Euthanasia Request : मुंबईत इच्छामरणासाठी ८५ अर्ज !

मुंबई – देशात हरीश राणा यांच्या इच्छामरणाच्या प्रकरणानंतर मुंबई महानगरपालिकेकडे आतापर्यंत ८५ जणांनी इच्छामरणासाठी अर्ज केले आहेत. इच्छामरण या संकल्पनेला कायद्याने अद्याप अनुमती नाही. सध्या कुठली मार्गदर्शक तत्त्वे याविषयी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अर्थात्च ‘या अर्जांविषयी काय धोरण ठेवावे किंवा काय प्रक्रिया राबवावी ?’, याविषयी प्रशासनापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे यांतील काही व्यक्तींना सध्या कोणतेही आजार नाहीत; मात्र भविष्यात असे गंभीर झाले, तर आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार इच्छामरणाची अनुमती त्यांनी अर्जाद्वारे मागितली आहे.

अशा अर्जांची डिजिटल नोंद करण्यासाठी शासनाच्या शहरी विकास विभागाने एक ‘पोर्टल’ निर्माण केले आहे; मात्र अद्याप महानगरपालिकेच्या स्तरावर त्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

हरीश राणा यांच्या इच्छामरणाचे प्रकरण काय आहे ?

११ मार्च २०२६ या दिवशी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने हरीश राणा यांना ‘पॅसिव्ह युथनेशिया’ (निष्क्रीय इच्छामृत्यू), म्हणजेच कृत्रिमरित्या चालू असलेले अन्न आणि उपचार थांबवण्याची अधिकृत अनुमती दिली. १३ वर्षांपासून  त्याचे शरीर १०० टक्के निकामी झाले होते आणि तो केवळ नळीद्वारे दिलेल्या अन्नावर जिवंत होता. अन्न आणि उपचार थांबवल्यानंतर हरीश राणा यांचे १७ मार्चला निधन झाले.

संपादकीय भूमिका

भारतीय संस्कृतीनुसार आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रारब्ध भोग भोगून संपवण्यासाठी मानवाचा जन्म असल्यामुळे अशा प्रकारे अकली मृत्यू स्वीकारणे कितपत योग्य आहे ?