संपादकीय : ‘धुरंधर’चे राष्ट्रकार्य चालूच !

‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट १९ मार्च, म्हणजे गुढीपाडव्याला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला भारतासह जगभरात पुष्कळ प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे आगाऊ आरक्षणही अनेक दिवसांपूर्वीच संपले होते. यापूर्वी ‘धुरंधर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याला जगभरातून डोक्यावर घेतले गेले आणि अनेक विक्रमांची नोंद करत चित्रपटाने पुष्कळ कमाई केली. या चित्रपटातील मुख्य सूत्र, म्हणजे भारताच्या गुप्तचर यंत्रणेने पाकमध्ये शिरून उद्ध्वस्त केलेले आतंकवादी आणि त्यांची यंत्रणा ! पाकमध्ये भारतीय एजंटांनी शिरून मुख्य आतंकवाद्यांसमवेत त्यांचे समर्थक, तर कधी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत राहून कट रचून एक एक करून त्यांना संपवण्याच्या कामगिरीचे प्रातिनिधिक चित्रीकरण ‘धुरंधर’ या चित्रपटांच्या मालिकेत आहे. आता २ दिवसांपूर्वीच पाकमधील मुदिरके येथील मरकज तयबा या लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयातून नमाजपठण करून बाहेर आलेला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बिलाल अरीफ सलाफी याला अज्ञात बंदूकधार्‍याने गोळ्या घालून ठार केले. या घटनेच्या १-२ दिवस आधीच भारतासह जगभरात ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला सलामी देत अज्ञाताने आणखी एका आतंकवाद्याला अल्लाकडे पाठवले.

पाकमध्ये अज्ञात बंदूकधार्‍याकडून तेथील महत्त्वाच्या आणि त्यातही भारतावर आतंकवादी आक्रमणे करणार्‍या आतंकवाद्यांना ठार करण्याच्या घटना गत ४ वर्षांपासून घडत आहेत. हे अज्ञात बंदूकधारी कोण आहेत ? याचा थांगपत्ता अद्याप पाक सरकार, गुप्तचर यंत्रणा आणि सैन्य यांनाही लागलेला नाही. अज्ञात बंदूकधार्‍याने पाकमध्ये ‘मुजाहिदां’ना, म्हणजे आतंकवाद्यांना ठार करण्याच्या घटना वर्ष २०१० मध्ये अत्यंत तुरळक प्रमाणात होत होत्या; मात्र गत ४ वर्षांमध्ये यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवस ते काही महिने या अंतराने आतंकवाद्यांना एकटे गाठून ठार केले जात आहे. आतंकवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकमध्ये एखाद-दुसरा आतंकवादी मारला गेल्याची विशेष चर्चा सोडाच, त्याची नोंदही प्रारंभी घेतलेली नव्हती. जेव्हा आतंकवाद्यांच्या म्होरक्यांच्या, कमांडरच्या हत्या होऊ लागल्या आणि त्याचा काही मागमूस लागेना, तेव्हा कुठे आता पाक सरकार ‘भारत या हत्या घडवून आणत आहे’, असा आरोप करत आहे. स्वत: एक तर आतंकवादी निर्माण करायचे, त्यांना भारतात आक्रमण करण्यास पाठवायचे आणि त्यांच्या हत्या झाल्यावर शोध घेण्यास आलेले अपयश झाकण्यासाठी भारताकडे बोट दाखवायचे. ज्या पाकने सरकारी धोरणाचा भाग म्हणून भारताविरुद्ध आतंकवादी यंत्रणा राबवली, त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्रे निर्माण केली, त्यांना अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज केले, भारतात घुसवून सहस्रो निष्पाप भारतियांच्या हत्या केल्या, आतंकवाद्यांच्या कुटुंबियांसाठी पैशांची व्यवस्था केली, आतंकवादी मारला गेल्यास त्याच्या जनाजाला सलामी देण्यासाठी सैन्याधिकार्‍यांना पाठवले, त्या पाकला भारतावर आरोप करण्याचा अधिकार आहे का ?

आतंकवाद्यांचा कारखाना पाकिस्तान !

देशात झालेल्या आतंकवादी आक्रमणांचे अनेक पुरावे वेळच्या वेळी भारताने पाकला दिले आहेत. त्या सर्व पुराव्यांना पाकने केराची टोपली दाखवली आहे. आतंकवाद्यांवर कारवाई तर सोडाच; पण त्यांना सुरक्षित ठिकाणी लपण्यास जागा दिली आहे. त्यामुळे आतंकवादी न्यून कसे होतील ? त्यांची संख्या वाढतच रहाणार ! अधिकाधिक मुसलमान तरुणांना भारताविरुद्ध भडकावून आणि खोटी माहिती सांगून ‘जिहाद’ करण्यास प्रवृत्त करण्यात येते. या जिहादी प्रवृत्तीला उत्तर एकच होते, ते म्हणजे इस्रायलप्रमाणे कारवाई करणे ! त्यात दोन्ही अण्वस्त्रसज्ज देश, त्यामुळे भारत-पाक यांच्यात तणाव निर्माण झाला, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर महासत्तांना कळवळा की, युद्ध होऊ नये, बोलणी करावी म्हणे ! म्हणजे महासत्ता किंवा विकसित देश म्हणवून घेणार्‍यांविरुद्ध काही घटना घडल्यास ते थेट आक्रमणच करणार आणि भारताने मात्र संयम बाळगण्याची अपेक्षा ! वर्ष २०१४ पूर्वी तर नेभळट, षंढ आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकणारे काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे आतंकवाद्यांवर कारवाईची तसूभरही शक्यता नव्हती. तेव्हा भारताने मार खाणे आणि भारतियांनी मुकाटपणे आतंकवादी घटना पहात रहाणे, मरणारे भारतीय अन् सैनिक यांची संख्या मोजून त्यांना श्रद्धांजली वहाणे एवढेच ठाऊक होते. नंतर काळ पालटला आणि भारताने मोठ्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘सर्जिकल स्ट्राईक’, म्हणजे प्रत्युत्तर देणे चालू केले. यापूर्वी भारतियांनी भारतावरील आतंकवादी आक्रमणाचे एवढ्या जोरकस प्रत्युत्तर दिलेले कधी अनुभवलेही नव्हते.

आताचा काळ भारतासाठी अधिक अनुकूल म्हणावा लागेल; कारण आता थेट शत्रूदेशाच्या भूमीवर जाऊन आतंकवाद्यांना ‘ठोकण्यास’ प्रारंभ झाला आहे. भारत सरकारने कधीही उघडपणे याविषयी सांगितलेले नाही किंवा पाककडून भारतानेच केले, असेही स्पष्ट सांगितलेले नाही. भारताच्या ‘हिट लिस्ट’वर (‘लक्ष्य सूची’वर) असलेले आतंकवादी मारले जात आहेत. शत्रूदेश पाकमध्ये जेथे अखंड अस्थिर, अशांत वातावरण आहे, कुठे ना कुठे बाँबस्फोट होत असतात, एकापेक्षा एक अत्यंत क्रूर आतंकवादी रहातात, आय.एस्.आय.सारखी घातक गुप्तहेर संघटना आहे, गुन्हे विश्वातील सर्वच कुख्यात लोकांचा जो देश आश्रयस्थान आहे, तेथे गोपनीयरित्या प्रवेश करणे, त्या आतंकवाद्यांसह राहून सर्व व्यवस्था अभ्यासणे, त्यांच्या यंत्रणेचे निरीक्षण करणे आणि योग्य संधीची वाट पाहून आतंकवाद्याला ठार करून कोणताही पुरावा मागे न सोडणे, हे अंगात प्रखर भारतप्रेम असलेली व्यक्तीच करू शकते. ‘धुरंधर’ हा चित्रपट या सर्व अत्यंत कठीण आणि अशक्य वाटणार्‍या गोष्टी ‘अज्ञाता’ने कशा प्रकारे साध्य केल्या असतील ? याची काही घंट्यांमध्ये तोंडओळख करून देतो. देशासाठी शत्रूदेशाच्या भूमीवर आतंकवाद्यांच्या गोटात जाऊन उत्पात करणे, आतंकवाद्यांमध्ये भीती निर्माण करणे, त्यांची यंत्रणाच हादरवून सोडणे हे सर्व स्वप्नवत् वाटत असले, तरी ते ‘अज्ञात धुरंधर’ने साध्य केलेले आहे. भारतात रक्ताचे पाट वहाण्यासाठी कारणीभूत आतंकवादी एकामागोमाग दफन होत आहेत, हे पहातांना अज्ञाताविषयी अभिमान वाटतो आणि भारतमातेचा जयघोष करावासा वाटतो. ‘धुरंधर’ या पहिल्या चित्रपटात ‘हिंदू घाबरट जमात आहे’, या आतंकवाद्याच्या विधानाला ‘वेळ आल्यावर हिंदु नृसिंह बनून सावजाला सहज नष्ट करतो’, असे उत्तर दुसर्‍या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटातून दिले आहे. दाऊद इब्राहीम, हाफीज महंमद सईद, मौलाना मसूद अझहर इत्यादी काही महत्त्वाचे आतंकवादी अद्यापही पाकचा पाहुणचार झोडत आहेत, तर काही खलिस्तानी आतंकवादी कॅनडा आणि अमेरिका यांचा आश्रय घेतल्यामुळे अद्याप जिवंत आहेत. मुळातच आतंकवाद्यांचा कारखाना असलेला पाकिस्तान जोपर्यंत नष्ट केला जात नाही, तोपर्यंत भारताचा धोका न्यून होणार नाही. असे असले, तरी ‘अज्ञात धुरंधर’ने आतापर्यंत गाजवलेल्या शौर्याला तोड नाही !

पाकमधील आतंकवाद्यांना वेचून ठार करणार्‍या ‘अज्ञात धुरंधर’चे कार्य अद्भुत आणि ऐतिहासिकच !