शिरोडा परिसरातील अनैतिक व्यवसायांच्या विरोधात त्वरित कारवाईची ग्रामस्थांची मागणी

पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना निवेदन देताना ग्रामस्थ

वेंगुर्ला – तालुक्यातील शिरोडा गावातील समुद्रकिनारा, मिठागर परिसर, तसेच उपजिल्हा रुग्णालयाची मागील बाजू येथे अमली पदार्थांची विक्री आणि सेवन करण्याचे प्रकार रात्रीच्या वेळी राजरोसपणे चालू आहेत, तसेच अनैतिक व्यवसायांचे प्रमाणही वाढले आहे, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ‘या पार्श्‍वभूमीवर संबंधितांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल’, अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी पोलिसांना दिले आहे.

या भागात गांजा, चरस यांसारख्या अमली पदार्थांची विक्री होत असून काही विक्रेत्यांकडून गुंडगिरीचे प्रकारही घडत आहेत. याखेरीज संबंधित परिसरात वेश्याव्यवसाय चालू असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या निवेदनाची नोंद घेऊन त्वरित कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचे शिष्टमंडळ सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार  असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

अनैतिक व्यवसायांची माहिती ग्रामस्थांना मिळते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना न मिळणे लज्जास्पद !