद्यार्थिनींची तक्रार आहे.

३. कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, ‘‘परदेशी विद्यार्थिनींचे वास्तव्य असलेल्या इमारतीच्या आवारात २४ घंटे महिला सुरक्षारक्षक नेमण्यात येईल. सीसीटीव्ही बसवण्यात येतील. त्या इमारतीला सुरक्षा कुंपण घालण्यात येईल. एका समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.’’